Saturday, May 21, 2022

कांद्याच्या दरात चढ-उतार स्वाभाविक, पण दिशा तेजीची

लेखाचा सारांश… “यंदाचे कांदा मार्केट तेजीचेच आहे. तेजीच्या मार्केटमध्ये मोठी चढाई व त्यानंतर छोटे उतार होत असतात, पण मार्केटची दिशा ही तेजीचीच असते. तेजीचे मार्केट दोन पावले पुढे गेल्यावर एक पाऊल मागे येते — नवी ताकद घेवून पुन्हा पुढे जाते… ऑगस्टनंतरचा अनुभवही असाच आहे.”

पोस्ट लिहिण्याचा उद्देश :

आपल्या मालाच्या टिकवण क्षमतेनुसार कांदाविक्री जरूर करावी, पण घाबरून जाऊन एकदम विक्री वाढून नये, ज्यामुळे बाजार अकारण घसरतो, म्हणून मार्केटच्या रोजच्या लिलाव व निपटारा क्षमतपेक्षा अधिक आवकेची गर्दी होवू नये, या उद्देशाने ही पोस्ट लिहिली आहे.

पॅनिक सेलिंग का टाळावी?

समजा, आजपासून चाळीस दिवस देशाची गरज भागवेल एवढा स्टॉक आपल्याकडे आहे…आणि जर आपण ( शेतकरी) घाबरून जाऊन ही सर्व आवक जर दहा दिवसांतच मार्केटमध्ये जिरवण्याचा प्रयत्न करू लागलो तर काय होईल… स्वाभाविकपणे मार्केटमध्ये नरमाई येईल.

डिहायड्रेशनचा वाढता वेग, खराब होण्याची शक्यता आणि गेल्या वर्षीची भिती यामुळे सप्टेंबरमध्ये शॉर्ट टर्मसाठी माल दाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर थोडी फार नरमाई अगदी कमी दिवसांसाठी दिसू शकते, पण मार्केट तत्काळ यू – टर्न घेवून पुन्हा तेजीच्या दिशेने वाटचाल करू लागेल. कारण मार्केटला हे माहिती आहे, की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मालाचा मोठा तुटवडा आहे… सारांश, तात्पुरत्या नरमाईत पॅनिक सेलिंग करू नये.

अस्थिरता हा बाजाराचा स्वभाव:

मे महिन्याचा दुसरा पंधरवडा ते ऑगस्टचा पहिला पंधरवड्यादरम्यान – म्हणजेच – तीन महिने 1200-1300 प्रतिक्विंटलवर कांदा बाजार एकाच जागेवर उभा राहिला. 15 ऑगस्टनंतर बाजाराचा नूर पालटला. एक दोन दिवसांतच बाजारभाव एकदम 2000-2200 झाला. पुढे, दोन दिवसांनी पुन्हा बाजार तुटून 1800 झाला.मात्र, काही दिवसांतच बाजाराने पुन्हा 2200, 2600 अशी मजल गाठत 2900 च्या पातळीला स्पर्श केला. त्यानंतर पुन्हा बाजार 200 रु. घटून क्वालिटीनुसार 2200 ते 2600 च्या पातळीवर ट्रेड होतोय. इथे, जे घाबरले त्यांना खालच्या पातळ्यांवर माल विकावा लागला.

अतिरिक्त पुरवठा नाही, चिंता नको:

संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्रात जून्या कांद्याचा पुरेसा स्टॉक शिल्लक आहे. साधारणपणे सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत संपूर्ण देशाची गरज भागवू शकेल, इतका स्टॉक महाराष्ट्रातील कांदा चाळीमध्ये असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षासारखा अतिरिक्त कॅरिओव्हर नाही, हे लक्षात असू द्यावे. ( संदर्भ – यापूर्वीच्या पोस्ट्स पहा) महाराष्ट्रसह देशभरात आगाप पावसाळी लागणीत मोठी घट झाल्याने देशाची एकूण कांदा पुरवठ्याची पाईपलाईन ही ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये बऱ्यापैकी खाली आहे. देशांतर्गतच तुटवडा असल्याने निर्यातबंदी केली तरी ती असरदार ठरेल आणि आयात व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी ठरत नाही, हा आजवरचा इतिहास आहे.

संयमित विक्री ग्राहकासह शेतकरी हिताची

सध्याच्या भावपातळ्यांवर आपल्या मालाच्या टिकवण क्षमता लक्षात घेवून टप्प्याटप्प्याने विकण्यास हरकत नाही. पण पॅनिक सेलिंग मात्र करू नये.

पॅनिक सेलिंग म्हणजे अफवांवर विश्वास ठेऊन भितीपोटी मार्केटच्या दैनंदिन गरजेपेक्षा अतिरिक्त विक्री होय. अशा पॅनिक सेलिंगमध्ये स्वाभाविकपणे बाजारभावही कमी मिळतात. पुढे, पॅनिक सेलिंगचा ओघ सरताच पुन्हा बाजारभाव वरच्या दिशेने जातो. तेव्हा पॅनिक सेलिंगमधल्या मालाचा फायदा कुणाला होतो, हे तुम्हाला माहिती आहेच. पॅनिक सेलिंगमध्ये शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा तोटा होतो.

दिशा तेजीची

मागील दोन दिवसांत अनेक शेतकऱ्यांनी भाव का कमी झाले, म्हणून विचारलेय, त्यामुळे ही पोस्ट लिहिली.

दोन-अडीचशेने बाजार वर खाली होणे हे स्वाभाविक असते. यंदाचे कांदा मार्केट तेजीचेच आहे. तेजीच्या मार्केटमध्ये मोठी चढाई, छोटे उतार होत असतात, पण मार्केटची दिशा ही तेजीचीच असते. तेजीचे मार्केट दोन पावले पुढे गेल्यावर एक पाऊल मागे येते — नवी ताकद घेवून पुन्हा पुढे जाते… ऑगस्टनंतरचा अनुभवही असाच आहे.” दररोज भाव पाहून अकारण चर्चा, चिंता करू नये.


सरकारी यंत्रणांना आवाहन

सरकारी यंत्रणांनी स्टॉकिस्ट संदर्भात जरूर कायदेशीर निर्णय घ्यावेत, त्यास हरकत नाही. पण शेतकऱ्यांवर व प्रामाणिक व्यापाऱ्यांवर दबाव येईल अशी कृती होवू नये, कारण शेतकरी ग्राहकीनुसार, मार्केटच्या गरजेनुसार बरोबर माल सोडतो. जर शेतकऱ्यांवर दबाव आणला तर मालाची पॅनिक सेलिंग होवून तो पुन्हा स्टॉकिस्टच्या हातात जातो, हे ध्यानी घेणे गरजेचे आहे.

( कृपया अधिक संदर्भासाठी, आकडेवारीसाठी या पूर्वीच्या पोस्ट्स वाचा)

दीपक चव्हाण, पुणे.

ता. 2 सप्टेंबर 2019

IAPMarathi Facebook Post. Please join the group

संबंधित लेख

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची