Saturday, January 28, 2023

मत्स्यपालन : शेतकऱ्यांना मिळाले उत्पन्नाचे नवे साधनमत्स्यपालन : शेतकऱ्यांना मिळाले उत्पन्नाचे नवे साधन


नर्मदेकाठी पिंजऱ्यातील मत्स्यपालन : शेतकऱ्यांना मिळाले उत्पन्नाचे नवे साधन
नर्मदेकाठच्या गावात पिंजऱ्यातील मत्स्यपालनामुळे गरीब आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे. आकांक्षित जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा काठावरील दुर्गम अशा मणिबेली, चिमलखेडी, भुषा, चिचखेडी आणि शेलगदा येथे पिंजऱ्यातील मत्स्यपालनामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून या मत्स्यकास्तकारांना सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा विकास विभागामार्फत अर्थसहाय्य करण्यात येत आहे.

धडगाव व मोलगीपासून शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर नर्मदा नदी किनारी असलेल्या 33 प्रकल्पग्रस्त गावातील शेतकरी उपजिविकेसाठी डोंगराळ भागात शेती करतात. पावसाळ्यात आलेल्या पिकावर वर्षभरासाठी अन्न साठवून ठेवायचे एवढ्यापूरती शेती मर्यादित आहे. ज्वारी, भगरची शेती केल्यावर आवश्यकतेपुरते पीक हाताशी येते. दुसरे कोणतेच उत्पन्न नसल्याने खरीप हंगामानंतर कामाच्या शोधात ही मंडळी शहराकडे जातात.

दुर्गम आणि डोंगराळ भाग असल्याने शेतीसाठी इतर सुविधा उभ्या करणेदेखील कठीण आहे. त्यामुळे शेती व्यवसायाला या भागात एकंदरीतच मर्यादा आहेत. मात्र आता त्याला मत्स्यपालनाची जोड मिळाल्याने उत्पन्न वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.

पाच गावातील 433 शेतकऱ्यांनी मिळून 5 मच्छिमार सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत. शेलगदा येथील नर्मदा नवनिर्माण सहकारी मासेमारी संस्था यातीलच एक आहे. संस्थेच्या प्रत्येक सदस्याची आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. संस्थेला मत्स्य व्यवसाय विभाग व नर्मदा विकास विभागामार्फत 45 लक्ष 60 हजार रुपये किमतीचे 48 तरंगते पिंजरे खरेदी करून देण्यात आले.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक खाद्य, औषधे आदींची माहिती दिली, तसेच केंद्रीय मत्स्य महाविद्यालय वर्सोवा मुंबई यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे माशांचे चांगले उत्पादन झाले. आतापर्यंत शेलगदा येथे 25 लाख उत्पन्न मिळाले असून अद्याप 26 पिंजऱ्यातील माशांची वाढ होत आहे. मासा साधारण एक किलोपेक्षा अधिक वजनाचा झाल्यावर त्याला विक्रीसाठी बाहेर काढण्यात येते.

माशांची विक्री करण्यासाठी मोठ्या बाजाराचा शोध घेण्यात येत आहे. 4 संस्थांना शीतवाहन पुरवठा करण्यात आला आहे. बोटीने गुजरात राज्यात नेऊन विक्री करण्याचे प्रयत्न झाले. बाजारापर्यंत ताजी मासळी नेण्यात येत आहे. पहिल्याच वर्षी मिळालेल्या चांगल्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांची आशा वाढली आहे. सर्वजण एकत्रितपणे चांगले प्रयत्न करीत आहेत. हा व्यवसाय शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरणारा आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची