लातूरमधील निलंगा येथील शेतकरी मकबूल शेख यांनी जुन्या बुलेटचा वापर करून १० एचपी बुलेट ट्रॅक्टरचा अविष्कार केला आहे व आजपर्यंत १४० शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून ट्रॅक्टर खरेदी केले आहेत.
कमी पावसाशी नेहमीच झगडणारे लातूरकर यांच्यातील एक म्हणजे मकबूल शेख जे त्यांच्या ३ एकर जमिनीवर शेती करतात. पाण्याची समस्या असल्याने त्यांनी आपली बैलजोडी विकली खरी परंतु शेतीच्या कामात मात्र अडचणी वाढू लागल्या परंतु शेख यांनी या संकटाला एका आव्हानाप्रमाणे मानले व त्यातून एक मार्ग काढत एक असा ट्रॅक्टर बनवला की ज्याचा उपयोग अनेक शेतकरी करत आहेत. त्यांनी असा बुलेट ट्रॅक्टर बनवला जो बाजारात मिळणाऱ्या ट्रॅक्टरच्या किमतीपेक्षा १० पटीने कमी आहे.
शेख यांना त्यांच्या कामासाठी राज्य सरकारकडून सन्मानित देखील करण्यात आले आहे.

या अविष्काराची कल्पना शेख यांना त्यांच्या मोठ्या भावाच्या ट्रॅक्टर वर्कशॉपमधून मिळाली. लहानपणापासूनच शेख यांनी भावाबरोबर मेकॅनिक म्हणून काम केले परंतु भावाच्या निधनानंतर त्यांनी शेतीबरोबर वर्कशॉप देखील सांभाळले.
शेख सांगतात की त्यांनी ट्रॅक्टर मॉडेलवरती काम करण्यास २०१६ ला सुरवात केली. त्यांना असा ट्रॅक्टर बनवायचा होता जो आकाराने लहान असून शेतीच्या सर्व कामात उपयोगी पडेल व शेवटी शेख यांनी १० एचपी इंजिन ट्रॅक्टर बनवण्याचा निर्णय घेतला. असा ट्रॅक्टर बनवण्यासाठी शेख यांनी एका बुलेटचा वापर केला. कमी इंधन लागणार ट्रॅक्टर बनवणे हे देखील शेख यांच्यासाठी मेहनतीचे काम होते. अखेर २०१८ ला त्यांचा ट्रॅक्टर बनवून तयार झाला. या ट्रॅक्टरमुळे काटणी, छाटणी, फवारणी व नांगरणी ही कामे सहजरित्या करता येऊ लागली.
बाजारात एका सामान्य ट्रॅक्टरची किंमत साधारण ९ लाख एवढी आहे तर सर्व अवजारासह याची किंमत १४ लाखांपर्यन्त जाते परंतु शेख यांनी बनवलेल्या बुलेट ट्रॅक्टरची किंमत १ लाख ६० हजार आहे व यापेक्षा छोटे मॉडेल असेल तर याची किंमत ६० हजार रुपये आहे.
अनेक शेतकऱ्यांनी शेख यांच्याकडून असे ट्रॅक्टर बनवून घेतले आहेत. एक लिटर डिझेलमध्ये हा ट्रॅक्टर दीड तास काम करतो तसेच मजुरांची कमाई देखील वाचते.
महाराष्ट्र सरकारने शेख यांना कृषी रत्न अवार्ड देऊन सन्मानित केले असून युवा कृषी संशोधक हा देखील पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
मुकबूल शेख यांना कधीही असे वाटले नव्हते की त्यांनी बनवलेला हा अविष्कार लोकांच्या एवढ्या उपयोगी पडेल. लोकांना होत असलेला फायदा पाहून शेख यांना समाधान मिळते असेही सांगतात