जिरेनियम शेतीबाबत या महिन्याभरात ७ ते ८ जणांनी फोनवर विचारणा केली.
माझे स्पष्ट मत-
मार्केट हातात असेल तर आणि तरच निर्णय घ्या.
यापूर्वीही मागील ५ वर्षांत पाहिले तर
– महोगनी
– अमेरिकन केशर
– कडकनाथ
– व्हरटिकल फार्मिंग
यातून शेतकरी भरडले गेले आहेत.
अशा प्रकारे नवीन एखाद्या मॉडेल बाबत काही वाचनात आले, कुणी गुंतवणूक करा म्हणून सांगितले तर काही प्रश्नांची चाळण वापरावी.
१. सदर उत्पादनास नक्की मार्केट उपलब्ध आहे का?
थोडक्यात या उत्पादनास मार्केट मध्ये मागणी दिसते आहे किंवा नाही हे स्वतः पाहणे. तशी ती नसेल तर इथेच थांबा
२. व्यवसायाचे नेमके अर्थशास्त्र काय,निव्वळ नफा किती?
तुमचे उत्पादन अमुक भावाला आम्ही घेऊ, तुम्हाला तमुक लाख , कोटी परतावा मिळेल असे सांगणाऱ्या एजंसी स्वतः नक्की फायदेशीर रित्या ते करू शकतात का हे तपासणे. जर ती माहिती मिळत नसेल, तर इथेच थांबा
३. असे मॉडेल्स प्रमोट करणारे सुरवातीच्या गुंतवणुकीसाठी त्यांची एकाधिकारशाही राबवतात का? की त्यासाठी तुम्हाला चॉईस आहे?
उदा. आमचीच रोपे घ्यावी लागतील, स्ट्रक्चर आम्हीच उभे करू. या मधून तुम्हाला कळेल की व्यवसाय उभा राहण्या आधीच संबंधित एजंसी तुम्हाला काहीतरी विकून बसली आहे आणि त्यांनी सांगितलेला भविष्यातील गडगंज नफा हा दोन, पाच, दहा वर्षानी वगैरे मिळणारा असेल वगैरे. असे जाणवले. तर इथेच थांबा
४. संबंधित एजंसी, प्रमोटर कोण आहेत? कायदेशीर बाबी काय? करार, संरक्षण वगैरे काय?
शक्यतो LLP लिमीटेड लायबिलिटी पार्टनरशिप असतील तर जास्त सावध रहा. कारण यातील एखाद्या कर्मचाऱ्याने तुम्हाला दिलेल्या प्रॉमिस करीता मालक बांधील असतीलच असं नाही. काही घोळ झाला तर ते सहिसलामत असतील. LLP ही संकल्पना अमेरिकेत यासाठीच बनवली आणि प्रसिद्ध झाली.
या तुलनेत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ची जबाबदारी अधिक आहे. काही घोळ झाले तर मालकाच्या मालमत्ते मधून वसुली केली जाऊ शकते. थोडक्यात तुमची फसवणूक होणार नसेल आणि झाली तर वसूल करता येण्याजोगी परिस्थिती अनुपलब्ध असेल.
तर इथे थांबा.
——
शेती सारख्या कोणतीही एकाधिकार शाही नसणाऱ्या व्यवसायात सरासरी २०-३० % हून अधिक निव्वळ नफा असू शकत नाही हे अंतिम सत्य आहे.
कुणी जर हे नफ्याचे आकडे प्रचंड फुगवून काहीतरी गळ्यात मारत असेल तर तात्काळ थांबाच……
———
डॉ. नरेश शेजवळ
३० एप्रिल, २०२१
(शेतीतील नवीन मॉडेल्स, प्रयोगात गुंतवणुकीबाबत आलेल्या प्रश्नांवर केलेली पोस्ट)