सोया फूड प्रमोशन अॅन्ड वेल्फेअर असोसिएशनने केंद्र सरकारकडे मागणी केलीय की – ‘अमेरिकेतून 50 हजार टन सोयाबीन आयातीला शून्य टक्के ड्यूटीवर परवानगी द्यावी.’
असोसिएशनच्या मते, देशातील दोन हजार सोया प्रोसेसिंग युनिट्सला योग्य दरात – उच्च गुणवत्तेचे सोयाबीन मिळत नाही. भारतीय सोयाबीन हे ऑईल व सोयामिल (पेंड) सेन्ट्रीक आहे. पण फूड प्रोसेसिंग क्वॉलिटी मटेरिअल मिळत नाही. म्हणून संधी असूनही व्यवसाय वाढवता येत नाही. अनेक युनिट बंद पडत आहेत.
अमेरिकेतूनच का? – अमेरिकेत खास मानवी आहारासाठी – नॉन जीएम सोयाबीन वाणांचे उत्पादन घेतले जाते; चीन, जपान, मलेशिया आदी देशांना निर्यात केले जातात. मानवी आहारादृष्टिने खास वैशिष्ट्ये असणाऱ्या या वाणांपासून निर्मित उत्पादनांची गुणवत्ता चांगली असते, वास येत नाही. जगभरातील ग्राहकांची पसंती मिळतेय, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. स्त्रोत – fnbnews
पुरक माहिती – अमेरिकेत जीएम व नॉन जीएम अशा दोन्ही वाणांचे उत्पादन घेतले जाते. तिथे जीएम हे मानवी आहारात तर नॉन जीएम हे इथेनॉल, पोल्ट्री + कॅटल फीड सेक्टरमध्ये उपयोगात आणले जाते.
वरील बातमी वाचल्यानंतरचे काही मुद्दे व प्रश्न असे.
- 2021-22 च्या नव्या अनुमानानुसार जागतिक 38.5 कोटी टन सोयाबीन उत्पादनात – 11.9 कोटी टन (31 टक्के) वाटा असणाऱ्या अमेरिकेत बहुतांशी जीएम सोयाबीनचेच उत्पादन घेतले जाते, देशांतर्गत मानवी आहारासाठी मात्र हा देश नॉन जीएम सोयाबीन वापरतो. भारतातूनही अमेरिकेत नॉन जीएम सोया डीओसी निर्यात होते. मात्र, तिथे ती थेट मानवी आहारात न वापरता, ऑरगॅनिक पोल्ट्री फीडसाठी वापरात येते.
- अमेरिकेत एकाच वेळी जीएम आणि नॉनजीएम सोयाबीनचे उत्पादन जर यशस्वीरित्या घेतले जात असेल, तर भारतातही तसे का घडू नये? अमेरिका जीएम सोयाबीनचा सर्वांत मोठा निर्यातदार तर चीन सर्वांत मोठा आयातदार आहे. भारतातील शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्याची मागणी करत असून, दुष्काळरोधक व तणरोधक जीएम सोयाबीन वाणांना परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. असे जीएम वाण यशस्वी झाल्यास भारतही चीन व अन्य जीएम सोयाबीन आयातकांना माल पाठवू शकतो.
- भारतात सोयाबीनच्या व्यावसायिक वापरास चार दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही फूड प्रोसेसिंगसाठी योग्य व्हरायटी आपण शोधू शकलो नाही. एकूण बियाणे क्षेत्रातील मुलभूत संशोधनासंदर्भात देशात नेमकी काय परिस्थिती आहे, याचे चित्र समोर येते.
4. शेतकऱ्यांच्या दृष्टिने विचार केला तर, सध्या बरेच प्रोसेसर्स विविध शेतमालाच्या खूल्या आयातीची मागणी करताहेत. व्यापारी सूत्रांकडील माहितीनुसार, 25 वर्षांपूर्वी भारत मसूरचा निर्यातदार होता पण आज आयातदार आहे. अशाप्रकारे डाळी, खादयतेल आणि एकूणच आयात खूली करण्याचे धोरण राबवले जाऊ लागले तर स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, आपण रिकामे बसायचे का, असे रोजीरोटीचे प्रश्नही उभे राहताहेत.
Genetically Modified. GM जीएम – जनुकीय स्थानांतरित.
Non GM – जनुकीय स्थानांतरित नसलेले सरळ वाण.
- दीपक चव्हाण, ता. 14 जून 2021.
FB Post.