Thursday, June 30, 2022

टॉमेटो पिकावरील विषाणू संसर्गाबाबत किसानसभेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आपण जाणताच की, महाराष्ट्रात टॉमेटो उत्पादक पट्ट्यात टोमॅटोची फळे मोठया प्रमाणात झाडावर खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी या संदर्भात खालील मागण्या केलेल्या आहेत.

1. टोमॅटोची फळे व झाडे कशामुळे बाधित होत आहेत या बाबतचे निदान करून यावर उपचाराबाबत राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन उपलब्ध व्हावे.

2. टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना यानुसार आर्थिक साहाय्य करावे.

3. टॉमेटो, भाज्या व फळ भाज्या या सारख्या सर्व नाशवंत पिकांना नैसर्गिक आपत्ती, रोगराई व दरा बाबतचे चढउतार या पासून संरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने यासाठी विमा योजना सुरू करावी.

राज्याच्या कृषी विभागाने या पार्श्वभूमीवर टोमॅटोचे नमुने घेतले. बेंगलोर येथील शासकीय प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठविले. मात्र अद्याप या बाबतचे निष्कर्ष शेतकऱ्यांना समजलेले नाहीत.

सातारा जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी IIHR बेंगलोर या संस्थेला पाठविलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत.

सदरच्या रिपोर्टमध्ये टोमॅटो पिकावर

1. कुकूंबर मोझॅक व्हायरस (सी.एम.व्ही.),
2. टोबॅको व्हेन डिस्टॉर्शन व्हायरस (टी.बी.व्ही.डी.व्ही),
3. ग्राऊंटनट बड नेक्रॉसीस व्हायरस व
4. टोमॅटो मोझॅक व्हायरस

हे 4 मुख्य व्हायरस आहेत असे नमूद करण्यात आले आहेत.

सदरच्या रिपोर्टमध्ये टॉमेटो पिकांवरील या विषाणूच्या संसर्गाने टॉमेटो पिकाचे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यास खालील कारणेही कारणीभूत असल्याचे सूचित होत आहे.

1. सी.एम.व्ही. या विषाणू सहित इतर विषाणूंचा एकत्रित परिणाम
2. फळ परिपक्व होण्याच्या काळात उच्च तापमान असणे
3. खतांचा व पोषकांचा अति वापर
4. शिफारशीत नसलेल्या टॉनिकचा वापर

टॉमेटो पिकावर झालेल्या संसर्गाचे साथीत रूपांतर होण्यास वरील घटक जबाबदार असल्याचे यावरून सूचित होत आहे. मात्र या बाबत शेतकऱ्यांच्या अनेक गंभीर शंका आहेत.

1. एकाच वेळी टोमॅटोची झाडे विविध पाच किंवा सहा विषाणूच्या संसर्गाने बाधित झाल्याचे रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांचा अनुभव पहाता वर सांगितलेल्या जवळपास सर्वच विषाणूंचा प्रादुर्भाव पूर्वीही टॉमेटो पिकांवर वेळोवेळी झालेला आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात यामुळे नुकसान होऊन संसर्गाची साथ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा प्रकार यापूर्वी नजीकच्या काळात घडलेला नाही. चार जिल्ह्यातील टॉमेटो उत्पादक क्षेत्र अशाप्रकारे संक्रमित होणे ही विशेष व गंभीर बाब आहे. संसर्ग अशाप्रकारे साथीच्या स्वरूपात इतक्या मोठ्या प्रमाणात कसा पसरला याचे समाधानकारक उत्तर रिपोर्टवरून मिळत नाही.

2. वाढलेल्या तापमानामुळे विषाणू संसर्गाचे साथीत रूपांतर झाले असे सूचित करण्यात येत आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी टॉमेटो उत्पादक पट्यातील तापमान कमी राहिलेले आहे. शिवाय एकाच तालुक्यात विविध भौगोलिक पट्टयात तापमानात मोठी भिन्नता आहे. अशा परिस्थतीत तापमान भिन्न असलेले चार जिल्ह्यातील क्षेत्र एकाचवेळी तापमानामुळे संसर्गाचे शिकार होणे संभवत नाही.

3. विषाणू संसर्गाची वाहक असलेल्या पांढरी माशी, मावा कीड यासारख्या संसर्ग माध्यमांचा मोठा फैलाव कोठेही आढळला नाही. असे असताना विषाणूचा संसर्ग जिल्ह्याच्या सीमा पार करून चार जिल्ह्यात पोहचला आहे. अशा परिस्थितीत नक्की या संसर्गाच्या वाहकाचे कार्य असे झाले व कोणत्या घटकामुळे झाले याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. आगामी काळात संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी ते आवश्यक आहे.

4. खतांचा व पोषकांचा वापर करताना टोमॅटो उत्पादक शेतकरी कधीही अतिरेक करत नाहीत. ठरलेल्या शेड्यूल प्रमाणेच रासायनिक खते व पोषके वापरतात. त्यामुळे कुठेही खतांचा किंवा पोषकांचा अतिरेक होत नाही. शिवाय असा अतिरेक झालाच तर टोमॅटोमध्ये सेटिंग अजिबात व्यवस्थित होत नाही हे शेतकऱ्याला देखील माहीत आहे. बहुतांश शेतकरी म्हणूनच माती परीक्षण करूनच खतांची मात्रा देतात. सदरचा दिसत असणारा रोग 1 किंवा 2 एकरवर नसून जवळपास 15,000 एकरापर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो पट्ट्यांमध्ये पसरलेला आहे. एकाच वेळेला या पट्ट्यातील सर्व शेतक-यांनी खतांचा किंवा पोषकांचा अतिरेकी वापर केला असल्याचा युक्तिवाद पटत नाही. शेतकऱ्यांनी मागील वर्षी ज्या पद्धतीने खते व पोषके यांचा वापर केला तसाच या वर्षीही केला. मागील वर्षी संसर्ग पसरला नाही मात्र या वर्षी तशीच खते, पोषाके वापरून संसर्ग पसरला आहे. सबब खते व पोषके यांचा चुकीचा वापर झाल्याने ही आपत्ती आली हा युक्तिवाद पटत नाही.

5. टॉमेटो पिकाच्या या नुकसानीला बियाणांमधील दोष कारणीभूत आहे काय या अंगाने चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कृषी विभागामार्फत बियाणांची सॅम्पल्स IIHR बेंगलोर येथे पाठविण्यात आले आहेत. लवकरात लवकर या बाबतचा रिपोर्ट प्राप्त होणे आवश्यक आहे.

संसर्गाचे साथीत रूपांतर झाले असल्याने पुढील टॉमेटो पीक हंगाम धोक्यात आला आहे. नवीन पीक घेताना कोणते बियाणे वापरावे तथा काय प्रतिबंधात्मक उपाय करावे याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या वरील शंकाही दूर होणे आवश्यक आहे.

शिवाय ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आपण आपल्या सरकारच्या वतीने या दृष्टीने पावले उचलावीत अशी विनंती आम्ही आपणास करत आहात.

धन्यवाद !

आपलेच

डॉ. अशोक ढवळे
जे.पी. गावीत
किसन गुजर
अर्जुन आडे
डॉ.अजित नवले

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची