उसाचे एकरी १०० टन उत्पादनाचे आपण जे टार्गेट ठेवतो ते गाठताना जमिनीच्या तयारीवर आपण विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर जमिनीत अंगाची ताकद असेल, जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य असेल, मातीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म चांगले असतील तर नक्कीच आपण त्या जमिनीतून उसाचे एकरी १०० टन उत्पादन घेऊ शकतो.
आजकाल ऊस उत्पादक शेतकरी जमिनीच्या आरोग्याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत त्यामुळे उसाची एकरी उत्पादकता दिवसेंदिवस ढासळत आहे. रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून देखील अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जमिनीचा पीएच खूप वाढला आहे त्याच सोबत मातीचा वरचा थर जरी मऊ दिसत असला तरी खालील थर फरशीसारखा घट्ट होऊन बसला आहे. आज थोडाफार पाऊस पडला तरी जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही. पाणी साठल्यामुळे पिकाची वाढ योग्य प्रमाणात होत नाही. जर आपल्याला ऊस पिकाची योग्य वाढ व्हावी असे वाटत असेल तर जमिनीमध्ये माती,पाणी, हवा या घटकांचे योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे. मुळ्यांचा विकास जर करायचा असेल तर जमिनीत हवा खेळती राहणे आवश्यक आहे. हे ज्या शेतकऱ्याला जमेल त्याला उसाची वाढ अगदी योग्य प्रमाणात मिळेल.
जमिनीची तयारी करताना काही महत्वाच्या बेसिक टिप्स लक्षात घेणे गरजेचे आहे. काही शेतकरी घरचा ट्रॅक्टर आहे म्हणून जमिनी विश्रांतीवर असताना दर १५ दिवसांनी मशागत करतात. उगाच २-३ वेळा नांगरट, रोटाव्हेटर मारतात याची काहीही गरज नाही. शेती शास्त्रातील काही संदर्भानुसार तुम्ही जेवढी जास्त जमिनीची मशागत कराल तेवढी तुमच्या मातीची धूप जास्त होईल आणि त्याच तुलनेत तुमच्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास होईल. आजकाल वाढलेले इंधनाचे दर लक्षात घेता आपल्याला एकदा खोल नांगरट, एकदा रोटव्हेटर आणि नंतर सरी या पद्धतीने जमिनीची मशागत केलेली फायदेशीर होईल.
कोणत्याही जमिनीतून आपण उच्च उत्पादनाची अपेक्षा तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण उच्च असेल. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे हे एका दिवसाचे काम नसून ही कायम चालत जाणारी प्रक्रिया आहे. यासाठी आपणास पिकांचे अवशेष, तण जमिनीत गाढणे, हिरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत यांचा वापर करणे अनिवार्य आहे. उन्हाळ्याच्या काळात ज्यावेळी जमीन विसाव्यावर असते तेव्हा हिरवळीचे पीक घेतले तर पुढील पिकास त्याचा जरूर फायदा होतो. उसाचे पाचट जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी खूप गरजेचे आहे. शेतातून निघणारा कोणताही काडीकचरा, पालापाचोळा ज्यावेळी आपण शेतातून बाहेर न काढता मातीतच कुजून देऊ तेव्हा आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब व नक्कीच वाढेल.
जमिनीची तयारी करताना पिकांची फेरपालट खूप महत्वाची आहे. एकच पीक लागोपाठ घेतल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा ऱ्हास होतो. द्विदल धान्य जसे की हरभरा, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग अश्या पिकांची फेरपालट केल्यास जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते. गेली काही वर्षे मी ऊस पिकानंतर हरभरा आणि सोयाबीन अशी पिकांची फेरपालट घेत आहे त्यामुळं नवीन केलेल्या लागणीत खतांची मात्रा एकदम संतुलित प्रमाणात लागत आहे. त्यासोबत जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारायला ही मदत झाली आहे.
आपल्याकडे एक म्हण आहे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार त्याच प्रमाणे जर जमिनीतून उत्पादन हवे असेल तर आधी माती समृद्ध केली पाहिजे. मातीचे आरोग्य जपले पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमची जमीन पहिलवान कराल तेव्हा तुमची पिके पहिलवान येतील.
डॉ. अंकुश चोरमुले ८२७५३९१७३१