Monday, July 4, 2022

लष्करी अळीच्या व्यवस्थापनात जैविक बुरशी ठरतीय वरदान

माझी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात निमगांव येथे शेती आहे. मागील आठवड्यात रविवारी सकाळी-सकाळी शेतावर गेलो असता मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला. मक्याच्या प्रत्येक कणीसात २-३ अळ्या दिसून येत होत्या. पण माझ्या दुसऱ्या प्लॉट मध्ये मला काही अळ्या पांढऱ्या रंगाच्या मेलेल्या अवस्थेत दिसून आल्या, जवळून निरीक्षण केल्यानंतर कोणत्या तरी बुरशीचा प्रादुर्भाव या अळ्यांवर झालेला असल्याचं समजलं तेव्हा लगेचच फोटो काढून माझे सहकारी मित्र  डॉ.अंकुश चोरमुले यांना पाठवले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बुरशी नोमुरिया रिलाई असल्याचं आढळून आले. बुरशीचे नाव समजल्यानंतर त्याबद्दल मी माहिती जमा करायला सुरुवात केली. तत्पूर्वी प्रयोगासाठी म्हणून एका डब्यात जिवंत अळ्या सोबत खाद्य आणि दुसऱ्या डब्यात बुरशीने प्रादुर्भाव झालेल्या अळ्या जमा केल्या.

त्यांनतर घरच्या घरी मी एक प्रयोग करायचं ठरवलं. त्यासाठी एका लहान डब्यात अळ्यांसाठी खाद्य आणि २ जिवंत अळ्या (एक – अळीची दुसरी अवस्था. दुसरी – अळीची पाचवी अवस्था)  पहिल्या दिवशी ठेवल्या. त्या अळ्यांवर बुरशिजन्य अळीचे बीजाणूकण टाकले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातील एका अळीवर (दुसरी अवस्था असलेली) बुरशी ची वाढ झाली होती आणि दुसऱ्या अळीने खायचं बंद केलेलं दिसून आलं पण त्यावर बुरशी ची वाढ पहिल्या अळी सारखी डोळ्यांनी दिसत नव्हती.(इतर देशात झालेल्या संशोधना  नुसार काही शास्त्रज्ञयांच्या मते अळी च्या पहिल्या व दुसऱ्या अवस्था वरती या बुरशी चा लवकर चांगला परिणाम दिसून येतो )

शेतात अश्याप्रकारे अळ्या खाली पडलेल्या दिसत असतील तर त्यांना मक्याच्या पानावर,कणीसावर ठेवा हवेमार्फत या बुरशी चे बीजाणूकण  एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात आणि जिवंत अळ्यांच्या अंगाला चिकटतात आणि नंतर हि बुरशी अळ्यांच्या शरीरात वाढून त्यांना नष्ट करतात.
एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो हे निसर्गाचे चक्र आपल्या ज्ञात आहे. या चक्राचा वापर करून पिकातील हानिकारक किडीला नियंत्रणात आणणे शक्य आहे. एकात्मिक कीड नियंत्रण मध्ये जैविक पद्धतीचा मोठा वाटा आहे. यामध्ये जीवाणू ,बुरशी व विषाणू यांचा वापर करून पिकांसाठी हानिकारक असलेल्या किडीचे नियंत्रण केले जाते.


सजीव सुष्टीचा समतोल राखण्याची निसर्गाची स्वत : ची एक पध्दती आहे ती म्हणजे जैविक कीड नियंत्रण. नोमुरिया रिलाई  ही एक पांढरा ते पिवळसर हिरवा रंगाची कॅलविसीपीट्यासी कुळातील परोपजीवी बुरशी आहे. ही बुरशी किडींवर उपजीविका करून व त्या किडींना रोगग्रस्त करून मारते. 
परोपजीवी बुरशी म्हणजे काय ? निसर्गात काही बुरशी आहेत ज्या किडींवर उपजीविका करून व त्या किडींना रोगग्रस्त करून मारतात.  अशा बुरशींना कीटकांवरील परोपजीवी बुरशी म्हणतात. व त्यापासून तयार केलेल्या कीटकनाशकाना बुरशीजन्य कीटकनाशके म्हणतात.उदाहरणार्थ, बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझियम एनीसोप्ली, व्हर्टीसीलियम लेकॅनी इत्यादी प्रमुख परोपजीवी बुरशी जैविक कीड व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

नोमुरिया रिलाई ही बुरशी नवीन नाही ही एक विश्वव्यापी प्रजात असून महत्वाच्या ३० पेक्षा जास्त पतंग वर्गीय अळ्यांवर ती नियंत्रण करते. १९७० मध्ये अमेरिकेत सोयाबीन वर लष्करी अळी प्रमाणेच ग्रीन क्लावेर वर्म नावाच्या अळी ने धुमाकूळ घातला होता त्यात भरपूर नुकसान झालं तेव्हा सुध्दा या बुरशी चा वापर तिथे नैसर्गिक कीड नियंत्रण करण्यासाठी झाला होता. 

नोमुरिया रिलाई एक बुरशी असल्याने वातावरणाचा परिणाम हिच्या वाढीवर होतो या बुरशीच्या वाढीसाठी  १५-३० ℃ तापमान आणि जास्तीत जास्त आद्रता (७० पेक्षा जास्त) असणं आवश्यक आहे. भारतात उष्णकटिबंधीय वातावरण असल्याने किडींच्या तसेच मित्र कीटकांच्या वाढीसाठी ते हितकारक आहे. नोमुरिया रिलाई बुरशी वापर केल्याने मोठया प्रमाणात लष्करी अळी चे नियंत्रण होऊ शकते. या बुरशी चा वापर इतर औषधी सोबत केला जाऊ शकतो, अनुकूल परिस्थिती मध्ये लष्करी अळी वरती कमी खर्चात चांगल्या प्रकारे नियंत्रण या बुरशी मुळे मिळू शकते.

या बुरशीचा वापर कसा करावा ?फवारणी द्वारे पंपाने , जमिनीतून घन स्वरूपात, धुरळणी द्वारे किंवा बुरशीची वाढ होऊन मेलेल्या अळ्या शेतावर ठिकठिकाणी ठेवून सुध्दा या बुरशी चा वापर आपण करू शकतो.  नोमुरिया रिलाई ही बुरशी इतर प्राणी, मनुष्य, मित्र कीटकांसाठी हानिकारक नसून सुरक्षित असल्याची नोंद आहे.

२०१८ ला ही लष्करी अळी आपल्याकडं सुरुवातीला कर्नाटक मध्ये दिसून आल्यानंतर कर्नाटकमध्ये धारवड कृषी विद्यापीठ येथे नोमुरिया रिलाई  या बुरशीचा पहिला अमेरिकन लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी करण्यात आला आणि त्याचे चांगल्याप्रकारे परिणाम त्यांना दिसून आले.
करण्यात आलेल्या प्रयोग पुढीलप्रमाणे :- ३० ते ४० दिवसाच्या लष्करी अळी चा भयंकर प्रादुर्भाव असलेल्या मका  प्लॉट मध्ये नोमुरिया रिलाई २ ग्राम / लिटर असे पाठीवरील पंपाने फवारणी केली. त्यानंतर २० झाडांवर १० वेगवेगळ्या ठिकाणे  निरीक्षण केले. प्रादुर्भाव झालेली झाडं, अळ्यांची संख्या असे रेकॉर्ड फवारणी करण्याच्या आधी १ दिवस आणि फवारणी केल्यानंतर १५ दिवसांनी घेण्यात आले.या प्रयोगाचे निकाल बऱ्यापैकी समाधानकारक आले आणि ६५ ते ७० टक्के पर्यंत अळी चे प्रमाण या बुरशी मुळे नियंत्रण झाल्याचं दिसून आलं. परदेशात लष्करी अळी वरती काही ठिकाणी झालेल्या प्रयोगात ८० टक्के पर्यंत नियंत्रण या बुरशी मुळे मिळालं.

महाराष्ट्रातील विद्यापीठ शिफारस काय सांगते:-
नोमुरिया रिलाई (१ x १०’८ सीएफयु/ग्रॅम) ४० ग्रॅम १० लिटर पाण्यात फवारणी करावी. जैविक किटकनाशके पिक १५ ते २५ दिवसाचे झाल्यास पोंग्यामध्ये द्रावण जाईल अशाप्रकारे फवारणी करावी. त्यानंतर १० दिवसाच्या अंतराने १ ते २ फवारणी करावी. सध्याचे ढगाळ वातावरणात जैविक किटकनाशकांच्या वापरासाठी पोषक आहे. अशी शिफारस किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी केली आहे.
ही बुरशी लष्करी अळीवर चांगला जालीम उपाय ठरू शकते पण या बुरशीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अधिक संशोधन आणि अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामध्ये बुरशीचे कोणते प्रारुप असले पाहिजे , फवारणी करतांना  योग्य प्रमाण , फवारणी करण्याची योग्य वेळ ह्या तीन मुख्य प्रश्नांवर अधिक शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचं आहे.

नोमुरिया रिलाई बुरशिजन्य अळ्या (पांढरा रंग)

अळी च्या अंगावर बुरशी ची वाढ होण्यास सुरुवात

माझ्या प्रयोगासाठी जमा केलेल्या बुरशिजन्य अळ्या

माझ्या प्रयोगाचे फोटो.
©गणेश आप्पासाहेब सहाने ✍️

संबंधित लेख

1 COMMENT

  1. अगदी बरोबर आहे निसर्गात जेंव्हा अशा प्रकारची आपत्ती येते तेंव्हा त्या किडीचा नैसर्गिक शत्रू मोठ्या प्रमाणात तयार होतो व ते संकट आपोआपच कमी होते हाच अनुभव आम्हांस ऊसा मध्ये जेंव्हा लोकरी मावा आला १९९९ – २००० मध्ये तेंव्हा आला होता आम्ही Crysoperla carnia या मित्र किडीचा पुरवठा करत होतो त्या वेळी आम्ही शेतकऱ्यांना रासायनीक कीटकनाशके वापरू नका असा सल्ला ही देत होतो व मित्र किटक शेतात सोडल्यानंतर जैविक कीटकनाशके वापरण्याचा सल्ला ही देत होतो पुढे तेच झाले अजून एक सीर्फीड फ्लाय नावाची मित्र किड तयार झाली व लोकरी माव्याचे प्रमाण कमी झाले या वेळी ही असेच होईल फक्त रासायनीक कीटकनाशके कमी वापरायला पाहिजेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची