वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बंगळूरच्या गुलाबी कांद्यास निर्यातीकरिता मंजुरी देत असल्याची माहिती विदेशी व्यापार विभागाचे महासंचालक बिद्युत स्वेन यांनी दिली आहे. कांद्याच्या निर्यातीमध्ये आणि साठवणुकीवर मर्यादा घातल्याने देशांमध्ये कांद्याच्या भावामध्ये मोठया प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले होते.
कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने २८ सप्टेंबर रोजी कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. कर्नाटक राज्यातून नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने २८ ऑक्टोबर रोजी बंगळूरच्या गुलाबी कांद्याच्या निर्यातीस मंजुरी दिली आहे. नऊ हजार मेट्रिक टनापर्यंत या कांद्याची निर्यात करता येणार असून चेन्नई पोर्टवरून या कांद्याची निर्यात केली जाणार आहे. यासाठी कांदा निर्यातदार यांना फलोत्पादन आयुक्त कर्नाटक यांच्याकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. यामध्ये ३० नोव्हेबरपर्यंत कांदा निर्यात करता येणार आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय हा फक्त बंगळूरकरिता घेवू नये. तर नाशिक जिल्ह्यामधूनही येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या कांदा निर्यातीस परवानगी दिली पाहिजे. -जयदत्त होळकर , माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव