साखर कारखान्यांकडील बोगस ऊस नोंदणीच्या प्रकाराला आळा बसावा, यामध्ये घडत असलेले राजकारण संपुष्टात यावे, यासाठी शेतकर्यांना आता आपल्या उसाची नोंदणी घरबसल्या संबंधित साखर कारखान्याकडे करता येणार आहे. त्यासाठी साखर आयुक्तालयाने स्वतंत्र अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपमुळे ऊस क्षेत्राची अचूक नोंद होणार आहे. तसेच ऊस नोंदणीसाठी कारखान्यांमध्ये असलेल्या स्पर्धेला लगाम बसणार आहे.
साखर आयुक्त कार्यालयाकडून येणार्या 2022-23 या गळीत हंगामासाठी या मोबाईलवरून अॅपवर ऊस नोंदणी घेण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 200 साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची नोंदणी या मोबाईल अॅपवर नोंदविण्यात येणार आहे. या अॅपमध्ये शेतकर्यांना आपल्याच कारखान्यांच्या नावासमोर ऊस नोंद करता येईल; याशिवाय जवळच्या दोन कारखान्यांच्या नावांचाही पर्याय देता येणार आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या अॅपवर ऊस क्षेत्राची नोंदणी झाल्यानंतर संबंधित कारखान्याने उसाची तोडणी न केल्यास ऊसतोडणीची जबाबदारी साखर आयुक्तालय घेणार आहे.
या अॅपमुळे दुबार ऊस क्षेत्राच्या नोंदणीच्या प्रकाराला आळा बसेल तसेच जिल्ह्यासह राज्यातील उसाचे निश्चित क्षेत्र किती व गाळपासाठी ऊस किती मिळणार, याची बिनचूक माहिती शासनाला मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे जो डेटा तयार होईल, त्याचा उपयोग केंद्र व राज्य सरकारकडून शेतकर्यांसाठी ज्या योजना राबवल्या जातात. त्याचा लाभ देण्यासाठी होणार आहे.
माहिती स्त्रोत- दै. पुढारी