यंदा राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज करावा, असे पत्र साखर आयुक्तालयाने कारखान्यांना पाठविले आहे. पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वच कारखान्यांनी कारखाना परिसरात किमान २५ बेडचे तात्पुरते हॉस्पिटल तयार करून त्याठिकाणी डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची सोय करावी, असंही पत्र आयुक्तालयाने कारखान्यांना पाठविले आहे.
कोरोनामुळे यंदा ऊस तोडणी यंत्रांची मागणी वाढली आहे. परंतु ही यंत्रे तयार करणाऱ्या दोन कंपन्या आहेत. यामुळे वेळेत पुरवठा करणे अशक्य असल्याने यंदा सुमारे दोन लाख ऊस तोडणी कामगार येतील, असा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांची सोय करावी, कामगारांनी येताना ५० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना आणू नये, असेही आयुक्तालयाने कारखानदारांना सांगितले आहे. वाहतूकदार आणि कामगारांशी कारखान्यांनी करार केले आहेत.
दरम्यान, कोरोनामुळे कारखान्यांनी चारशे ते पाचशे यंत्रांची मागणी नोंदविली आहे. आणखी मागणी केली असतानाही यंत्रे उपलब्ध होत नाहीत. आत्तापर्यंत राज्यातील अवघ्या २० ते २२ कारखान्यांनीच गाळपासाठी अर्ज केले आहेत.
आगामी गाळप हंगामाची स्थिती
गाळपासाठी तयार असलेले कारखाने- १९०
ऊस तोडणीसाठी येणारे कामगार- २ लाख
ऊस तोडणी यंत्रे- ५००
गाळपासाठी अर्ज करण्याची मुदत- ३० सप्टेंबर