Tuesday, January 25, 2022

ऊस पिकामधील तणनियंत्रण भाग-3

तणनाशकाचे प्रकार :

आजमितीला मार्केटमध्ये उपलब्ध असणार्‍या तणनाशकामध्ये पॅराक्वाट (ग्रामोक्झोन), ग्लायफोसेट (ग्लायसेल) आणि मिरा ७१ अशी तणनाशके सरसकट सर्वच तणांचा बंदोबस्त करण्यासाठी वापरतात. ही तणनाशके ऊसाच्या पिकामध्ये वापरणे धोक्याचे असते. पण बांधावरील तण, मोकळ्या जागेतील तण नियंत्रण करण्यासाठी काळजीपूर्वक वापरल्यास याचा उपयोग चांगला होतो. ग्रामोक्झोन हे स्पर्शजन्य आहे. कुठल्याही हिरव्या वनस्पतीवर फवारले असता काही तासातच त्याचा परिणाम दिसू लागतो. परंतु ग्लायफोसेट, मिरा – ७१ ही तणनाशके आंतरप्रवाही आहेत. फवारणीनंतर पानाद्वारे वनस्पतीच्या शरीरभर भिनतात. वनस्पतींचा शारीरिक समतोल बिघडवून तण मरून जाते. मातीवर पडले तर या रसायनाचा काही परिणाम होत नाही. निष्क्रिय होते. तणनाशकाचा दुसरा एक प्रकार आहे. ती काही विशिष्ट वनस्पती किंवा तणांना मारु शकतात. त्यांना सिलेक्टीव्ह हर्बिसाईड असे म्हणतात. ही तणनाशके आंतरप्रवाही याच प्रकारातील असतात. त्यांचा तपशील खाली दिला आहे.

आजमितीला मार्केटमध्ये उपलब्ध असणार्‍या तणनाशकामध्ये पॅराक्वाट (ग्रामोक्झोन), ग्लायफोसेट (ग्लायसेल) आणि मिरा ७१ अशी तणनाशके सरसकट सर्वच तणांचा बंदोबस्त करण्यासाठी वापरतात. ही तणनाशके ऊसाच्या पिकामध्ये वापरणे धोक्याचे असते. पण बांधावरील तण, मोकळ्या जागेतील तण नियंत्रण करण्यासाठी काळजीपूर्वक वापरल्यास याचा उपयोग चांगला होतो. ग्रामोक्झोन हे स्पर्शजन्य आहे. कुठल्याही हिरव्या वनस्पतीवर फवारले असता काही तासातच त्याचा परिणाम दिसू लागतो. परंतु ग्लायफोसेट, मिरा – ७१ ही तणनाशके आंतरप्रवाही आहेत. फवारणीनंतर पानाद्वारे वनस्पतीच्या शरीरभर भिनतात. वनस्पतींचा शारीरिक समतोल बिघडवून तण मरून जाते. मातीवर पडले तर या रसायनाचा काही परिणाम होत नाही. निष्क्रिय होते. तणनाशकाचा दुसरा एक प्रकार आहे. ती काही विशिष्ट वनस्पती किंवा तणांना मारु शकतात. त्यांना सिलेक्टीव्ह हर्बिसाईड असे म्हणतात. ही तणनाशके आंतरप्रवाही याच प्रकारातील असतात. त्यांचा तपशील खाली दिला आहे.

निवडक तणनाशके (सिलेक्टीव्ह हर्बिसाईड) :

१) मेट्रिब्युझीन : (4 – amino-6 terbutyl 1-3 (Methylthio) 1, 2, 4, trizin – 5 (4 H) – One) मार्केटमध्ये बायर कंपनीचे सेंकॉर या नावाने मिळते. ऊसाची लागण केल्यानंतर आठवडाभरात शेतामध्ये पुरेशी ओल असताना याची फवारणी केली तर गवतवर्गीय तसेच रुंदपानाचे (गोडे तण) सर्व प्रकारच्या तणांचे बीज उगवण्याची क्रिया थांबते. तण नुकतेच उगवून आले असले तरी सेंकॉरच्या फवारणीने मरते. विशेषतः गवतवर्गीय तणांचे उगवणीनंतर फवारणीने चांगले नियंत्रण होते. वनस्पतीच्या प्रकाशसंश्‍लेषण या क्रियेवर जलद परिणाम होतो. उगवून येणार्‍या अंकुरांची अंकुरण क्रिया बंद पडते. याचा परिणाम २ महिने टिकून राहतो. विशेष म्हणजे ऊसावर याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. पण याची फवारणी केली तर कोणतेही आंतरपीक टिकत नाही. डोस : ४०० ग्रॅम क्रियाशील घटक/एकर

२) ऍट्राझिन : (2 chloro-4-ethylamino-6 isopropylamin – 5- trizine) ट्रायझाईनस् मधला हा दुसरा प्रकार आहे. मार्केटमध्ये ऍट्रॅटाफ किंवा जेसॅप्रिम (सीबागायगी) या नावाने मिळते. उगवणपूर्व (प्रीइमर्जन्स) किंवा तणांची उगवण झाल्यानंतर या दोन्ही वेळेला वापरता येते. जमिनीत कमी ओलावा असला तरी काम करते. ऊस, मका, ज्वारी या पिकांना कोणतीही हानी करीत नाही. तणांच्या बियांची उगवण होण्यास प्रतीबंध करते. तणांच्या मुळातून प्रवेश करून तण नष्ट करते. पानावरची फवारणी तितकीच प्रभावी असते. दीर्घकाळ परिणाम राहतो. डोस : ८०० ग्रॅम क्रियाशील घटक/एकर

३) सिमॅझाईन : (2 chloro- 4, 6 bis ethyl amino 1, 3, 5 trizines)_ सिबागायगी निर्मित ‘गॅसॅट्रॉप’ किंवा टॅफॅझाईन या नावाने मार्केटमध्ये मिळते. हे तणनाशक तणांची उगवण होण्यापूर्वीच वापरावे लागते. तणांच्या बीजअंकुरणावर याचा परिणाम होत नाही. पण उगवणीनंतर मुळामार्फत सर्व भागात पसरते. पाने पिवळी पडून हळूहळू मरून जातात. प्रकाश संश्‍लेषणामध्ये ‘हिल रिऍक्शन’ नावाची क्रिया घडत असते. सिमॅझिनमुळे ही क्रिया बिघडून जाते. विशेष म्हणजे ऊसाच्या पानावर जरी हे तणनाशक पडले तरी ते निष्क्रिय होऊन जाते. मातीमध्ये मात्र दीर्घकाळ अवशेषाने राहून कार्य करते. डोस : ८०० ग्रॅम क्रीयाशील घटक / एकर

४) डाययुरॉन : (3-(3, 4-Dichlorophenyl)-1, 1- dimethylurea) मार्केटमध्ये कारमेक्स या नावाने मिळते. उगवणपूर्व तणनाशक म्हणून कार्य करते. युरियामध्ये थोडा रासायनिक बदल करून याची निर्मिती केली आहे. तणांच्या मुळातून शोषण झाल्यावर ते झायलेम या अन्नवाहिकेतून पानात पसरते. क्लोरोफिल तयार करण्याची क्रिया थांबवते. पाने पिवळी पडून पुढे कोळपून करपून जातात. मातीमध्ये अवशेष दीर्घकाळ राहातो. कारण पाण्यामध्ये ते कमी प्रमाणात विरघळते. वाहून किंवा निचर्‍याने नष्ट होत नाही. डोस : १.६० किलोग्रॅम क्रियाशील घटक/एकर

५) २-४ डी : (2, 4-Dichlorophenoxy acetic acid) मार्केटमध्ये फरनोक्झेन, वीडमार, वीडर या व्यापारी नावाने उपलब्ध आहे. त्याचे तीन फॉर्म्युलेशन्स आहेत. १) सोडियम सॉल्टस् २) अमिनो सॉल्टस् ३) एस्टर्स सोडियम सॉल्टस् १) हे सफेद पावडरच्या स्वरूपात असतात. पाण्यात पूर्णपणे विरघळतात. २) अमिनो सॉल्टस हे संपृक्त जलद्रावण स्वरूपात मिळतात. सोडियम सॉल्टस्पेक्षा जास्त प्रभावी असतात. ३) एस्टर्स हे टू-फोर-डी ऍसिड आणि अल्कोहोल यांच्या परस्परक्रियेने तयार केलेले असतात. पाण्यात फारसे विरघळत नाहीत. एस्टर्स हे वनस्पतींना घातक असतात. कारण पानांचा पृष्ठभाग हा क्युटिन किंवा नॉनपोलर पदार्थांनी आच्छादिलेला असतो. त्यामध्ये २-फोर डी एस्टर्स लागलीच मिसळतात. एस्टर्सचे लगेच बाष्पात रुपांतर होते. हे बाष्प पानांच्या रंध्रातून वनस्पतीमध्ये जलद प्रवेश करते. द्विदल किंवा रुंद पानाचे तण नियंत्रण करण्यासाठी हे प्रभावी रसायन आहे. लव्हाळ्याचे सुद्धा नियंत्रण याने फार चांगले होते. सेंकॉर व २, ४ डी यांचे मिश्रण लव्हाळ्यावर फवारले तर २० दिवसांत लव्हाळ्याच्या गाठी (नागरमोथे) निर्जीव होतात. याच्या फवारणीने प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. पानाचा आकार बदलतो. खोड वेडेवाकडे होते. शेवटी तण मरून जाते. जमिनीत याचे अवशेष फार तर दीड महिना राहतात. सूक्ष्म जीवाने त्याचे अपघटन होते. डोस :१.६ किलो क्रियाशील घटक/एकर _

६) फ्ल्युक्लोरॉलिन (बासालिन) : (N-Propyl-N-(2 chloroethyl 2, 6 dinitro n trifluromenthyl aniline)_ तणांची उगवण होण्यापूर्वी शेतामध्ये याची फवारणी करण्याची शिफारस आहे. ऊसामध्ये सोयाबीन, घेवडा, पावटा, चवळी, मूग, उडीद अशी आंतरपिके घ्यायची असली तर ऊसाचे अथवा आंतरपिकाचे नुकसान न होता तणनियंत्रण करण्याचे काम बासालिनच्या फवारणीमुळे होते. जमिनीवरच याची फवारणी करायची असते. पेरणीसाठी तयार रानामध्ये याची फवारणी केल्यानंतर एक हलकी फिल्म पृष्ठभागावर तयार होते. जमिनीच्या अगदी वरच्या काही मिलीमीटर थरातील तणांचे बी ओलावा मिळाल्यावर लागलीच अंकुरायला सुरुवात होते. अशा अंकुरावर बासालिन काम करते. सुमारे दीड महिन्यासाठी शेत तणमुक्त राहते. मातीमध्ये अडीच महिन्यांपर्यंत हे तणनाशक क्रियाशील राहू शकते. डोस : ४०० ग्रॅम क्रियाशील घटक/एकर

७) अलाक्लोर (प्लासो) : (2 chloro-2′, 6 dimehyl-N (methoxy methyl) acetanilide) मोनसँन्टो कंपनीचे हे तणनाशक लागण झाल्यानंतर लागलीच फवारावे. तणांच्या बीजाद्वारे पाण्याचे शोषण होऊन अंकुरण व्हायच्या अवस्थेत हे तणनाशक कार्य करते. उगवून आलेल्या तणांवर याच्या फवारणीचा उपयोग होत नाही. ऊस अथवा आंतरपिकावर अनिष्ट परिणाम होत नाही. डोस : ६०० ग्रॅम क्रियाशील घटक/एकर

८) ट्रायफ्ल्युरॅलिन (ट्रेफ्लॅन) (2, 6-dinitro-N-N-dipropyll-4-trifiuromethyl aniline) तणांची उगवण होण्यापूर्वी जमिनीवर याची फवारणी करावी. उगवण होत असलेल्या रोपांच्या मुळ्यांतून याचे शोषण होते. झायलेम या वहन नलिकेतून रोपट्याच्या शरीरात पसरते. रोपटी खुजी होतात. मुळांची वाढ रोखून धरली जाते. गवतवर्गीय तणाचे तर अंकुरसुद्धा वर येत नाहीत. ऊसामध्ये सोयाबीन, घेवडा, चवळी यासारखी आंतरपिके घेण्यासाठी हे तणनाशक चांगले आहे. याचा अवशेष जमिनीत दीर्घकाळ राहतो. डोस : ६०० ग्रॅम क्रियाशील घटक/एकर

९) नायट्रोफेन : टॉक ई २५ (2-4, Dichlorophenyl-4-nitro phenyl ether) शेतामधल्या पृष्ठभागाच्या अगदी वरच्या थरातील तणाचे बीजांकुरण होत असताना नायट्रोफेनच्या फवारणीने तण मारले जाते. प्रकाशसंश्‍लेषणाच्या क्रियेवर याचा परिणाम होतो. गवतवर्गीय अथवा रुंद पानाचे असे कोणतेही तण असो, नायट्रोफेनने त्याचे नियंत्रण होते. ऊसामध्ये मोहरी, हरभरा, बटाटा, उडिद, चवळी, मूग यासारखी आंतरपिके घ्यायची असतील तर पेरणीपूर्वी फवारणी घेतल्यास ऊसाचे अथवा आंतरपिकाचे नुकसान न होता तण नियंत्रण चांगले होते. या तणनाशकाचे अवशेष मातीमध्ये अनेक महिने राहतात. डोस : ४०० ग्रॅम क्रियाशील घटक/एकर

१०) ऍसुलॅम : (ऍसुलॉक्स) (मेथिल (४-अमिनो बेंझेन सल्फोनिल) कार्बोनेट) ऊसाच्या शेतामध्ये उगवून आलेल्या तणाचे नियंत्रण करण्यासाठी हे तणनाशक उपयुक्त आहे. पेशी विभाजन आणि प्रकाशसंश्‍लेषण या दोन महत्त्वाच्या शरीर क्रियांवर ते सावकाश परिणाम करते. कोवळी पाने पिवळी पडतात. वाढ खुंटते व तण मरून जाते. अशी ही ऊसासाठी वापरण्याजोगी काही महत्त्वाची तणनाशके आहेत. जमिनीत वापरलेल्या तणनाशकाचे अवशेष किती काळ टिकतात, फवारलेल्या तणनाशकाचा जमिनीमध्ये तसेच पानामध्ये शिरकाव कसा काय होतो, त्याचे त्या वनस्पतीमध्ये वहन कसे होते, या काही बाबी तणनाशक निवडताना ध्यानात घ्याव्या लागतात. त्याचप्रमाणे तणनाशके केव्हा, किती व कशी वापरावी हेही महत्त्वाचे आहे.

क्रमशः

डॉ. बी. एम. जमदग्नी (सर), M.Sc. (Agri), Ph.D. वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ निवृत्त शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची