Monday, May 16, 2022

नाशिकची सुप्रसिद्ध विंसुरा वाईनरी

उद्योग कोणताही असो अफाट संघर्षाला पर्याय नसतो. पण त्यातही वेगळा उद्योग म्हणजे वाइन बनवणे. दारू आणि इतर लिकर प्रमाणे वाइन हानिकारक नाही हे लोकांना पटवून देणे म्हणजे नवीन उद्योग उभा करण्यापेक्षाही कठीण.

कुठंतरी फिरायला जायचं म्हणून प्लॅन करत होतो. दोन ठिकाणचे प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर नाशिक ला फिरायला जायचं ठरवलं. नंतर तिथं जाऊन काय काय बघायचं याची माहिती घेयला सुरुवात केली, त्यामध्ये आपण एका वाईनरी ला  सुद्धा भेट देऊ असं ठरलं. ठरल्याप्रमाणे आमचे मित्र स्वप्नील सरांच्या मित्राची विंसुरा वाईनरी आहे, आपण तिला भेट देऊ शकतो असे सरांनी सांगितले आणि नाशिक मधील इतर पर्यटन स्थळे बघून आम्ही विंचूर कडे निघालो.

प्रल्हाद खडांगळे सर (MD Vinsura Winery Pvt Ltd) आम्हाला सकाळीच नाशकात भेटून तुम्ही सर्व दुपारी लवकर विंचूर ला या. जेवण बाहेर करू नका आपल्या फार्म हाऊस ला सर्व सोय केलीय असे सांगितले होते.

त्याप्रमाणे Sante नावाची मोठी होर्डिंग असलेल्या अलिशान फार्म हाऊस ला त्यांनी आमच्या जेवणाची व्यवस्था केली. जेवण झाल्यानंतर. सरांनी चर्चेला सुरुवात केली. आम्हालाही भरपूर प्रश्न होते, वाइन असो की इतर कोणतेही दारू त्याबद्दल माहिती जाणून घेण्याची इच्छा होती.आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची सविस्तरपणे उत्तर त्यांनी दिले.त्यामध्ये मग वाइन उद्योग सुरुवात कशी केली पासून तर उभारणी ला आलेल्या अडचणी आणि भविष्यातील ध्येय अशी जवळपास चार तास आम्ही चर्चा आणि वाईनरी ला भेट वगैरे मध्ये त्यांच्या सोबत घालवले.

त्यांच्या प्रत्येक कामात काहीतरी अफलातून फिलॉसॉफी दिसून आली. म्हणजे नाव बघा  “Vinsura विंसुरा” विंचूर ची सुरा (देव मद्यपान करायचे ती सुरा )म्हणजे विंसुरा. संस्कृत भाषेत सुरा म्हणजे वाइन.

त्यांनतर नावासोबत एक द्राक्ष चं पान असा त्यांचा लोगो आहे. त्यामागील कारण असे की प्सर्वच हिरव्या झाडांमध्ये पान अन्न तयार करते द्राक्ष च उदाहरण घेयच झालं तर द्राक्ष चं पान एका फॅक्टरी सारखेच सूर्यप्रकाश पासून साखर तयार करते आणि त्यापासूनच आपण वाइन तयार करतो म्हणून द्राक्ष च पान लोगो मध्ये आहे. फार्म हाऊस ला sante नाव देयचं कारण sante हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ Health सोबत चियर्स असा होतो म्हणून sante.

खऱ्या अर्थाने 2002 साली विंसुरा ची उभारणी झाली. पण त्यामागील कष्ट आणि जिद्द खुप मोठी होती. याची सुरुवात अल्पभुधारक शेतीपासून झाली. शिक्षण पूर्ण करून बाहेर काही नोकरी वगैरे नाहीय म्हणून प्रल्हाद सरांनी शेती करायला सुरुवात केली. पाणी कमी होते आणि हलक्या प्रतीची दोन एकर जमीन, त्यात पिकं चांगली येत नव्हती म्हणून दुसऱ्याची जमीन करायला घेतली आणि त्यावर शेतीला सुरुवात केली. भाजीपाला लागवड मुळे लागवडीपासून मार्केटिंग पर्यंत शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी बघत असतांना ते शेतकरी चळवळ शरद जोशी यांच्या सोबत जोडले गेले आणि शेतकरी संघटनेचे काम बघू लागले.त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तींनी त्यांना संघटना वगैरे च्या नादाला लागू नको काहीतरी काम धंदा वगैरे करायचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी विंचूर मध्ये कृषी सेवा केंद्र चालू केलं. पैसे नव्हते बायकोचं मंगळसूत्र आणि मित्राकडून वगैरे पैसे जमा करून असे दहा हजार रुपये जमा केले आणि त्यामध्ये येतील तेवढे औषध दुकानात ठेवली. लोकं हसायची चार डब्बे घेऊन बसला वगैरे पण आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना कीड-रोगावर योग्य सल्ला आणि योग्य औषध दिल्याने शेतकऱ्यांना फरक दिसायला लागला. बघता बघता काम मोठं होत गेलं. सिजन मध्ये दिवसाला एक लाख रुपये गल्ला सुध्दा येयला लागला होता. आता पैसा आला मग समोर काहीतरी नवीन म्हणून स्ट्रॉबेरी आणि द्राक्ष लागवड करायला त्यांनी सुरुवात केली.
त्यांनतर एका संस्था तर्फे फ्रांस ला टूर आणि त्यात वाइन, चीज बद्दल प्रशिक्षण अशी एक बातमी त्यांनी पेपर ला वाचली. त्यासाठी नोंदणी करण्याकरिता त्यांनी इंटरव्ह्यू दिला. त्यात त्यांची निवड झाली आणि ते फ्रांस ला जाऊन वाइन, चीज बद्दल बारकाईने अभ्यास करू लागले. नवीन स्वतः चं काहीतरी करायचं होतं,प्रचंड आवड होती. प्रशिक्षण दरम्यान आपल्या भागात यांच्या पेक्षा चांगले द्राक्ष पिकतात पण आपल्या कडे वाइन नाही याची त्यांना खंत वाटू लागली. सर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर परत भारतात येतांनी त्यांनी सोबत वाइन तयार करण्यासाठी ईस्ट( सूक्ष्मजीव-बुरशी) आणले आणि घरातील स्टील च्या एका डब्यात द्राक्षच हातानी ज्यूस काढून ज्यूस सोबत ईस्ट ठेवले. वाइन तयार झाली पिऊन बघितल्यानंतर त्यांना कळलं की आपली वाइन, वाइन ची राजधानी असलेल्या फ्रांस पेक्षाही चांगली आणि उत्कृष्ट आहे. तीच वाइन घेऊन ते परत फ्रांस ला गेले तिथं प्रदर्शनात वाइन ठेवली त्या वाइन ला सर्वांनीच पसंती दिली.

सर्वांनी प्रशंसा केल्यानंतर एक दिशा मिळाली होती. मग जागा, परवाना, आणि पैसे उभा करायला सुरुवात केली. कृषि सेवा केंद्र मुळे ओळखीचा फायदा झाला. सरकारी अधिकारी, परवानगी, सरकारी धोरणे अश्या बऱ्याच संकटाचा सामना करत,सोबत काही मित्रांना घेऊन विंचूर ला एकदम 54 परवाने काढून वाइन पार्क ची उभारणी केली.आज भारतात तसेच परदेशात लोकं आवडीने विंसुरा पितात.
वाइन ला चांगली चव असण्याचे खास कारण म्हणजे स्वतः फ्रांस ला जाऊन प्रशिक्षण घेतले आणि मोठया प्रमाणात लागवड होणाऱ्या साधारण द्राक्ष पासून वाइन न बनवता खास वाइन साठी लागणारी वाईनयार्ड च्या वेगवेगळ्या प्रजाती त्यांनी बाहेरून आणल्या आपल्या वातावरणामुळे त्यात अजून गोडी निर्माण झाली आणि आज भारतातील उत्कृष्ट प्रतीची वाइन म्हणून तुम्ही विंसुरा पिऊ शकता.

वाइन का प्यावी आणि कशी प्यावी याबद्दल..

आपल्या ज्ञानेंद्रिय ना आनंद मिळण्यासाठी वाइन प्यावी, वाइन पितांना चियर्स करतांनी ग्लास च्या आवाजाने कानांना आनंद मिळतो, नंतर हातात ग्लास डोळ्यासमोर फिरवल्याने रंग आणि स्वच्छ पारदर्शक वाइन बघून डोळ्यांना आनंद मिळतो, ग्लास फिरवल्याने जो सुगंध दरवळतो त्यामुळे नाकाला आनंद मिळतो आणि नंतर जिभेवर जेव्हा आपण वाइन घेतो तेव्हा पूर्ण जिभेवर वाइन फिरवून आपल्या जिभेला आनंद मिळतो.
अश्याप्रकारे वाइन चा आनंद घ्यावा.

वाइन सर्व्ह करताना योग्य ग्लास वापरणे फार गरजेचे असते. तसेच योग्य तापमानाला वाइनचा स्वाद आणि गंध खुलतो आणि वाइन चांगली लागते

वाइन कधी प्यावी ?

वाइन आपण कधीही घेऊ शकतो  नास्ता करतांनी,जेवणाआधी,जेवणासोबत, जेवण झाल्यानंतर
“Any Time is a Fine Time for Wine”

 वाइनसाठी वापरण्यात येणार्‍या काही वेगवेगळ्या द्राक्ष च्या प्रजाती

Cabernet Sauvignon
Merlot
Shiraz
Pinot Noir
Zinfandel
Malbec, Sangiovese

वाइनला जरी रेड, व्हाईट म्हणत असले तरीही
 ती थोड्याफार वेगवेगळ्या शेड मध्ये सुध्दा मिळते.याचे कारण म्हणजे द्राक्षाची प्रजात, ज्यापासून ती वाइन बनते. ह्या वेगवेगळ्या प्रजातीच्या द्राक्षांचा एक खास रंग असतो जो पांढरा,लाल, गडद जांभळ्या आणि निळसर अश्या द्राक्ष पासून नैसर्गिकरीत्या मिळालेला असतो.

 वाइन इतर दारू प्रमाणे हानिकारक नाही. तिचे फायदे भरपूर आहेत फक्त योग्य पध्दतीने तिचं सेवन केलं पाहिजे. आपण द्राक्षे खातो, द्राक्ष च ज्यूस पितो काही होत नाही त्याच प्रमाणे वाइन पिल्याने सुध्दा काही होत नाही.

डावीकडून डॉ. गोविंद कदम, डॉ.स्वप्नील लखोटे,डॉ. रोहित जाधव,मा. प्रल्हाद खडांगळे, विजय सोनवणे, आणि मी

 तूर्तास इतकंच.

 तर ही  होती सामान्य शेतकरी ते थेट 25 देशात फिरणाऱ्या वाइन उद्योजक प्रल्हाद खडांगळे या अवलियाची कहाणी .

अशी बरीच माहिती टूर च्या निमित्ताने मिळाली याचा आनंद  आहे.
✍️©गणेश सहाने 

संबंधित लेख

1 COMMENT

  1. नमस्कार मी शेतकरी आहे मला माहित हवी आहे वाईन तयार करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारच्या परवाने कुठे मिळतील आणि त्या साठी लागणारे परवान्याची यादी मिळाली तर बरे होइल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची