Saturday, August 13, 2022

शेतीच्या मशागतीला मिळाली चाकांची गती!

रोवणीसाठी शेत तयार करायचे म्हणजे आधी नांगरणी करावी लागते. त्यासाठी दमदार बैलांची गरज भासते. हे सगळे शेतकऱ्यांकडे असले तरी पावसाने साथ देणेही तितकेच गरजेचे. एकाचेही गणित बिघडल्यास मशागत रखडून शेतात कचऱ्याचा तांडा झुलतो. नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भाच्या धानपट्ट्यात दोन दशकांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला भेडसावणारा हा प्रश्न छोट्याशा दोन चाकांनी सोडविला. दमदार बैलांसोबतच नवशिकेही नांगर ओढू लागले. एका फाळाचा नांगर तीनचा झाल्याने नांगरणीची गती वाढून मशागतीचा वेग वाढला.


पूर्व विदर्भ हा धान उत्पादक प्रदेश. या भागात मृग नक्षत्रात पऱ्हे टाकले जातात. यानंतर सुमारे २१ दिवस रोवणीसाठी शेत तयार करण्यात शेतकरी व्यस्त असतो. पावसाने ओढ न दिल्यास मशागत रखडते. ट्रॅक्टरचा शोध लागण्यापूर्वी एक फाळाच्या नांगराने हे काम केले जात होते. पन्नास-शंभर एकराचे शेत नांगरण्यासाठी चार-पाच बैलजोड्या ठेवल्या जात. तरीही पावसाने ओढ न दिल्यास शेती पडीक ठेवावी लागत होती. काळ बदलत गेला. नांगर तयार करणारा पारंपरिक वाढई नामशेष झाला. १९९०च्या सुमारास ‘बळीराम’ नावाचा नांगर शेतकऱ्यांना पुरविण्यात आला. तो शेतकऱ्याला घरीच लाकडी दांडा आणि रुमणे लावून तयार करणे शक्य होते. तरीही एक फाळ असल्याने शेतीच्या कामाची गती मंदच होती. बैलांनाही अधिक श्रम घ्यावे लागत होते.

Click here to Download

मोठे बैल घेण्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागत होता. या समस्यांवर तोडगा म्हणून १९९५च्या सुमारास तीन फाळांचा लोखंडी नांगर तयार करण्यात आला. एक फाळ असलेले नांगर बैल ओढू शकत नसताना तीन फाळ ओढणे कसे शक्य होणार? या प्रश्नावर चाकाचा पर्याय शोधला गेला. एका पट्टीच्या सहाय्याने बैलांच्या क्षमतेनुसार जमिनीत किती खोलवर नांगर जाणार हे निश्चित करता येऊ लागले. नवखे बैलही हे नांगर ओढू शकत असल्याने शेतकऱ्यांची पसंती मिळाली. एवढेच नव्हे तर एका दिवशी बैलजोडीने एक एकर जमिनीची नांगरणी शक्य होऊ लागली. मृग नक्षत्रानंतर पावसाचा जोर वाढला तरीही मशागत पूर्ण होऊ लागली आहे. मध्यम आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे नांगर वरदान ठरले आहे.
काळ्या मातीत तिफन चाकांवर
पेरणीसाठी तयार करण्यात येणारी तिफन शेतीच्या साहित्यातील महत्त्वपूर्ण बाब. कसलेल्या बैलांकडूनच तिफन शेतात चालविली जायची. ट्रॅक्टर आल्यानंतर अनेकांनी यातून मुक्तता मिळविण्यासाठी अधिकचा खर्च करण्यास सुरुवात केली. पण, रब्बी हंगामातील गहू, हरभरा किंवा इतरही पिकांमधून अपेक्षित उत्पन्न न झाल्यास तोटा वाढू लागला. ट्रॅक्टरच्या नांगराचे फाळ बदलून पेरणी करता येणे शक्य असल्याचे पाहून बैलाने ओढल्या जाणाऱ्या लोखंडी नांगरातही हीच पद्धत अवलंबण्यात आली. नांगरणीचे फाळ बदलून दाणे जमिनीत सोडता येईल असे नळी बसविलेले वेगळे फाळ तयार करण्यात आले. ते नांगराला जोडून तिफन म्हणून वापर करण्यास सुरुवात झाली. नांगरच तिफनचे काम करू लागल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली, असे मौदा तालुक्यातील चिरव्हा येथील युवा शेतकरी प्रवीण राजगिरे यांनी सांगितले.

बदलता नांगर..

  • सुरुवातीच्या काळात फक्त लाकडाद्वारे तयार करण्यात आला.
  • शेतातील दगडांमुळे टोक तुटू लागल्याने लोखंडी फाळ लावला.
  • वाढई संपू लागल्याने बिडाचा ‘बळीराजा’ तयार करण्यात आला.
  • बीड तुटण्याचा धोका असल्याने लोखंडी नांगराचा शोध.
  • चाके लावून तीन फाळांचा अनोखा नांगर बनविण्यात आला.
  • हेच नांगर पुढे तिफन म्हणूनही वापरण्यात येऊ लागले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची