ऊस डायरी (होय आम्ही शेतकरी) बळीराजा सुरेश कबाडे भाग 8

5651

जर आपल्या काही आर्थिक अडचणी मुळे जमिनीला पीक फेरपालट साठी विश्रांती देणे शक्य नसेल तर खोडवा ऊस तुटून गेल्यानंतर च्या मधल्या 3/4 महिन्याच्या काळात ऊसाला पोषक असणारे हरभरा हे द्विदल वर्गीय पिके घ्या. म्हणजे विश्रांती न देता सुद्धा ऊसाचे चांगले उत्पादन घेणे शक्य होईल.

तुम्हाला जर विसावा न देता ऊस काढून ऊस करायचे असेल तर ,खोडवा तुटल्यानंतर हरभरा घ्या.खोडवा जर लवकर तुटला तर डिसेंबर च्या दरम्यान हरभरा केला तर हरभऱ्याचे उत्पादन चांगले मिळते.व त्या उत्पादना मधून नांगरट व इतर मशागतीची खर्च निघतो. खोडवा ऊस जर जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या च्या दरम्यान तुटला तर उत्पादनाची अपेक्षा न करता बेवडसाठी हरभऱ्याचे पीक घ्या.मी एक वर्षी15 फेब्रुवारीला हरभरा केलेला होता. हरभरा लेट पेरणी झाल्याने उत्पन्न कमी मिळते.त्याची काढणी मळणीचा खर्च देखील त्यामधून निघत नाही. त्यावेळी हरभरा फुलकळीला आल्यानंतर किंवा दाणे भरणेस सुरुवात झाल्यानंतर नांगरटी मागे मुजवून घ्या. हरभरा पीक घेतल्याने जमिनी वरती त्याची आंब पडते.आगाप हरभऱ्याला लेट हरभऱ्याच्या तुलनेत जास्त आंब पडते. जेवढी आंब जास्त पडेल तेवढे पुढील पिकाला त्याचा चांगला फायदा होतो.

आगाप हरभऱ्यांच्या मानाने लेट हरभरा केल्याने उतारा किंवा उत्पादन कमी निघते.परंतु हरभरा लेट केल्यामुळे जमीन भेगाळनार नाही असे काही नाही.कारण मी ज्या वेळी पहिल्यांदा 15फेब्रुवारीला हरभरा केला होता त्यावेळी जमीन इतकी भेगाळलेली होती की नांगरट काही केल्या लागेना. त्यावेळी सिंगल पल्टीवरती 4मजूर उभे करून मला नांगरट करावी लागली. हरभरा केल्यामुळे जमीनला मोठं मोठ्या चिरा खोलवर पडतात. काही ठिकाणी इतक्या मोठ्या भेगा पडतात की आपले पाय त्या मध्ये फसू शकते. खोल पर्यन्त जमीन चांगली वाळते,सूर्याची किरण आत पर्यंत जातात,जमीन पूर्णपणे वाळते एक प्रकारे नैसर्गिक सबसोयलरचे काम हरभरा पीक करते.मोठं मोठी ढेकळे निघतात. लव्हाळा असेल तर जमीन आवळून आल्याने लव्हाळ्याचे पीठ होऊन जाते.त्यामुळे लहान गाठीचा लव्हाळा व मोठ्या गाठीचा लव्हाळा या दोन्ही प्रकारच्या लव्हाळ्याचा संपूर्ण पणे नायनाट होते.हरभरा नांगरट करत असताना मोठं मोठी ढेकळे निघतात.

हरभरा मुजवणे

ज्यांना विश्रांती न देता सातत्याने ऊस काढून ऊस करायचे आहे, त्यांना हरभरा घेऊन आडसाली ऊस करणे हा एक चांगला पर्याय आहे.

हरभरा पेरणी करताना रासायनिक खते: हेक्टरी
नत्र, स्फुरद, पालाश 25:50:30 किलो वापरा  म्हणजेच हेक्टरी 55 किलो युरिया व 300 किलो सुपर फॉस्फेट, आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी दयावे. म्हणजे एकरी नत्र,स्फुरद,पालाश 10:20:12द्यावे किंवा एकरी 2पोती 10/26/26द्या.
तसेच हरभरा पेरणी करत असताना सोबत एकरी अंदाजे अर्धा किलो शाळू मिक्स करून पेरा म्हणजे ज्यावेळी घाटे भरण्यास सुरुवात होईल त्यावेळी घाटेआळीच्या नियंत्रणासाठी पक्षांना शाळू पिकाचा थांबा म्हणून उपयोग होईल.

  • श्री. सुरेश कबाडे.
  • प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,
  • रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
  • मोबा:- 9403725999

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here