Friday, August 12, 2022

बळीराजाच्या हाल अपेष्टांकडे दुर्लक्षच!

ईडा, पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असे म्हणत नुकतीच बलिप्रतिपदा साजरी केली गेली; मात्र धन-धान्याने समृद्ध ठेवणाऱ्या भुलोकीच्या बळीराजापुढे जे संकट वाढून ठेवले गेले त्याचा तातडीने निपटारा करण्यासाठी शासन यंत्रणा जागची हललेली दिसली नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीला ‘पुन्हा येईन मी’ असे म्हणत सामोरे गेलेले परत निवडून आलेही; परंतु सत्तेचा खेळ अजून पुर्णत्वास गेलेला नसल्याने, परतून आलेल्या पावसाने जी दैना ओढवली आहे त्याकडे लक्ष द्यायला संबंधितांना वेळ मिळालेला दिसत नाहीये, हे दुर्दैवी आहे.

यंदाची दिवाळी ही नेहमीसारखी उत्साहाची वाटलीच नाही, कारण एकतर या दिवाळीवर संपूर्णत: निवडणुकीचे सावट होते. आपल्याकडे राजकारणात अधिकेतरांचे स्वारस्य राहत असल्याने अनेकजण निवडणुकीत गुंतलेले होते. विजयासाठीच्या जागा होत्या तितक्याच होत्या; परंतु पराभूत होणाऱ्यांची संख्या अधिक असणे स्वाभाविक ठरल्याने त्यांच्या समर्थकांतही उत्साहाचा अभाव होता; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नेमक्या दीपावलीच्या काळातच राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलेले दिसून आले. त्याचा सर्वव्यापी फटका बसला. एक तर पावसामुळे नागरिक खरेदीला बाहेर पडू शकले नाहीत, त्यामुळे व्यापारी बांधवांना हातावर हात धरून बसून राहण्याची वेळ आली. लहान व रस्त्यावर हातगाडी लावून व्यवसाय करणा-यांची तर अधिकच पंचाईत झाली. पावसामुळे दुकान लावता आले नाही आणि लावले तरी ग्राहक अभावानेच फिरकले. यातून जी मंदी साकारली, तिने भल्या भल्यांच्या डोळ्यात पाणी आणून ठेवले.

दुसरे म्हणजे, मंदीने एकीकडे डोळ्यात पाणी आले असताना परतून आलेल्या पाऊस-पाण्याने बळीराजाच्या स्वप्नांवर पाणी फेरले. द्राक्षबागा उन्मळून पडल्या. भाजीपाला सडला, शेतात व खळ्यात असलेल्या कांद्याची वाट लागली तर भात शेती भुईसपाट झाली. सोयाबीन, मक्याचे मोठे नुकसान झाले. साधे उदाहरण घ्या, एरव्ही विजयादशमी, दिवाळीला झेंडूच्या फुलांचा काय भाव असतो, पण यंदा भावाचे सोडा; अक्षरश: मागणी नसल्याने बसल्या जागीच रस्त्यावर झेंडूची फुले टाकून देत शेतकरी गावी परतले. तिकडे मुंबईच्या बाजारात भाजीपाल्याला, टमाट्यांना भाव आणि मागणीही नसल्याने वाहतूक खर्चदेखील निघत नसल्याचे पाहून तिथेही शेतमाल टाकून दिला गेल्याचे पाहावयास मिळाले. म्हणजे, शेतकरी बांधवांची चहुबाजूने कोंडी झाली. निसर्गाच्या दणक्याने, परतीच्या पावसात तर हाता-तोंडाशी आलेला घासही गेला. दिवाळीचा दीपोत्सव एकीकडे होत असताना शेतकरी राजाच्या डोळ्यात आसवांचे दीप लागलेले दिसले. बरे, या अशा परिस्थितीत पाठीवरती हात ठेवून धीर द्यायला कुणी यावे, तर तेही नाही. लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा आपल्या निवडणुकीत मश्गुल. त्यामुळे शेतक-यांच्या हाल-अपेष्टांना पारावार उरला नाही.

परतीच्या पावसाने व्यापारी व शेतक-यांचे मोठे नुकसान झालेच, शिवाय विजा कोसळून व पुराच्या पाण्यात वाहून जाऊन काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे; परंतु शासकीय यंत्रणेला या सर्वांचे फारसे गांभीर्य दिसत नाही. नुकसानीचे जलद गतीने पंचनामे नाहीत, की पीक विम्यासाठीची फरफट थांबलेली नाही. मागच्या वर्षीच्या पीक विम्याचे पैसे अजूनही नुकसानग्रस्तांच्या हाती पडले नसल्याचा आरोप होतो आहे. खरे तर निसर्गाचा लहरीपणा पाहता पीक विम्याच्या निकषांत बदलाचीही गरज आहे; परंतु मागच्या पानावरून पुढे चालू आहे. नुकत्याच निवडून आलेल्या व शपथही न घेतलेल्या काही संवेदनशील उमेदवारांनी शेतीच्या बांधावर जाऊन व्यथा-वेदना जाणून घेतल्या; पण यंत्रणा म्हणून ज्या गतीने काम व पंचनामे होणे अपेक्षित आहे, ते होताना दिसत नाही. सत्तेची जुळवाजुळव करणारे मुंबई मुक्कामी आहेत, तर विरोधाची भूमिका वाट्याला आलेले परिस्थिती जाणून घेत आहेत. पराभूत झालेले विरोधक तर जणू आपल्याला याच्याशी काही देणे घेणेच नसल्यासारखे वावरत आहेत. अशावेळी राज्यकर्त्यांनी गतीने यंत्रणा राबवून नुकसानग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे व त्यांना धीर देणे अपेक्षित असते. तेच प्रभावीपणे होताना दिसू शकलेले नाही.

  • किरण अग्रवाल
  • सौजन्य-लोकमत

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची