Saturday, August 13, 2022

सर्वाधिक जीएसटी देऊनही महाराष्ट्राला केंद्राचा ठेंगा


महाराष्ट्राने दिले १ लाख ८५ हजार कोटीसंकटात मिळाले केवळ २८२४ कोटी
उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राचा केंद्राकडून यायचा वस्तू आणि सेवा कराचा १६००० कोटींचा वाटा तात्काळ देण्याची मागणी करणार्‍या महाराष्ट्र सरकारची मागणी सातत्याने फेटाळणार्‍या केंद्रातील मोदी सरकारच्या आपमतलबीपणाचा पर्दाफाश झालाय. महाराष्ट्राने या कराद्वारे सर्वाधिक रक्कम केंद्राच्या तिजोरीत जमा करूनही केंद्राने मात्र परतावा करताना पक्षीय राजकारण करून भाजपची राजवट असलेल्याच राज्यांना सर्वाधिक निधी दिल्याचे उघड झाले आहे. केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्सकडील माहितीच्या अधिकारातील माहितीत राज्यावर होत असलेल्या निधी वितरणातील माहितीने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तिजोरीत अगदी कमी कर देणार्‍या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांच्या तुलनेतही महाराष्ट्राला निधी दिला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशातील करोनाच्या साथीत सर्वाधिक भरडून निघालेल्या महाराष्ट्राला केंद्राकडून अधिकच्या मदतीची अपेक्षा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः यासाठी प्रयत्न केले. ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलले. राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही दोनवेळा दिल्ली भेटीत मदतीची मागणी केली. मात्र दुर्दैवाने केंद्राने एक छदामही राज्याला दिला नाही. संसर्गाचा आळा घालण्यासाठी तात्काळ मदतीची अपेक्षा असताना केंद्राकडून कोणतीच मदत होत नसल्याने अखेर महाराष्ट्राने आपल्या वाट्याची वस्तू आणि सेवा कराची १६००० कोटींची रक्कम तरी द्यावी अशी मागणी केली.
राज्याकडून या मागणीचा पाठपुरावा करण्यास सुरुवात करताच भाजप समर्थकांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. अखेर काही मान्यवरांनी केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडून निधी वाटपाची माहिती माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली. या माहितीने महाराष्ट्रातील जनतेची झोप उडाली आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या तिजोरीत एकट्या जीएसटी कर रुपाने डिसेंबर २०१९पर्यंत १,०३,१८४ कोटी रुपये जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्च २०२० पर्यंत या रकमेत केवळ तीन महिन्यात सुमारे ८२ हजार कोटींची भर पडून महाराष्ट्राने मार्चअखेर राज्याने केंद्राला चक्क १ लाख ८५ हजार ९१७ कोटी रुपये दिले.
महाराष्ट्राच्या तुलनेने इतर राज्यांचा निधी अगदी तुटपुंजा होता. माहितीच्या अधिकारात उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या भाजपची सत्ता असलेल्या राज्यांच्या प्राप्त माहितीनुसार मार्चअखेर कर्नाटकने ८३ हजार ४०८ कोटी, गुजरातने ७८ हजार ९२३ कोटी आणि उत्तर प्रदेशने ६५ हजार २८१ कोटी इतकाच निधी जमा केला. या तिन्ही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा कर तिपटीने अधिक आहे. हे लक्षात घेता कर परतावा महाराष्ट्राला सर्वाधिक मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र केंद्राने त्याचे वाटपही अन्यायी पद्धतीने केल्याचे उघड झाले आहे.
करोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी राज्यांना निधी वितरीत केला त्यात महाराष्ट्रावर घोर अन्याय केल्याचे उघड झाले आहे. कर रूपाने सर्वात कमी निधी देणार्‍या उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारला ८ हजार २५५.१९ कोटी इतका निधी देण्यात आला आहे. भाजपचीच सत्ता असलेल्या कर्नाटकला १ हजार ६७८.५७ कोटी, भाजपच्या गुजरातला१ हजार ५६४.४० कोटी रुपये देण्यात आलेत. पण सर्वाधिक जीएसटी कर जमा करणार्‍या महाराष्ट्राला केवळ २ हजार ८२४.५७ कोटी देण्यात आले आहेत.

केंद्राच्या निधी वितरणाची टक्केवारी लक्षात घेता उत्तर प्रदेशला चक्क १२.६४६ टक्के इतका परतावा देण्यात आलाय. कर्नाटकला ८.७७८ टक्के तर गुजरातला २.२७ टक्के परतावा देण्यात आलाय. तर महाराष्ट्राला केवळ १.५२९ टक्के इतकाच परतावा देण्यात आल्याचे उघड झाले आहे.या तफावतीमुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची बोलती बंद झाली आहे. करोना संकटात मिळणार्‍या निधीवर सीएसआरचे गंडांतर आणून महाराष्ट्राची गोची करणार्‍या केंद्राकडून कर परताव्यातही अन्याय झाल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
जीएसटीद्वारे राज्याचा हातभार
राज्य = रक्कम
महाराष्ट्र १,८५,९१७ कोटी
कर्नाटक ८३,४०८ कोटी
गुजरात ७८,९२३ कोटी
उत्तर प्रदेश ६५,२८१ कोटी

करोना संकटात केंद्राचा परतावा
राज्य = रक्कम
उत्तर प्रदेश ८,२५५.१९ कोटी
महाराष्ट्र २,८२४.५७ कोटी
कर्नाटक १,६७८.५७ कोटी
गुजरात १,५६४.४० कोटी

आमचे राज्य केंद्राला प्रामाणिकपणे सर्वाधिक कर देत असताना केंद्र मात्र आमच्या राज्याला सावत्रतेची वागणूक देत आहे. आम्हाला अपेक्षित मदत मिळत नाहीच. उलट आमची १६००० कोटी रक्कमही दिली जात नाही. आज महाराष्ट्र संकटात आहे. संकटातील राज्याला त्यांची देणी न देणे हा सारासार अन्याय आहे. आता निधी परताव्यातही केंद्र सरकारने अन्यायाचा अतिरेक केला आहे.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची