मागील वर्षच्या तुलनेत या वर्षी खरिफ हंगामात खूपच समाधानकारक पाऊस झाला आणि त्याचा फायदा शेतकरीबंधूना झालेला दिसून येत आहे.. सध्या परतीच्या पावसाने सुद्धा शेतकऱ्याच्या रब्बीच्या आशा द्विगुणित केल्या आहेत. आता खरिपाची काढणी आणि रब्बीची सुरवात या स्टेज ला शेतकरी आहेत. रब्बी हंगामाचा विचार करता हरभरा हे योग्य पीक आहे. तसेच ते द्विदल वर्गीय असल्यामुळे जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते. हरभरयाचा उपयोग रोजच्या जीवनात डाळीचे पीठ अथवा बेसन म्हणून केला जातो शिवाय हरभऱ्या पासून म्यॅलिक आम्ल सुद्धा संकलित केले जाते. हरभरा हे पीक कमी पाण्यात येणारे पीक असल्यामुळे शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामासाठी हरभरा या पिकाची निवड करण्यास हरकत नाही.
लागवडीसाठी जमीन
हरभरा पिकास मध्यम ते भारी (४५ ते ६० सें मी खोल) पाण्याचा योग्य निचरा होणारी, भुसभुशीत, कसदार जमीन आवश्यक असते. वार्षिक ७०० ते १००० मि.मि. पर्जन्य असणाऱ्या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात ओलावा भरपूर टिकून राहतो. अश्या जमिनीत जिरायत हरभऱ्याचे पिक चांगले येते. उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. हलकी चोपण अथवा पाणथळ क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये. हरभऱ्यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते. विशेषतः पिक २० दिवसाचे झाल्यानंतर किमान तापमान साधारणतः १०० ते १५० सें. ग्रे. असेल तर पिकाची वाढ होऊन भरपूर फांद्या, फुले आणि घाटे लागतात. असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. साधारणतः ५.५ ते ८.६ सामू असणाऱ्या जमिनीत हरभरा पिक चांगले येते. हे साधण्यासाठी जमिनीची मशागत व पेरणीची वेळ या बाबी वेळेवर होण्याला महत्व आहे.
पूर्व मशागत
हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. खरीप पिक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (२५ सेमी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळव्याच्या २ पाळ्या द्याव्यात. खरीपात शेणखत किवा कंपोस्ट खत दिले असल्यास वेगळे खत देण्याची गरज नाही. परंतु ते दिले नसल्यास हेक्टरी १० टन कुजलेले शेणखत किवा कंपोस्ट खत नांगरणी पूर्वी जमिनीवर पसरावे. कुळव्याच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर महिन्याचे अखेरीस हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.
पेरणीची वेळ
जमिनीतील ओलावा आणि हवेतील तापमान याचा विचार करून पेरणीची वेळ निश्चित करावी लागते. आपल्याकडे १५ ऑक्टोबर नंतर सहसा पाऊस पडत नसल्याने जिरायत क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी खरीपाचे पिक निघाल्या बरोबर शक्यतो सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. हरभऱ्याचे बियाणे १० सें. मी. खोल पडतील याची दक्षता घ्यावी. यासाठी अश्या जमिनीत खरीपात लवकर तयार होणारी पिके घ्यावीत. बाजरी, तीळ, मूग, उडीद, चवळी, घेवडा, सुर्यफुल या पिकांची पेरणी जूनच्या पंधरवड्यात झाली असल्यास सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात हरभरा पेरणे शक्य होते. हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणाऱ्या पावसाचा जिरायत हरभऱ्याच्या उगवणी व वाढीसाठी चांगला उपयोग होतो. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभऱ्याची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. तसेच बागायत क्षेत्रात ५ सें. मी. खोलीवर हरभरा पेर केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशिरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या/ फुले/ घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभरऱ्याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. व दोन रोपांतील अंतर १० सें. मी. राहील अश्या पद्धतीने पेरणी करावी म्हणजे प्रती हेक्टरी अपेक्षित रोपांची संख्या मिळते.
सुधारित वाण :
सुधारीत वाण | कालावधी | उत्पादन (क्विं/हे) | वैशिष्टये |
विजय | जिरायत: 85 ते 90 दिवस बागायत: 105 ते 110 दिवस | जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 14-15 सरासरी: 14.00 बागायत प्रायोगिक उत्पन्न: 35-40 सरासरी: 23.00 उशिरा पेर प्रायोगिक उत्पन्न: 16-18 सरासरी: 16.00 | अधिक उत्पादन क्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्यांंकरिता प्रसारित. |
विशाल | 100 ते 115 दिवस | जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 14-15 सरासरी: 13.00 बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-35 सरासरी : 20.00 | आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्राकरिता प्रसारित. |
दिग्विजय | जिरायत: 90 ते 95 दिवस बागायत: 105 ते 110 दिवस | जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 14-15 सरासरी: 14.00 बागायत प्रायोगिक उत्पन्न: 35-40 सरासरी: 23.00 उशीरा पेर प्रायोगिक उत्पन्न: 20-22 सरासरी: 21.00 | पिवळसर तांबूस, टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्राकरिता प्रसारित. |
विराट | 110 ते 115 दिवस | जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 10-12 सरासरी: 11.00 बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-32 सरासरी: 19.00 | काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्राकरिता प्रसारित. |
कृपा | 105 ते 110 दिवस | बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-32 सरासरी : 18.00 | जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, दाणे सफेद पांढऱ्या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांकरिता प्रसारित. |
फुले विक्रम | जिरायत: 95 ते 100 दिवस बागायत: 105 ते 110 दिवस | जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 16-18 सरासरी: 16.00 बागायत प्रायोगिक उत्पन्न: 35-42 सरासरी: 22.00 उशीरा पेर प्रायोगिक उत्पन्न: 20-22 सरासरी: 21.00 | वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पदधतीने (कंबाईन हार्वेस्टरने) काढणी करण्यास उपयुक्त वाण, अधिक उत्पादन क्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्राकरिता प्रसारित. |
पीकेव्हीके 2 | 110 ते 115 दिवस | बागायत सरासरी: 16-18 | अधिक टपोरे दाणे असणारा काबुली वाण, महाराष्ट्राकरिता प्रसारित. |
पीकेव्हीके 4 | 105 ते 110 दिवस | बागायत सरासरी: 12-15 | जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, महाराष्ट्राकरिता प्रसारित. |
बीडीएनजी 797 | 105 ते 110 दिवस | जिरायत: 14-15 बागायत: 30-32 | मध्यम आकाराचे दाणे मराठवाडा विभागासाठी प्रसारित. |
साकी 9516 | 105 ते 110 दिवस | बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-32 सरासरी: 18-20 | मध्यम आकाराचे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्यांकरिता प्रसारित. |
जाकी 9218 | 105 ते 110 दिवस | बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-32 सरासरी: 18-20 | पिवळसर तांबूस, टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य, महाराष्ट्राकरिता प्रसारित. |

बियाणे प्रमाण
हरभऱ्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्यांचे प्रमाण वापरावे लागते म्हणजे हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षित तेवढी मिळते. फुले जी १२ या लहान दाण्याच्या वाणाकरिता ६० ते ६५ किलो, विजय, श्वेता या मध्यम दाण्यांच्या वाणाकरिता ६५ ते ७० किलो, तर विश्वास, विशाल आणि विराट या टपोऱ्या दाण्यांच्या वाणाकरिता १०० किलो प्रती हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षित (३,३३,३३३) मिळवण्याकरिता पेरणी किंवा टोकण, दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. आणि दोन रोपातील अंतर १० सें. मी. ठेऊन करावी. या अंतरावर पेरणी केल्यास अधिक उत्पादन मिळण्यास उपयोग होतो अन्यथा हरभरा रोपांची संख्या अतिशय विरळ होऊन अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळण्यास अडचण येते.

बीजप्रक्रिया आणि जीवानुसंवर्धन
बियाणांची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाणास ५ ग्रॅ. ट्रायकोडर्मा चोळावे. यानंतर प्रती १० ते १५ किलो बियाणास रायझोबियम जीवाणू संवर्धकाचे २५० ग्रॅ. वजनाचे एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. (गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी १ ली. पाण्यात १२५ ग्रॅ. गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे.) बियाणे १ तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभर्याच्या मुळांवरील ग्रंथींचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषुन घेऊन पिकास उपलब्ध केला जातो. आणि त्यायोगे पीकाचे उत्पादन वाढते.
खते आणि आंतरमशागत
सुधारित हरभऱ्याचे नवे वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देतात त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते. प्रती हेक्टरी चांगले कुजलेले १० ते १५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळव्याच्या वेळी शेतात पसरावे. त्यामुळे ते जमिनीत चांगले मिसळले जाते. खरीपात शेणखत दिले असल्यास पुन्हा रब्बी हंगामात हरभऱ्याला शेणखत देण्याची गरज नाही. पिकाची पेरणी करताना २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद प्रती हेक्टर म्हणजेच १२५ किलो डायअमोनिम फॉस्फेट (डी.ए.पी.) अथवा ५० किलो युरिया आणि ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रती हेक्टरला द्यावे. प्रती हेक्टर ५० किलो पालाश दिले असता रोग प्रतिकारक क्षमता वाढते असा अनुभव आहे. हरभऱ्याला जस्त या शुक्ष्म द्रव्याचीही गरज असते म्हणून २५ किलो झिंक फॉस्फेट आवश्यक आहे. त्यानंतर पिक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरियाची फवारणी करावी त्यानंतर १० ते १५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी. यामुळे पिक उत्पादनात वाढ होते.
तण व्यावस्थापन
पिकाच्या जोमदार वाढीसाठी पिक सुरुवातीपासूनच तणविरहीत ठेवणे आवश्यक आहे. पिक २० ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी करावी आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहते व त्यायोगे पिक वाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्यतो वाफश्यावर करावी. कोळपणी नंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. पहिल्या ३० ते ४५ दिवसात शेत तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. यासाठी गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. मजुराअभावी खुरपणी कारणे शक्य नसल्यास फ्ल्युक्लोरॅलीन किंवा पेंडीमीथिलीन या तणनाशकाचा वापर करावा.
पाणी व्यवस्थापन
जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत २०-२५ दिवसांनी पहिले, ४५-५० दिवसांनी दुसरे आणि ६०-६५ दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. हरभरा पिकल सर्वसाधारणपणे २५ से.मी. पाणी लागते. प्रत्येक वेळी प्रमाणशीर पाणी (७-८ से. मी.) देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पिक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते. म्हणून हरभरयास योग्य वेळी व आवश्यक तेवढे पाणी देणे फारच महत्वाचे असते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन
हरभरा पिकाचे घाटेअळी पासून होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने खालील प्रमाणे उपाययोजना करावी.
पीक पेरणीपूर्वी
- खरीप हंगामातील पिकावर घाटेअळीचा उपद्रव झालेले असल्यास अश्या शेतात शक्यतो हरभऱ्याचे पीक घेवू नये.
- पेरणीपूर्वी जमिनीची खोलवर नांगरट करून कुळवाच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात म्हणजे घाटे अळीचे कोष पृष्ठभागावर येवून त्याचा सूर्याच्या उष्णतेने किंवा पक्षांच्या भक्षस्थानी पडून नाश होतो.
- हरभऱ्याची पेरणी वेळेवर करावी. पेरणीकरता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. पेरणी करताना पक्षी थांब्यासाठी हरभऱ्याच्या बियाण्यात २०० ग्रम ज्वारीचे दाने मिसळून पेरणी करावी.
पिक रोपावस्थेत व घाटे भरताना…
- एका हेक्टर क्षेत्रात ५ कामगंध सापळे बांबूच्या सहाय्याने पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर लावावेत.
- पेरणी करताना ज्वारीचे दाने मिक्ष केले नसल्यास शेतात पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंच टी आकाराचे हेक्टरी ५० पक्षी थांबे उभारावेत.
- पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरताना अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शक्य असल्यास अळ्या रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्याचा नाश करावा.
- सुरवातीच्या वाढीच्या काळात ५% निंबोळी अर्काची फवारणी केली असता योग्य प्रकारे नियंत्रण भेटते.
- घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एच. ए. एन. पी.व्ही. ५०० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी फवारणी करावी.
- बिव्हेरिया बॅसियाना १% विद्राव्य ३ किलो ५०० लिटर पाण्यात किंवा ६० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- कीड नियंत्रणाची वेळ निशिच्त करण्यासाठी पिकाची नियमित पाहणी करावी. पानावर बारीक बारीक पांढरे डाग दिसून येताच अथवा पिकाच्या एक मित्र लांब ओळीत १-२ अळ्या आढळून आल्यास अथवा ५% घाट्यावर अळीचा उपद्रव दिसून येताच अथवा सलग २ ते ३ दिवस प्रत्येक सापळ्यात ८-१० पतंग येत असल्यास किटकनाशकाची फवारणी करावी. घाटे अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर पोहचल्यास १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी पीक फुलोर्याच्या अवथेत असताना करावी तर दुसरी फवारणी त्यानंतर १५ दिवसांनी करावी.
कीटकनाशकाचे नाव | प्रमाण प्रती १० लिटर पाण्यासाठी |
क्वीनॉलफॉस २५ ईसी | २० मिली |
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी | १० मिली |
इमामेक्टिन बेन्झोंएट ५ एस जी | ४.५ ग्रॅम |
क्लोरांट्रीनीलीप्रोल १८.५ एस सी | २.५ मिली |
- अधिक माहिती साठी संपर्क
- डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले 82753 91731
- श्री. अमोल राजन पाटील
अतिशय सुरेख माहिती आहे. याचा आम्हाला नक्की फायदा होईल. धन्यवाद
खुप चांगली माहिती आहे सर. वाचून अंमलबजावणी करणार्या सर्व शेतकऱ्यांच्या तर्फे तुमचे शतशः आभार .