Tuesday, January 31, 2023

रब्बी कांदा उत्पादन वाढीची सुत्रे

ऱाज्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने कांदा लागवड होते. या हंगामाचे उत्पादन तसेच कांद्याची साठवण क्षमता उत्कृष्ट असते. या कांद्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी सुधारित पद्धतीने व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे.

रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी “एन-2-4-1′ ही जात निवडावी. ही जात रब्बी हंगामात उच्च उत्पादनक्षमतेसाठी (350-450 क्विं/हे.) तसेच उत्तम साठवणूक क्षमतेसाठी (6-8 महिने) चांगली आहे. कांदा मध्यम चपटगोल आकाराचा असून, डेंगळे येणे, डबल कांदा इत्यादी विकृतीत प्रतिकारक आहे. शेतकरी या वाणांस गरवा, भगवा अथवा गावरान या नावाने ओळखतात. शेतकरी स्वतःच या जातीचे बीजोत्पादन करतात.

व्यवस्थापनाची सूत्रे

 • नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दर्जेदार रोपांची लागवड करावी. लागवड 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी.
 • लागवड करताना उत्तम निचऱ्याची, मध्यम खोल जमिनीची निवड करावी. विशेषतः सपाट वाफ्यात रोपांची कोरड्यात 15×10 सें.मी. अंतरावर दाट लागवड करावी. त्यानंतर हळवेपणाने पाणी द्यावे. त्यानंतर आंबवणी करताना न चुकता नांगे भरावेत.
 • लागवडीनंतर एक आठवड्यानंतर शिफारशीत तणनाशक फवारून गरजेनुसार एक महिन्यानंतर हात खुरपणी करून नत्रखताचा वर हप्ता द्यावा.
 • लागवडीनंतर 10, 25, 40 व 55 दिवसांनी नियमितपणे कीड, रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीडनाशकाच्या चार फवारण्या द्याव्यात.
 • लागवडीनंतर 55 दिवसांपर्यंत 8 ते 10 दिवसांच्या अंतराने नियमितपणे पाणी द्यावे. लागवडीनंतर 90 दिवसांनी कांद्याचे पाणी तोडावे.
 • लागवडीनंतर 110 दिवसांनंतर या जातीची पात नैसर्गिकपणे पडावयास सुरवात होते. कांद्याच्या माना 50 टक्के नैसर्गिकरीत्या पडल्यानंतर कांद्याची काढणी करावी. कांद्याची पात न कापता, पातीसकट कांदा वाफ्यात अशा रीतीने पसरवून ठेवावा की एका कांद्याचा गोट दुसऱ्या कांद्याच्या पातीने झाकला जाईल. कांद्याची पात शेतामध्ये 3 ते 5 दिवसांकरिता वाळवावी. त्यानंतर वाळलेली कांद्याची पात गोटापासून एक इंच अंतराची मान ठेवून पिळा देऊन कापावी. त्यानंतर कांदा हा झाडाच्या अथवा छपराच्या सावलीत तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी पातळ थरात (1-2 फूट) वाळवावा. या काळात कांद्यातील उष्णता निवळून बाहेरून पत्ती सुटते, आकर्षक रंग येतो. त्यानंतर कांद्याची प्रतवारी करून, सडलेले व मोड आलेले कांदे निवडून फेकून द्यावेत.
 • साठवणगृहात मध्यम आकाराचे एकसारखे कांदे ठेवावेत. कांदा साठविण्यापूर्वी दोन दिवसआधी कांदा चाळ झाडून स्वच्छ करावी. मॅन्कोझेबची (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.
 • साठवणुकीत दर महिन्याला एकदा अशी फवारणी केल्यास साठवणुकीत कांदा सडण्याचे प्रमाण खूपच कमी राहते. पावसाळी वातावरणात साठवणगृहाच्या तळाशी गंधकाची धुरी देण्याने कांदा सडत नाही. साठवणगृहामध्ये एकदा भरलेला कांदा बाहेर काढून हाताळू नये व त्यावरची पत्ती काढून टाकू नये. कांद्याची पत्ती संरक्षकाचे काम करत असल्यामुळे त्याचे जतन करणे अत्यावश्‍यक आहे. योग्य काळजी घेऊन कांदा साठविल्यास हा कांदा 6 ते 8 महिने उत्तम टिकतो.

बीजोत्पादन करताना

 • 15 नोव्हेंबरपर्यंत अजिबात मोड न आलेल्या कांद्याचे गोट निवडून, लाल कांद्याच्या बीजोत्पादन क्षेत्रापासून सुरक्षित विलगीकरण अंतरावर (साधारण 1.5 कि. मी. दूर) घ्यावे. जेणेकरून कांद्याची जैविक शुद्धता कायम राखली जाईल.
 • साधारण दर तीन वर्षांनंतर कांद्याची उत्पादकता, विकृतीची प्रतिकार क्षमता तसेच साठवणूक क्षमतेने घट झाल्यास कृषी विद्यापीठातून एन-2-4-1 या जातीचे मूलभूत बियाणे (ब्रिडर सीड) घ्यावे किंवा माहिती असलेल्या शेतकऱ्यांकडून खात्रीचे गोट वापरून सुधारित बीजोत्पादन घ्यावे.

अ) कांदा उत्पादनातील समस्या

 • कमी उत्पादकतेची कारणे
 • रोपांची लागवड ओल्यात व दीर्घ अंतरावर केली जाते. रोपांची लागवड उशिरा (15 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत) होते. लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांदरम्यान ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर फुलकिडे व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
 • 2) कांदा पोसण्याच्या काळात (लागवडीनंतर 60 ते 90 दिवस) नियमितपणे 8-10 दिवसांदरम्यान पाणी दिले जात नाही. पाण्याचा ताण बसल्यानंतर एकदम भरपूर पाणी दिले जाते. फेब्रुवारी-मार्च दरम्यान शीत लहरीमुळे मोठ्या प्रमाणावर डेंगळे येतात.

अल्प दर्जाचे उत्पादन व साठवणूक क्षमता

 • निचरा न होणाऱ्या भारी जमिनीत लागवड, असंतुलित रासायनिक खतांचा वापर, भरखते देताना नत्रखतांचा अतिप्रमाणात वापर, लागवडीनंतर 60 दिवसांच्या नंतर कांदा पोसण्याच्या कालावधीत नत्र खतांचा वापर, कांदा काढणीपूर्वी तीन आठवडे पाणी न तोडणे, कांदा काढणीनंतर लगेच कांद्याची पात कापून ढीग लावून कांदे वाळविणे.
 • सावलीत तीन आठवडे कांदे न वाळविता, प्रतवारी न करता, उष्ण व दमट कांदे साठवणगृहात भरणे, कांदा साठवणगृह कांदे भरण्याआधी व भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला मॅन्कोझेबची (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी न करणे, साठवणगृहाची रुंदी 4 फुटांपेक्षा तर उंची 5 फुटांपेक्षा जास्त ठेवणे. साठवणगृहाच्या छपरांची उंची साठवलेल्या कांद्यापेक्षा तीन फुटांपेक्षा कमी अंतरावर असणे, साठवणगृह उंच जागेवर नसणे व त्याचा पाया सिमेंटच्या अथवा कडक जमिनीवर नसणे, साठवण गृहाच्या कप्प्याची उंची जमिनीपासून दोन फूट नसल्यामुळे, तळाला हवा खेळती राहण्याची व्यवस्था नसणे.

कांदा शेतीमधील आव्हाने

कांदा हे वातावरणास संवेदनशील पीक असल्याने, हवामान बदलामुळे कांद्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.

 • वाढीव तापमान, पाणीटंचाई, गारपीट व वादळी पाऊस यांच्यापासून बचाव करून जास्त उत्पादन घेण्यासाठी, रब्बी हंगामात कांद्याची लागवड तसेच बीजोत्पादनासाठी गोट लागवड 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीतच पूर्ण करावी.
 • हवामानातील बदलांना तोंड देण्यासाठी लवकर तयार होणारी, कमी कालावधीची रब्बी कांद्याची जात (90-100 दिवस) तयार करावी लागणार आहे.
 • राज्यातील पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. पूर्व हंगामी उसाच्या पट्टा पद्धतीत पांढऱ्या कांद्याचे रांगडा हंगामात उत्पादन झाल्यास, कांद्याचे निर्जलीकरणाचे प्रक्रिया केंद्रे विकसित करणे शक्‍य आहे. त्याकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला “फुले सफेद’ ही जात योग्य आहे. मात्र रब्बी हंगामातील उसाचे व कांद्याचे योग्य पीक नियोजन करणे अत्यावश्‍यक आहे.
 • सूक्ष्म सिंचनाचा (ठिबक किंपर सूक्ष्म तुषार) वापर करावा. सुधारित कांदा चाळीचा वापर करावा.

कांद्याचे बाजारभाव वर्षभर नियंत्रित ठेवण्यासाठी

 • प्रत्येक हंगामात रोपांच्या पुनर्लागवडीनंतर लागवडीची नोंद एका महिन्यात कृषी विभागातर्फे इंटरनेटवर झाल्यास राज्यातील तालुकानिहाय कांदा लागवडीची स्थिती लक्षात येईल, त्यानुसार बाजारपेठेचे नियोजन शक्‍य आहे.
 • प्रामुख्याने रब्बी हंगामातील कांद्याच्या साठवणुकीची नोंद करणे शेतकऱ्यांना सक्तीची करावी.
 • कांदा शेतकऱ्यांचे गट स्थापून त्यांना देशातील बाजार भावाची माहिती देण्याचे प्रशिक्षण द्यावे.
 • कांदा निर्यातीसाठी दीर्घकाळ धोरण आखावे. मुख्यतः जानेवारी ते मे महिन्यापर्यंत निर्यात चालू ठेवल्यास कांदा उत्पादकास योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होईल.

भारतातील कांद्याची उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणे

 • भारतात वापरल्या जाणाऱ्या जाती कमी दिवसांत तयार होणाऱ्या आहेत (90 ते 120 दिवस), तर युरोप अमेरिकन देशांत जास्त दिवस असणाऱ्या (160 – 180 दिवस) जाती आहेत.
 • भारतात प्रामुख्याने रब्बी हंगामातील कांदा लागवडीची उत्पादकता अधिक आहे. त्याचप्रमाणे साठवणक्षमतासुद्धा उत्कृष्ट असते; परंतु खरीप हंगामात ढगाळ वातावरण, उष्ण व दमट हवामान अनियमित पाऊस, तण व रोग-किडींचा प्रादुर्भाव यामुळे खरीप कांद्याची उत्पादकता लक्षणीयपणे घटते. रांगडा हंगामात वातावरण कांदा वाढीसाठी प्रतिकूल असल्यामुळे कांद्यापेक्षा कांद्याची पात जोमाने वाढते. त्यामुळे 20 ते 30 दिवसांचा कालावधी वाढल्यामुळे मोठ्या आकाराचे जाड मानेचे कांदे, जोड कांदे, डेंगळे, काढणीनंतर 15 दिवसांत कांद्यांना मोड येणे इत्यादीमुळे उत्पादनाचा दर्जा मोठ्या प्रमाणावर खालावतो.
 • हंगामनिहाय शिफारस केलेल्या सुधारित जातींचा अत्यल्प वापर (उदा. खरीप ः फुले समर्थ/ बसवंत 780, रांगडा, फुले समर्थ आणि रब्बी एन-2-4-1).
 • अनियमित बीजोत्पादन – हंगामनिहाय जरी वेगवेगळ्या जाती विकसित केलेल्या आहेत तरी या सर्वांकरिता बीजोत्पादन फक्त रब्बी हंगामातच घ्यावे लागते आणि फुलांचे परागीकरण हे केवळ मधमाश्‍यांमार्फत होत असल्या कारणाने जर 1.5 किलोमीटर लांबीचे “विलगीकरण अंतर’ उपलब्ध न झाल्याने स्थानिक बीजोत्पादनामध्ये जैविक शुद्धता मोठ्या प्रमाणावर घटते.
 • कांदा पिकात काढणीपूर्व व काढणीनंतरच्या सुधारित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांकडून अत्यल्प वापर त्यामुळे उत्पादन व साठवणुकीत मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
 • अनियमित बाजारभाव, अनियंत्रित लागवड व साठवण, अनियमित कांदा निर्यात धोरण.
 • बदलत्या हवामानाचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

लागवड क्षेत्र

 • कांदा पिकवणाऱ्या राज्यांत क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर.
 • देशाचे 25 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात. नाशिक, पुणे, सातारा, नगर, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर. महाराष्ट्रातील 37 टक्के, तर देशातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात.
 • कांदा उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत भारत जगात अग्रेसर असला, तरी प्रतिहेक्‍टर उत्पादकतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक बराच खाली लागतो.
 • भारतात खरीप हंगामातील उत्पादकता प्रतिहेक्‍टरी 8 टन आहे, तर रब्बी हंगामाची उत्पादकता प्रतिहेक्‍टर 16 टन आहे. इतर प्रगत देशांत उदा. अमेरिका (42.9 टन), नेदरलॅंड (39.1 टन), चीन (22.2 टन) मध्ये कांद्याची उत्पादकता आपल्यापेक्षा अधिक आहे.
 • डॉ. विनायक जोशी कांदा पैदासकारमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची