निवळ हिरवळीचे पीक घ्यायचे असेल तर धेंच्या, ताग घेतलेले कधीही चांगले, जर ऊस पिकामध्ये हिरवळीच्या खतासाठी आंतरपीक घ्यायचे असेल तर त्यामध्ये ताग घेणे कधीही चांगले.कारण तागाची वाढ धेंच्याच्या तुलनेत कमी प्रमाणात राहते. त्यामुळे मुख्य पिकाला किंवा ऊसाला त्याचा मार बसत नाही.
ऊसाची लागवड केल्यानंतर लगेच ताग टोकू नका. जर लगेच ताग केला तर, त्याचा परिणाम ऊसाच्या फुटव्या होतो .त्यासाठी ऊसामध्ये ताग टोकत असताना ऊस लागवड केल्यापासून ४० ते ४५ दिवसांनी ऊसाच्या काकरीच्या दुसऱ्या बाजूला वरंब्याला घासून सरीमध्ये ६ इंच अंतरावरती ताग टोकून घ्या. रोप लावण करणार असाल तर रोप लावण केल्यानंतर ३० दिवसांनी ताग टोकून घ्या.ताग टोकल्यापासून ४५ ते ५० दिवसांनी फुलकळी दिसू लागल्यानंतर गाडून घ्या. ताग जर प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर त्याची वसब ऊसावरती पडून फुटव्याला मार बसते. हेक्टरी तागापासून ८० ते ९० किलो नत्र मिळते.व एकरी ३२ ते ३६ किलो नत्र मिळते.
मागे एकदा मी मे महिन्यामध्ये ताग केलेले होता.परंतु तो काय व्यवस्थित आला नाही. फारच उंची कमी आली होती.तागाच्या पानावर तुडतुडेचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आलेला, त्यामुळे ताग गाडते वेळी संपूर्ण पानगळ झालेली होती. व फक्त काड्या राहिल्या होत्या त्यामुळे मे जून महिन्यात हिरवळीचे पीक घ्यायचे असेल तर धेंच्या तागापेक्षा कधीही सरस येतो.ऊस पिका मध्ये हिरवळीच्या खतासाठी धेंच्या पेक्षा तागाचा पर्याय चांगला आहे .त्यासाठी आडसाली,पूर्व हंगामी,सुरू लागणी मध्ये ताग घेऊ शकता.ज्या शेतकऱ्यांना विसावा देने शक्य नाही त्या शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे फेरपालट करून ऊस पीक घ्यावे.
- श्री. सुरेश कबाडे.
- प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,
- रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
- मोबा:- 9403725999