गवताळ वाढ या रोगाने ग्रस्त ऊसबेटांमध्ये गाळपालायक ऊस तयार होत नाहीत, त्यामुळे ऊस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. या रोगामध्ये नवीन तयार होणारे फुटवे मरून गेलेले दिसतात. काही ठिकाणी एखाद्दुसरा ऊस असल्यास त्याच्या कांड्या करंगळीएवढ्या बारीक दिसतात. या उसाची जाडी व उंची कमी असते. होणारे नुकसान लक्षात घेता वेळेवर रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.
गवताळ वाढ हा फायटोप्लाझ्मा या अति सूक्ष्म जिवाणूंमुळे होणारा रोग आहे. या रोगाचे जास्त प्रमाण हे मुख्यतः लागणीपेक्षा खोडवा पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. महाराष्ट्रातील प्रचलित जातींमध्ये को – 419, को – 740, को – 7527 आणि को.सी. – 671 या जाती या रोगास कमी ते मध्यम प्रमाणात बळी पडलेल्या दिसून येतात; परंतु हा रोग अलीकडील प्रसारित जातींच्या खोडव्यामध्येही काही अंशी दिसू लागला आहे.
रोगाची लक्षणे :
गवताळ वाढ हा रोग उसामधील वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये महत्त्वाची लक्षणे दर्शवितो. रोगग्रस्त उसाची प्राथमिक लक्षणे लावणीनंतर अथवा खोडव्यातील उगवून आलेल्या उसाच्या पानांवर दिसून येतात. फायटोप्लाझ्मामुळे लागण झालेल्या उसाच्या पानांमध्ये हरितद्रव्ये नसल्यामुळे पाने पांढरी अथवा पिवळसर पडलेली दिसून येतात, याला अल्बिनो रोग म्हणतात. अशा उसाच्या बेटांमधून असंख्य फुटवे घेऊन अशी बेटे खुरटी राहतात. हे फुटवे निव्वळ पांढरट अथवा पिवळसर दिसून त्याची पाने अरुंद, लहान, टोकाकडे निमुळती होत गेलेली दिसून येतात व त्यास गवताच्या ठोंबांचे स्वरूप येते. काही वेळेस नुसतेच रंगाचे असंख्य फुटवे असलेले दिसून येतात.
अशा गवताळ बेटांमध्ये नव्याने येणारे फुटवे फार दिवस टिकत नाहीत, गाळपालायक ऊस तयार होत नाहीत. प्रादुर्भावग्रस्त उसाच्या बेटामधील पाने ही टोकाकडून जळत जाऊन उसाचे बेट पूर्णतः मरून जाते. प्रादुर्भावग्रस्त बेटांमध्ये क्वचित ठिकाणी करंगळीएवढे अथवा त्यापेक्षा लहान ऊस तयार होतात. अशा उसावरील कांड्या आकाराने खूपच बारीक तयार होऊन कांड्यांवरील डोळे वेळेअगोदर फुटून त्यामधून पिवळी पाने बाहेर येतात आणि जमिनीलगतच्या कांड्यांवर मुळ्या आलेल्या दिसून येतात.
आर्थिक नुकसान :
प्रादुर्भावग्रस्त ऊसबेटामध्ये गाळपालायक ऊस तयार होत नसल्यामुळे ऊस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. या रोगामध्ये नवीन तयार होणारे फुटवे मरून गेलेले दिसतात. काही ठिकाणी एखादा दुसरा ऊस असल्यास त्याच्या कांड्या करंगळीएवढ्या वा त्याहून बारीक दिसतात. या उसाची जाडी व उंची कमी असते.
रोगाची ओळख :
फायटोप्लाझ्मा या जिवाणूंमुळे होणारा हा रोग आहे. फायटोप्लाझ्मा हा पूर्णतः परोपजीवी असल्यामुळे फक्त जिवंत वनस्पतीच्या पेशींवर जगतो. याची प्रयोगशाळेत वाढ करता येत नाही. जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. रोगग्रस्त बेणे लागवडीसाठी वापरल्यास उगवून आलेल्या उसामध्ये हा रोग दिसून येतो. काही वेळा तर जिवाणू संख्या लागण उसामध्ये कमी असल्यास हा जिवाणू सुप्तावस्थेमध्ये राहून खोडवा उसामध्ये रोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसते.
नैसर्गिक परिस्थितीमध्ये जर उसावर रस शोषण करणाऱ्या किडींचा – मावा, तुडतुडे प्रादुर्भाव जास्त असल्यास या रोगाचा प्रसार रोगट उसापासून निरोगी उसामध्ये होतो; तसेच ऊस तोडणीच्या वेळी अशी रोगट बेटे कोयत्याच्या साहाय्याने तोडल्यास कोयत्याद्वारे निरोगी ऊस बेटांमध्ये याचा प्रसार होतो. हा रोग ज्वारी, नेपिअर व मद्रास गवत या आश्रय वनस्पतींवर राहून मावा, तुडतुडे यांच्यामार्फत पुन्हा उसावर प्रसारित होतो.
उपाययोजना :
1) रोगमुक्त बेणेमळ्यातील ऊस लागवडीसाठी वापरावा, दर तीन वर्षांतून बेणे बदलून प्रमाणित बेणे वापरावे.
2) लागवडीनंतर किंवा खोडव्यामध्ये गवताळ वाढीची बेटे आढळून आल्यास ती मुळासकट काढून जाळून नष्ट करावीत.
3) लागवडीपूर्वी बियाण्यास उष्ण जल अथवा उष्ण बाष्पाची प्रक्रिया करावी किंवा अशी प्रक्रिया केलेल्या बेणेमळ्यातील बेणे लागवडीसाठी वापरावे.
उष्ण जल बीजप्रक्रिया :
या बीजप्रक्रियेमध्ये उसाच्या टिपऱ्या 52 अंश से. तापमान असलेल्या पाण्यामध्ये दोन तास ठेवून त्यानंतर लागण करावी.
उष्ण बाष्प बीजप्रक्रिया :
या बीजप्रक्रियेमध्ये उसाच्या टिपऱ्या 54 अंश से. तापमानात बाष्पयुक्त हवा असलेल्या संयंत्रामध्ये तीन तास ठेवून त्यानंतर लागण करावी. अशी प्रक्रिया मूलगुणी व मूलभूत बेणे तयार करण्यासाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे केली जाते, त्यामुळे प्रत्येक साखर कारखान्याने पाडेगाव येथील संशोधन केंद्रातून बेणे आणून ते कारखान्यांच्या बेणेमळ्यात वाढवावे. हे बेणे शेतकऱ्यांना लागवडीसाठी द्यावे. यामुळे या रोगाचे प्रमाण वाढणार नाही.
4) ऊस पिकावर आढळणाऱ्या रसशोषण करणाऱ्या मावा किडीमार्फत या रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ शकतो, त्यामुळे वेळोवेळी नियमितपणे पिकांचे सर्वेक्षण करून आढळून येणाऱ्या किडीवर आंतरप्रवाही कीटकनाशकांची (दीड मि.लि. डायमिथोएट प्रति लिटर) फवारणी करावी.
5) रोगप्रतिकारक अथवा रोगास कमी बळी पडणाऱ्या जाती को – 86032 आणि फुले – 0265 या जातींची लागवड करावी.
6) लागवडीखालील उसामध्ये गवताळ वाढ जास्त प्रमाणात असल्यास अशा उसाचा खोडवा घेऊ नये अथवा त्यामधील ऊस बियाणे म्हणून वापरू नये. अशी बेटे उपटून त्याठिकाणी निरोगी ऊस बेण्याची लागण करावी.
7) ऊस वाढीच्या अवस्थेत आणि उसाची तोडणी करताना गवताळ वाढीची बेटे दिसून आल्यास ती उपटून जाळून नष्ट करावीत; तसेच तोडणीसाठी वापरण्यात येणारा कोयता अधूनमधून विस्तवावर गरम करून अथवा उकळत्या पाण्यात बुडवून अथवा दोन टक्के फेनॉलच्या द्रावणात बुडवून निर्जंतुक करून वापरावा.
8) ऊस बेणेमळा तयार करताना सर्व शिफारशीत बीजप्रक्रिया करून रोगमुक्त बियाणे तयार करावे आणि असे बियाणे लागवडीसाठी वापरावे.
9) खोडवा उसातील गवताळ वाढीची बेटे दिसताच तत्काळ काढून टाकावीत, त्यामुळे या रोगाचा इतर बेटांवर किडीद्वारे प्रसार होणार नाही.
विशेष-
गवताळ वाढ आणि केवडा रोगातील फरक केवडा या सूक्ष्म मूलद्रव्याच्या कमतरतेने होणाऱ्या रोगाची लक्षणेसुद्धा अशीच असून गवताळ वाढ व केवडा रोग यातील फरक समजावून घेणे आवश्यक आहे. केवडा रोग झालेल्या उसाची पाने पांढरट अथवा पिवळसर होत असली तरी पानाच्या शिरा मात्र हिरव्या असतात; परंतु गवताळ वाढ या रोगामध्ये पानांच्या शिरासुद्धा पांढऱ्या झालेल्या दिसतात.
- सूरज नलावडे, डॉ. डी. व्ही. इंडी, डॉ. एस. एम. पवार
- संपर्क ः 02169 – 265333
- (लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)