Saturday, May 21, 2022

ऊस खोडवा व्यवस्थापन व पाचट व्यवस्थापन – सुरेश कबाडे

सध्या ऊस तोडी सगळीकडे जोरात सुरू आहेत.. अजून जानेवारी पहिला आठवडा संपून दुसरा आठवडा सुरू झाला परंतु अजून आडसाली लागणीच्या तोडी सुरू आहेत. 8/15दिवसात आडसाली खोडव्याला व हळद काढून जानेवारी फेब्रुवारी मध्ये केलेल्या ऊस लागणीचे तोडणी प्रोग्रॅम सुरू होतील.सध्या बऱ्यापैकी आडसाली तुटलेल्या उसाची आंतरमशागतीची कामे जोरात सुरू आहेत. पाचट पेटवून बुडखे छाटने ,नांगरीने बगला फोडणे ,खते टाकणे ही कामे सुरू आहेत.काही शेतकरी पाचट न पेटवता ठेवत आहेत पूर्वीच्या तुलनेत पाचट ठेवणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्या मध्ये हळूहळू वाढ होत आहे ही खरोखर समाधानाची बाब आहे.
एक एकर क्षेत्रामधून आपणाला सुमारे 5 टन वाळलेले पाचट मिळते. ते पाचट कुजविल्या नंतर त्यापासून आपणाला एक एकर मधून 2ते 2.5टन सेंद्रिय खत मिळते.आज शेणखताचे भाव गगनाला भिडलेत, आज सर्वसामान्य शेतकऱ्याला शेणखतावरती खर्च करणे दिवसे दिवस त्याच्या आवाक्या बाहेर होत चालले आहे. आज एक ट्रेलर शेणखत घ्यायचे झाले तर एक ट्रेलर शेणखताचा दर (90स्क्वेअर फुटाचा ट्रेलर) 2700रु शेणखत भरणी मजुरी 300रु ,व 1खेप ट्रॅक्टर ट्रेलरचे भाडे 400रु असे मिळून एक खेपेस 3400रु खर्च येतो. जो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आवाक्या बाहेरील आहे. ज्यांचे स्वतःचे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे अशा शेतकऱ्यांना घरचे 1नं कॉलिटीचे शेणखत उपलब्ध होते.परंतु असे किती शेतकरी आहेत?तुमचे जास्त क्षेत्र असेल तर घरचे शेणखत सुद्धा कमी पडते.अशावेळी पाचटा पासून सेंद्रिय खत निर्मिती करून शेणखताची कमतरता पाचटाच्या माध्यमातून भरून काढू शकतो. शेणखताला हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. पाचट कुजविल्याने अगनित फायदे मिळतात.
पाचट शेतात कुजविल्यानंतर आपणाला त्या पासून मुख्य अन्नद्रव्ये उदा. नत्र, स्फुरद, पोटॅश कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये,तसेच लोह, मंगल, तांबे, जस्त ही सूक्ष्म अन्नद्रव्ये ऊस पिकास उपलब्ध होतात. याचा उत्पादनवाढीवर अनुकूल असा परिणाम दिसून येतो.व एकरी उत्पादनात दहा ते पंधरा टक्के वाढ होते.

नवीन पिढीतील शेतकऱ्यांना पाचटाचे महत्व कळत आहे.. त्यांच्या मध्ये जागृती होत आहे..या बद्दल खरोखर मनापासून त्यांचे कौतुक करायला पाहिजे.त्यांना प्रेरीत करण भविष्यातील शेती जिवंत व सजीव ठेवण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.
बऱ्यापैकी शेतकरी ऊसाचे पाचट सरीमध्ये बसवितात. व खताचे डोसेस पहारी च्या सहायाने देतात. पाचटाचे आच्छादनासाठी उपयोग करतात.


ज्यांना उन्हाळ्या मध्ये पाण्याची कमतरता आहे, त्यांच्या साठी ही पद्धत खूपच चांगली आहे.पाचट ठेवल्या मुळे जमिनीत जास्त दिवस ओलावा, गारवा टिकून राहते. जमिनीत ओलावा जास्त दिवस राहत असल्याने दोन पाण्याच्या पाळी मधील अंतरा मध्ये वाढ होते. जमिनीतील तापमान नियंत्रित करते,आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो,मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते .उन्हाळ्या मध्ये पाण्याच्या कमतरते वरती मात करता येते.पाचट कुजवल्याने जमिनी मध्ये सेंद्रिय कर्ब वाढनेस सुरुवात होते..उपयुक्त जिवाणूंची वाढ होते..जमिनीची जलसंधारण शक्तीमध्ये वाढ होते..जमीन भुसभुशीत होते..गांडुळं संख्या मध्ये वाढ होते..जमिनीत हवा खेळती राहते..जमिनीची सुपीकता वाढते..जमिनीचा PH सुधारते.. एका पाचटा पासून किती फायदे आहेत बघा.. अनलिमिटेड.. अविश्वसनिय..

व ते पाचट नंतर पावसाळ्या मध्ये कुजून जाते. आमची पद्धत थोडी वेगळी आहे. आम्हाला पाण्याची उपलब्धता भरपूर प्रमाणात असल्या मुळे आम्हाला पाचटाचे अच्छादनाची गरज भासत नाही. त्यामुळे आम्ही थोड्या वेगळी पद्धत वापरून पाचट दोन महिन्या मध्ये कुजवून घेतो. त्यासाठी ऊस तुटल्या नंतर 8/10दिवस पाचट चांगले वाळून कडक झाल्यानंतर भर दुपारी 12 नंतर कडक उन्हामध्ये ट्रॅक्टरने पाचट कुट्टी करून घ्या. उन्हात पाचट कडक झाल्याने पाचटाचे कुट्टी चांगल्या पद्धतिने होऊन पाचट चे एकदम बारीक बारीक तुकडे होतात. पाचट कुट्टी करणे गेल्या वर्षी एकरी 1600रु भाडे घ्यायचे या वर्षी त्यांनी 1700रु दर केलेत.
पाचट कुट्टी करून घेतल्या नंतर लहान दातक्याच्या सहायाने पाचट सरी मध्ये ओढून घ्या.त्या साठी आम्ही तारेपासून घरी दातके तयार करून घेतलेत. त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने सरी मध्ये पाचट घेता येते.ज्याच्या कडे अशा पद्धतीचे दातकी नाहीत त्यांना एक एकर पाचट सरी मध्ये घेणेस ज्यादा मजूर लागतात. पाचट सरी मध्ये घेणेस एकरी एकपारकी 6बायका लागतात एका बाईला 150रु पगार या हिशेबाने 900रु मध्ये पाचट सरी मध्ये घेणेस खर्च येते. पाचट सरी मध्ये दाबून घेतल्या नंतर त्या पाचटा वरती पहाटे मोकळा ट्रॅक्टर फिरवून घ्या. पहाटेच्या वेळेस पाचट मऊ पडलेले असते ,त्यामुळे त्या पाचटा वरती ट्रॅक्टर फिरविले असता पाचट सरीत एकदम चोपून बसते.त्यानंतर त्या पाचटा वरती एकरी 1पोते युरिया व 1पोते सुफरफॉस्फेट एकत्र मिसळून पाचटा वरती टाका. तसेच त्या पाचटा वरती उपलब्ध झालेस एकरी 3 ते 4टन कारखान्याची मळी किंवा त्या पासून केलेले सेंद्रिय खत टाका. त्यामुळे पाचट लवकर कुजून अपेक्षित रिजल्ट दिसून येते. तसेच त्या पाचटा वरती 250 किलो शेणखत घेऊन त्या मध्ये पाचट कुजविणारे कल्चर 4किलो मिक्स करून पाचटा वरती एकसमान पसरून घ्या.

जमीन वापश्यावर आल्या नंतर चांगली घात धरून बैलाच्या नांगराने दोन्ही बाजूने बगला फोडून घ्या. किंवा ट्रॅक्टर च्या सहायाने सुद्धा बगला फोडून घेऊ शकता. त्यासाठी ट्रॅक्टरच्या खुरटाचे फण काढून त्या ठिकाणी लहान नांगरी नटबोल्ट ने ऍडजस्ट करून सरीच्या दोन्ही बाजूने खोडव्याला इजा न होईल अशा अंतराने ऍडजस्ट करून बगला मारून घ्या. या पद्धतीने सुद्धा पाचट चांगले मुजवले जाते, गाडले जाते. विशेषता 5 फुटाच्या पुढील सरी असेल तर त्या ठिकाणी बैलाच्या नांगरी ऐवजी ट्रॅक्टरच्या सहायाने पाचट मुजवून घ्या. बैलाच्या नांगरीने 4.5ते 5फूट सरी मधील पाचट चांगले मुजवले जाते. ट्रॅक्टरच्या सहायाने 4.5फुटा पासून ते 6फूट सरी मधील सुद्धा पाचट चांगल्या तऱ्हेने मुजवता येते.

आता बैलाच्या ,ट्रॅक्टर च्या सहायाने बगला मारून पाचट मुजवून घेतल्या नंतर मग ऊसाचे बुडके छाटून घ्या. सध्या आमच्या भागात एक एकर बुडखे छाटणीचे दर एकरी 10गड्याने खंडित घेतात.त्याची मजुरी एकरी 2000रु पर्यंत येते. तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या मशीन ने बुडखे छाटत आहेत.परंतु ट्रॅक्टर च्या मशीन च्या सहायाने अजून म्हणावे इतके परफेक्ट कटिंग होताना दिसत नाही. ट्रॅक्टरच्या सहायाने बुडखे छाटताना बऱ्याचदा ऊसाचे बुडके चेंबतात,चिरतात काही ठिकाणी प्रमाणा पेक्षा खोल छाटनी होते.त्यामुळे त्या ठिकाणी ऊस उगवणीवर परिणाम होते. तूटआळ होते , गैप्स वाढत जाते.त्यामध्ये अजून सुधारणा होण्याची गरज आहे. अपवाद फक्त फुले 265 ची छाटणी ट्रॅक्टरणी केली तरी co86032च्या तुलनेत त्याची उगवण बरी होते. आम्ही मात्र बरेच वर्षे झाली धारदार कुदळी च्या सहायाने खोडवा छाटनी करतो.त्यासाठी पहिल्यांदा कुदळी ला पाणी देऊन धारदार करतो. त्यामुळे बुडखे छाटताना व्यवस्थित कट होतात. चिंबत नाहीत, चिरत नाहीत, एकदम सुपेरियर कट होते. तसेच बुडखे छाटताना जमिनीच्या आत किमान 1.5 इंच खोलीवर छाटनी करून घेतली पाहिजे. खोल छाटनी केल्या मुळे येणारा ऊसाचा कोंब हा जाड व सणसणीत निरोगी येतो.कुदळीच्या सहायाने बुडखे छाटणीचे रिजल्ट आम्हाला ट्रॅक्टरच्या मशीन केलेल्या छाटनी पेक्षा चांगले येते. त्यामुळे आम्ही बरेच वर्ष झाले कुदळी च्या सहायाने बुडखे छाटून घेतोय.
छाटलेल्या बुडख्यावर 1ग्राम बावीस्टीन +3मिली मॅलीथीऑन 1ली पाण्यात मिसळून फवारणी केल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.त्यानंतर बगला फोडलेल्या चरी मध्ये एका बाजूला रासायनिक खत व दुसऱ्या बाजूला सूक्ष्म अन्नद्रवे टाकून घ्या. खोडव्या ऊसाला सुरुवातीलाच जर रासायनिक खता बरोबर जर सूक्ष्मअन्नद्रवे टाकली तर त्याचे परिणाम फार चांगले जाणवतात. विशेषता चुनखडी युक्त जमीनी मध्ये सुरुवातीलाच सूक्ष्मअन्न द्रवे टाकली तर संपूर्ण खोडवा ऊस तुटून जाईपर्यंत त्या ऊसावरती केवडा येत नाही.
रासायनिक खताचा पहिला डोस, एकरी प्रमाण खालील प्रमाणे
DAP :-2बैग
युरिया:-1बैग
अमो.सल्फेट:-1बैग
पोटॅश:-1बैग
फरटेरा:- 4किलो (खोडकिडी साठी) टाकून घ्या. व सरीच्या दुसऱ्या बाजूच्या चरी मध्ये सूक्ष्मअन्नद्रवे चांगल्या कुजलेल्या शेणखता मध्ये मिक्स केलेले टाकून घ्या. त्यासाठी शेणखत वाळू च्या चाळया वरती टाकून चाळून घ्या. म्हणजे त्यामध्ये प्लास्टिक,काडी कचरा ,येणार नाही. त्यानंतर त्या चाळलेल्या स्वच्छ शेणखता मध्ये 8 दिवस सूक्ष्मअन्नद्रवे मिक्स करून ठेवा . तसेच सूक्ष्मअन्नद्रव्या बरोबर एकरी 2 बैग सिलिकॉन घ्या.अलीकडे केलेल्या संशोधनात ऊसाला सिलिकॉनची गरज सुक्ष्मअन्नद्रव्या इतकीच आहे हे सिद्ध झालेले आहे. शेणखतामध्ये सूक्ष्मअन्नद्रव्या बरोबर सिलिकॉन मिक्स केल्यामुळे थोडे ओलसर शेणखत असले तरी पाणी सुटू देत नाही. कारण सिलिकॉन पावडर बेस मध्ये असल्यामुळे शेणखतामधील ओल शोषून घेते. शेणखता मध्ये सूक्ष्मअन्नद्रवे मिसळून ठेवल्यामुळे सर्व सूक्ष्मअन्नद्रवे चिलेटेड होऊन पिकाला चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात.
सूक्ष्मअन्नद्रव्याचे एकरी प्रमाण खालील प्रमाणे
झिंक सल्फेट:-10किलो
फेरस सल्फेट:-10किलो
गंधक दाणेदार:-10किलो किंवा पावडर
मैग्नेशियम सल्फेट:-10किलो
मैग्निज सल्फेट:-5किलो
बोरॉन:-3किलो
सिलिकॉन:-40किलोच्या दोन बैगा

ट्रॅक्टरच्या,किंवा बैलाच्या नांगरीने बगला मारून घेतल्याने संपूर्ण पाचट मातीआड झालेले असते. पाचट मातीआड झाल्यामुळे 2ते3पाण्यामध्ये व दोन महिन्याच्या कालावधीत पाचट कुजून त्या पाचटा पासून उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रिय खत तयार होते.

साधारण दोन महिन्या नंतर पॉवर टिलर ने भरणी करते वेळी सरीच्या एका बगलेला रासायनिक खताचा दुसरा डोस टाकून घ्या. त्यासाठी एकरी प्रमाण पुढील प्रमाणे
12/32/16:-2बैग
1युरिया :-1बैग
अमो.सल्फेट:-1बैग
पोटॅश :-1बैग
फरटेरा :-4किलो(खोडकिडी साठी)

रासायनिक खत टाकून घेतल्या नंतर दुपारी 12नंतर कडक उन्हा मध्ये पाचट कडक झाल्यानंतर त्या मध्ये पॉवरटीलर रिवर्स मारून भरणी करून घ्या. एक एकर साठी पॉवर टिलर एकारणी रिवर्स मारायचे भाडे एकरी 1300रु आहे.
सरीचे खोली किती होते ते बघून पॉवर टिलर रिवर्स एकारणी किंवा दुयारणी करून घ्या.प्रमाणापेक्षा जास्त खोली झाली तर ऊसाला पाणी कमी पडते. व त्या मुळे त्याचा परिणाम ऊसाच्या वाढीवरती होतो. विशेषता माळ अंगाची हलकी जमीन असेल तर जास्त खोली करू नका. तसेच जास्त प्रमाणात जर जमीनीला उतार असेल तर भरणी केल्यानंतर लगेच दोन सरीचे साखळी करून घ्या.म्हणजे सगळीकडे एकसारखे पाणी बसेल लेवल मध्ये जमीन असेल तर साखळी करण्याची गरज नाही .पॉवर टिलर ने भरणी करत असताना सरीतील संपूर्ण पाचट मिश्रीत माती ची भर वरंब्याला लागते व वरंबा पूर्वी सारखा तयार होतो.

ऊस तज्ञाच्या मते ऊसाच्या पाचटात 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फुरद आणि 0.7 ते 1 टक्के पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब असते. आज आपल्या जमिनीचे सेंद्रिय कर्ब बघितले तर 0.5च्या आसपास खाली आले आहे. तो वाढविण्यासाठी सातत्याने पाचट न पेटवता त्याचे मल्चिंग किंवा त्याला मातीआड केले पाहीजे. किमान 0.7ते 1च्या दरम्यान सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. तो टिकवला पाहिजे..त्या साठी सातत्याने पाचट न पेटवता ठेवले पाहिजे.. म्हणजे आपली जमीनीचा प्रवास हळू हळू सुपिकतेच्या दिशेने सुरू होईल..
अलीकडील काळात मी पाचट पेटवणे पूर्ण पणे बंद केलेलं आहे. आज त्याचे रिजल्ट खूपच आशादायक दिसू लागलेत.
काही शेतकऱ्यांना असे वाटते की पाचट ठेवल्याने हुमणी चे प्रमाण वाढते. मग मला त्यांना असे विचारायचे आहे की पाचट न ठेवलेल्या ऊसामध्ये मग हुमणी व्हायचे काय कारण? त्या मध्ये मग हुमणी का होते? माझ्या मते शेतकऱ्यांची अजून पाचट ठेवण्याची मानसिकता होत नाही.आणि मग पळवाट शोधायला लागतात. आम्ही दोन महिन्या मध्ये पाचट कुजवून त्याचे रूपांतर उत्तम सेंद्रीय खता मध्ये करतो. ते खत ज्या वेळी हुमणी शेतामध्ये तयार होते तोपर्यंत त्या पाचटा पासून सेंद्रिय खत झालेले असते.आणि पाचटा पासून हुमणीचे आवडते खाद्य तयार झालेले असते. त्यामुळे ते ऊसाच्या मुळ्याकडे आकर्षित न होता ते पाचटा पासून झालेल्या सेंद्रिय खताकडे आकृष्ट होते. त्यामुळे डायरेक्ट उसावरती जो अटॅक होतो तो बऱ्यापैकी कमी होतो असा मला आलेला अनुभव आहे.
तर मग शेतकरी मित्रानो नवीन वर्षांमध्ये पाचट ठेवायचे संकल्प करता ना?हे सर्वस्वी तुमच्या हाती आहे..आणि त्यामध्ये अशक्य असे काही नाही..पुढील पिढीचे भविष्य तुमच्या हाती आहे..हे विसरू नका..आपल्या वाडवडिलांनी ज्या वेळी आपल्या हाती जमिनी सुपुर्द केल्या..त्या वेळी त्यांनी कुठल्या दर्जाच्या जमीनी तुमच्या हाती दिल्या.. ते जरा आठवा.. आणि कामाला लागा.. हे पाचट म्हणजे सोन आहे ..जे आपण आता पर्यंत पेटवत आलो.. अजूनही पेटवतो आहोत.. सोन पेटवून पदरात राख घेत आहोत..आजून वेळ गेलेली नाही.. शेतकरी राजा जागा हो..
If you work with determination and perfection then success will definitely get you

सुरेश कबाडे(संचालक गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज)

संबंधित लेख

2 COMMENTS

  1. Ganna master Suresh Kabade saheb best information , where can we purchase ganna master kit, what is price? Give phone no., Address

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची