Wednesday, June 29, 2022

सुभाष पाळेकरांच्या अस्तित्वहीन व फसव्या झीरो बजेट शेतीचे सरकारी गौडबंगाल

डॉ.निलेश पाटील

पाळेकरांच्या कथीत झीरो बजेट शेतीच्या फसव्या तंत्राबाबत अनेक वर्षांपासून माहीती ठेऊन आहो. नेमके आताच या विषयी प्रकर्षाने मत मांडायचे कारण असे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी देशाच्या अर्थसंकल्पात भारत सरकार झिरो बजेट शेती ही संकल्पना सत्ताधाऱ्यांचे जणू अधिकृत शेती धोरण असल्याचे जाहीर केले.मुळात अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान “झीरो बजेट शेती” या संज्ञेचा उल्लेख केला त्याच्या कितीतरी पूर्वी पाळेकरांनी आपल्या या अस्तित्वात नसलेल्या तंत्राचे नाव बदलून सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्र असे केले होते.जर पलेकरांनाच आपल्या तंत्राचे नाव बदलावे लागले असेल तर सरकारने एवढी अनभिज्ञतेत या अस्तित्वात नसलेल्या तंत्राला शेतीची पुढची दिशा म्हणून जाहीर का केले असावे? या साठी हा जनजागृतीचा खटाटोप!
अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख झाला व झीरो बजेट शेतीच्या संशोधन व प्रसारासाठी निधीची तरतूद जाहीर झाली अन प्रसिद्धीलोलुप पाळेकर लेखमाला लिहीत सुटले.त्यांच्या झीरो बजेट शेतीच्या कथीत तंत्राप्रमाणे या लेखमालांतील मुद्देही तेवढेच हास्यास्पद, वाचून हसावे की रडावे सुचत नाही.
भारत सरकारने देशातील शेतकऱ्यांचे उत्पंन्न दुप्पट करण्याच उद्दीष्ट या पंचवार्षिकमध्ये आमच्या समोर असल्याचे सांगितले होते.या वर क्षणभर विचार केला असता कुण्याच्याही लक्षात येईल की कुणाचेही उत्पन्न वाढवणे आणी त्यातल्या त्यात देशातील साठ टक्के लोकांचे उत्पन्न दुप्पट करणे हा सरकारचा धंदा किंवा एवढा सरकारचा आर्थीक आवाका तरी आहे का? शेतकरी आपले उत्पन्न स्वतःच घेत असतात सरकार मग ते कुठल्याही पक्षाचे असो अनेक गोंडस नावांखाली त्यांच्या उत्पन्नाचा क्षमतांच्या आड आजपावतो तरी येत राहीले आहे.झीरो बजेट शेतीचा सरकारी प्रपोगंडा ही अगदी याच धाटणीचा!
पाळेकरांच्या मते सरकारच्या लक्षात आले की पाळेकर हे झिरो बजेट शेतीच्या प्रसार व प्रचाराचे काम जोरात करत आहेत.. आणि शुन्य खर्चाची शेती जीला बाहेरून काहीही विकत आणून टाकावे लागत नाही सर्वच निविष्ठांसह घरच्या घरीच फक्त एका देशी गाईवर शेती करता येते … आणि म्हणूनच सरकारने या झिरो बजेट शेतीचा शेतकऱ्यांनी वापर करून सरकारचा जो शब्द होता की शेतकऱ्यांचे उत्पंन्न दुप्पट करायचे यातून मुक्तता मिळणार होती.असे पाळेकर सांगत आहेत.(खर्च 0 दूप्पट भाव कितीही 0000)
पण यामागील सत्यता पाहीली असता या झिरो बजेट शेतीचा प्रसार हा शुन्य खर्चात होतो अशी टीमकी ज्या पाळेकरांनी गेली १९ वर्षे वाजवली त्यांनाच १ वर्षापूर्वी साक्षात्कार झाला की हे झिरो बजेट शेती हे नाव गेली १९ वर्षे भावनेच्या भरात दिले कारण काय तर या झिरो बजेटमध्ये शेती करताच येत नाही व या पध्दतीमध्ये खर्चही करावाच लागतो असे कारण देवून स्वतःचे नाव स्वतःच या शेती पध्दतीला देवून जनआंदोलन नावाने हि एक चळवळ आहे असे शहरी लोकांना व दुसऱ्या कुठल्या उद्योगातून नव्याने शेती करू पाहणाऱ्यांना पाळेकर सांगत सुटतात. पण या पाळेकरांची प्रसिध्दीलोलुपता व पुस्तके विकून कोट्यवधींची माया जमवण्यासाठीची ही वळवळ असल्याचे कधी काळी त्यांच्या सोबत काम करणारे अनेक लोक बोलून दाखवतात.
पाळेकरांना स्वतःला कधीही हे झीरो बजेट शेतीचे कथीत तंत्रज्ञान फायद्याचे असल्याचे सिद्ध करता आले नाही,त्यांची मुले ही शेती करत नाही.गावात किंवा परिसरात त्यांचा आदर्श घेऊन एकाही शेतकऱ्याच्या आयुष्यात परिवर्तन घडवता आले नाही आणी हे निघाले देशभरातल्या शेतकऱ्यांना शिकवायला. चळवळ म्हणून उत्साही शहरी लोकांना जमवायचे व त्यांच्या माध्यमातून शिबिरे व शिवारफेऱ्या आयोजीत करून प्रसिध्दी व पुस्तके विक्रीतून माया जमवायची हे पाळेकरांचे उद्योग! त्यासाठीच त्यांची सर्व एकाधिकारशाही असल्याचे पाळेकर पीडित बोलून दाखवतात.
ज्या पाळेकरांनी शेती करणे सोडले व एकाही मुलाला या झिरो बजेट शेती पध्दतीने कुठलेही मॉडेल तसेच पिक घेता आले नाही. दुसऱ्याच व्यक्तिकडून स्वतःची जमीन शुध्द रासायनिक पध्दतीने पिकवतात ते जगाला नैसर्गिक शेतीचे बाळकडू पाजायला निघालेत… म्हणजे दुसऱ्यास सांगे शहाणपण पण स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी अवस्था पाळेकरांची आहे. कुणाला पटत नसेल तर यांच्या शेतावर भेट देवून या… शेजारी पाजारीच काय यांच्या गावात एकही शेतकरी यांच्या झिरो बजेट पध्दतीने शेती करत नाही.. का करत नाही विचारल्यास सरळ म्हणतात की याने ( पाळेकरनी) काय पिकवल हे पाहीलय .. आणि तशा पध्दतीने पिकवून आम्हाला आत्महत्या करायची नाही.. अस सरळ सरळ म्हणतात…

२००० साली ईश्वराने अगदी नवे कोरे तंत्रज्ञानमाझ्या हाती सोपवले असे पाळेकर बदमाशपणे सांगत सुटतात.
२००० सालापर्यंत पाळेकर नैसर्गीक शेतीची माहिती संकलीत करत होते.संकलन पूर्णत्वास गेले , कोणतेही प्रयोग यशस्वी झाल्याचे दाखले नाहीत.आणि मग चला मुरारी हिरो बनने.. सारखी यांची शेतकऱ्यांना मुर्ख बनवून पुस्तके विक्रीचा व्यवसाय सुरू केला..आणी तो इतका प्रचंड वाढला की लोकांना हे झिरो बजेट तंत्र म्हणजे अफलातून काहीतरी आह् व फक्त एका गाईवर ३० एकर शेती वगैरे तसेच इतर शेती तंत्रे, अभ्यासक, तज्ञ यांनी मांडलेले सिध्दांत,प्रयोग कसे खोटे आहेत हे अगदी संमोहीत झाल्यासारखे नव्याने शेती करू पाहणारे लोकही यांच्या शिबीरात ऐकायचे.मग इथूनच या शिबीरार्थी शेतकऱ्यांच्या लयाला जाण्याची सुरूवात व्हायची, कारण यांच्या मते शेतीला ,पिकाला वरून कोणत्याही खताची आवश्यता नसते , फक्त एकरी २०० किलो घनजीवामृत व प्रति महिना २०० लि जीवामृत दिले व काही नैसर्गिक किटकनाशके,बुरशीनाशके,टॉनिक वापरले की पिक रासायनिकच्या तुलनेत जास्तच पिकते वरून पिकाला पाण्याची , विजेची गरज फक्त १०% च… मग काय काही नव शेतकरी जोमाने जीवामृत ढवळायला लागतो, घनजीवामृत तयार करायला लागतो पण शेवटी उत्पादन पाहील्यास {सूरूवातिच दोन वर्ष सोडल्यास}रासायनिक एवढे ही न येता त्याच्या २५% च उत्पादन हातात.मग तो शेतकरी या पद्मश्री वाल्या बाबांच शिबीरातील शब्द आठवतो की फक्त चार- पाच वर्षेच आपल्याला या झिरो बजेट तंत्राने अचूक शेती करायची मग नंतर काहीही निविष्ठा न वापरता फक्त बियाणे पेरायचे व पिक काढून घ्यायचे एवढच करायच बाकी.मग तो शेतकरी पुन्हा नवीन वर्षी पुन्हा नवीन जोमाने कामाला लागतो पुन्हा अपयश यावेळी मात्र उत्पादन २०% च येतं.पुन्हा पुन्हा प्रयत्न करत रहातो पुन्हा पुन्हा अपयश येतच रहाते यांना विचारल्यास तंत्र व्यवस्थित राबवले नसाल वगैरे भूलथापा मारून त्या शेतकऱ्याची बोळवण केली जाते. त्याच्या कुटुंबासाठी नाकर्तेपणा सिध्द होवून घरच्या लोकांच्या शिव्या शाप खावे लागतात व झीरो बजेट तंत्राने शेती करू पाहणारे शेवटी लोकांमध्ये विनोदाचे पात्र बनतात. वेगळेच. शेवटी तो शेतकरी आपल्याच मुर्खपणामुळे आपली वाट लागली म्हणून गप्पगुमान पूर्वी सारखी शेणखत व संतुलित रासायनिक, नवनवीन बियाण्यांचा वापर करून अतिशय उत्पादन वाढवून आपला मार्ग पकडतो .तो पर्यंत झीरो बजेट च्या नादी लागून त्याचे प्रचंड हाल झालेले असतात.
आणि हे सांगतात की ईश्वराने ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला येथे पाठवले .शेतकऱ्यांना लवकर देवाघरी पोहोचवण्यास हातभार लावणारे,त्याला कफल्लक बनवून स्वतः पुस्तके विक्रीतून माया जमवणारे पाळेकर हे भोंदू बाबा आहेत,हे थोडाही विचार केला तरी लक्षात येण्यास वेळ लागत नाही.
घराच्या शेताच्या मोहात अडकण्यासाठी ईश्वराने यांना पाठवले नाही असे ते आता सांगत आहेत. आतील आवाज प्रमाण मानून गाव ,शेतीचा मोह दूर करून पूर्ण वेळ फक्त चळवळीला वाहून घ्यायचे व गाव शेती सोडून बाहेर निघाल्याचे ते सांगतात. महिन्यातून पंचवीस दिवस शिबीरे,चर्चासत्रे,बैठका,शिवारफेऱ्यात स्वतःला झोकून दिले म्हणतात.
स्वतःच्या शेतीत प्रयोग करत असताना नापिकीशिवाय काहीही हाती आले नाही,पण आज शिबिरातून होणाऱ्या पुस्तके विक्रीतून कोट्यवधींची माया जमवत आहेत. चांगले वक्तृत्व लाभल्याने शेतकऱ्यांना माझ्याकडे काहीतरी जगावेगळे आहे व इतर लोक मुर्ख आहेत हे दाखवण्यासाठी व प्रत्येक वेळी नवनवीन शेतकरी शिबीराच्या जाळ्यात येत गेले तसतसे पुस्तकांची विक्रीही जोमात चालू राहीली .पाळेकर शिबीरात तर दोन्ही मुले शिबीराबाहेर पुस्तके विक्रीत गुंग वरून लोकांना हे ही पटवून द्यायचे की मी शिबीरासाठी १ रूपयाही मानधन घेत नाही पण यांची पुस्तक विक्री मात्र ७-८ लाखांची एका शिबीरात तरी व्हायचीच व्हायची, वरून हि चळवळ म्हणायची,
पैशाचा हव्व्यास एवढा झाला की आपण सांगतोय ते जगावेगळ तंत्र फेल जातय हे कळूनही पुन्हा पुन्हा शिबीरे व शिवारफेऱ्या चालूच ,(कधीही पाच सहा वर्षापासुन या तत्राने शेती करणार्‍याकडे शिवार फेरी नाही ,फक्त सहा महिण्यापासून कींवा मागील वर्षापासून झिरोबजटने सूरूवात केलेल्या शेतातच} उद्देश फक्त पुस्तकांची विक्री व यातून माया जमवणे.. मग शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा , शेती करणाऱ्यालाच भूलवून पुस्तके गळ्यात मारून हिच मोठी शेती यांची सुरू झाली ती आजतागायत सुरूच आहे..
मग अशात स्वतःच्या आजाराचे भावनिक आत्मियता मिळवण्यासाठी वारंवार आपल्याला बध्दकोष्ता, कँन्सरची लागण वगैरे सांगून लोकांकडून सहानुभूती मिळवायची , जो व्यक्ति अख्या शिबीरात नैसर्गिक शेतीचे महत्व पटवू सांगतो व ज्यांना हे महत्व पटत नाही ज्यांना रासायनिक शेतीच करायची त्यांनी हार्ट अटँक, कँन्सर, डायबेटीस ने खुशाल मराव अस ठामपणे सांगणाऱ्याला यातीलच एक आजार का व्हावा..? विचार शहरी लोकांनी करावा.
५० लाख शेतकरी झीरो बजेट तंत्राने शेती करत असल्याचा दावा पाळेकरांनी केला आहे. आपण त्यांना पाच हजार शेतकरीच दाखवण्याचे आव्हान करत आहो.
यांच्या गावी शेतात सुरूवातीचे सहा वर्ष जीवामृत, घनजीवामृत वापरल्याने जमीन जीवाणू समृध्द झाली त्यामुळे अठरा वर्षापासुन शेतीत काहीही टाकणे बंद केले आहे…त्याची आवश्यकताच नाहीजी जीवाणू समृध्द जमीन आहे म्हणतात मग तिथ रासायनिक पध्दतीने शेती का केली जाते..? जर जीवाणू समृध्द जमीन असेल तर जमीनीचे फोटो टाका…गांडूळांचे फोटो टाका…
जी काही पिके पाळेकर सांगतात त्या शेताकडे हे कधीही फिरकत नाहीत लोकांना तुम्ही काय मुर्ख समजता काय..?
कुठला ह्युमस आणि कुठल काय..?
मुळ्या कुजतात, ह्युमस निर्मिती होत रहाते त्यामुळे शेतीची चिंता राहीलीच नाही….. कधीतरी जा शेतावर नाहीतर शेतच चोरीला जायच…ह्युमस थांबलाय शेतमालकाची वाट पहात…
शुन्य खर्च म्हणजे झिरो बजेट म्हणणे चूक आहे फसवणूक आहे, हे यांच्या आत्ता लक्षात कस आल..?
हे ज्या दाव्यावर १९ वर्षे शेतकऱ्यांना भूलवत ठेवले तो दावाच फसवणूकीचा आहे अस स्वतः सांगतात, मग १९ वर्षे काय करत होता..? त्यावेळी समजल नाही का..? हि शुध्द फसवणूक आहे नाही का?
होय तुम्ही तमाम झिरो बजेट शेती करून अयशस्वी झालेल्या व प्रचंड उत्पादनाच आमिष दाखवलेल्या शेतकऱ्यांचे अपराधी आहात.. आज राजाश्रय मिळत असल्याचे पाहून सर्व काही बदलाचे अधिकार तुम्हाला असतील तर ते चुक आहे…
तुमच्या मतानुसारच ५० लाख शेतकऱ्यांची शुन्य खर्चाची शेती होवू शकते म्हणून सांगत होतात हि शुध्द फसवणूक केली आहे….
कुठल्याही एनजीओ किंवा बिलंदर मित्र तुमचे तंत्रज्ञान सांगात नव्हते तर जे जे चांगले जितक्या तज्ञांनी सिध्दांत मांडले त्या सर्वांकडील चांगल्या गोष्टीचा प्रसार करत होते पण तुमचा असा अट्टाहास की कुणीही काहीही करो पण नाव फक्त माझेच झाले पाहीजे, शेवटी याच हट्टापायी झिरो बजेट नाव बदलून स्वतःचे नाव देवून मी पणा दाखवलातच…
लोकसभेत अर्थमंत्र्यांनी झिरो बजेट शेती हा उल्लेख केल्यावर पुन्हा नावासाठी झपाटलेले तुम्ही तुमचा लगेचच जळफळाट झाला… माझे नाव मी या तंत्राला दिलेले असताना लोकसभेत माझ्या नावाचा उल्लेख करावा हा बालहट्ट का करता…तुम्ही स्वतः काहीतरी पिकवा मग उत्पादनाचा दाखला द्या आपोआपच तुमचे नाव होईल.
पाळेकर शेती तंत्रालाविरोध करणाऱ्यामध्ये जी एम
बीज समर्थक , सेंद्रीय शेतीचे प्रचारक, शेतकरी संघटनेचे नेते, व कृषी विद्यापिठांचे कुलगुरू यांची युती झालेली आहे असे पाळेकर सांगतात.
ज्यांचा उल्लेख केला त्यांच्या बद्दल एका पोस्टमध्ये म्हणता की यांना आमचा विरोध नाही व दुसरीकडे विरोधही करता…
कारण काय तर शेतकऱ्यांपर्यंत आपणास कुठलही आधुनिक तंत्रज्ञान पोहोचू द्यायच नाही, रोग ,किडीला प्रतिकारक बियाणे शेतकऱ्याला मिळाल्यास तो खरोखरच कर्जमुक्त ,चिंतामुक्त,होईल व ते होवू द्यायच नाही, असाच आपला घाट दिसतोय..साधेच बियाणे वापरून शेतकरी कमी उत्पादन व रोग किडीला आवरायला बराच खर्च करावा हाच उद्देश ठेवून या बी टी बियाणे किंवा आधुनिक तंत्रज्ञानाला मुकवण्याचा आपला रोख स्पष्ट दिसतोय..
विरोध करा पण चांगल्य् गोष्टीला करू नका.
ग्लोबल वॉर्मिंग वाढवणारे हरितगृहाला आपला कसून विरोध पण आपण स्वतःच टीमकी मिरवत अशाच एका शेतकऱ्याच्या हरितगृहावर शिमला मिरचीचे इतक्या लाखाचे उत्पादन तो शेतकरी मिळवतोय म्हणून तिथ शिवारफेरी कशाला घेता..? तिथ ग्लोबल वॉर्मिंग वाढत नाही का..? ग्रीन हाऊस गँसेसचे उत्सर्जन होत नाही का..?
तरूण शेतकरी गाव सोडून पळतोय
का पळू नये आज शेतकरी म्हटला की त्याला कुणीही लग्नासाठी मुली द्यायला तयार नाही, वडील गावी शेती करत असताना तरूण मुलाने शहरात चांगली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्यता जर येत असेल तर त्यालाही विरोधच, म्हणजे शहराकडे जाणारा मुलगाही गावात, गावातला मुलगाही गावात मग संसाराचा बट्ट्याबोळच.. करा मरा पण गावातच.
पहिल्यांदा स्वतःची शेती तुमच्या नैसर्गिक व आध्यात्मिक पध्दतीने करावी मगच इतरांना शहाणपणाचे डोस पाजावेत हिच प्रामाणिक इच्छा…
बाप दाखवा नाहीतर श्राध्द घाला

संबंधित लेख

3 COMMENTS

  1. मी जन्मानं शेतकरी असलो तरी मी स्वतः शेती करत नाही.माझं ऊत्पन्नाचं शेती हे साधन नाही. ही बाब खरी आहे की आमच्या सारख्या स्वतःच्या शेतीपासुन दूर असणाऱ्यांना पाळेकरांसारख्यांच्या तत्व्द्न्यानाने भुरळ पडते.परंतु प्रश्न हा देखिल पडतो की बाकीचे अनुभवी शेतकरी व सरकार मूर्ख होतं का ज्यांचा सेंद्रिय+रासायनिक शेती करण्याकडे कल दिसतो ?

  2. अगदी बरोबर आहे हा भोंदू बाबा आहे अशी शेती करण म्हणजे आत्महत्या करण आहे .शेतकऱ्यांनी या भामट्या बाबाच्या व भामट्या सरकारच्या नादाला लागू नये .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची