Friday, July 1, 2022

बीजप्रक्रिया पद्धती व त्यांचे फायदे

कृषी उत्पादनात पिक संरक्षणास जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व बीज प्रक्रियेस आहे. परंतु बियाणे
प्रक्रियेस जेवढे महत्व पिक संरक्षणामध्ये द्यावयास हवे तेवढे दिले जात नाही. निरनिराळ्या औषधांच्या फवारण्यांमुळे उभ्या पिकावरील किडी व रोगांचे नियंत्रण होते तर बियाणे प्रक्रीयेमुळे बियांवरील सुप्तावस्थेत असलेल्या रोगांचे तसेच इतर जिवाणूंचे नियंत्रण सुरुवातीसच होते. उभ्या पिकात दिसणाऱ्या बऱ्याच रोगांचे मूळ बियांमध्ये असते. एकदा असे रोगट बी उगवून आले कि, त्यामधील रोगासाठी खात्रीशीर असा नियंत्रण उपाय राहत नाही.
बीज प्रक्रिया म्हणजे काय? : सर्वसाधारणपणे बीज प्रक्रिया म्हणजे हलके, किडके, रोगयुक्त, आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करुन अशा बियाण्याचे रोग व किडींपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेला ‘बीजप्रक्रिया’ म्हणतात.

बीज प्रक्रियेचे फायदे :
१. पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते व पेरणी सुलभ होते.
२. बियाणे व रोगांद्वारे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण करता येते.
३. बियाण्याभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होते व रोपांना शेतात प्रस्थापित होण्यास मदत होते.
४. रोग नियंत्रणाच्या खर्चात बचत होते.
५. बियाण्याची उगवणशक्ती वाढून उत्पन्नात वाढ होते.
६. साठवणगृहात साठवणुकीदरम्यान बियाण्याचे संरक्षण होते.
७. पिक एकसारखे वाढते व मशागतीचा खर्च कमी येतो.
८. बियाण्याचा दर्जा वाढला जाऊन बाजार भाव चांगला मिळतो.

बीज प्रक्रीयेमध्ये घ्यावयाची काळजी :
१. बीज प्रक्रियेसाठी वापरावयाची औषधे सर्व बियाण्यास दिलेल्या प्रमाणात सारखी लागतील याची काळजी घ्यावी. ती कमी झाल्यास रोगापासून पुरेसे संरक्षण मिळत नाही व जास्त झाल्यास बियाण्याला अपाय होतो.
२. प्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत भरू नये. त्यापूर्वी असे बियाणे थंड व कोरडया हवेत सावलीत २४ ते ४८ तास वाळवावे.
३. प्रक्रिया केलेले बियाणे थंड कोरडया जागेत सावलीत ठेवून वाळवून पेरावे.
४. बीज प्रक्रीयेसाठी ड्रम वापरावा तो उपलब्ध नसेल तर मडक्यात योग्य प्रमाणात बियाणे व औषध घालून मडक्याचे तोंड फडक्याने बांधावे व मडके तिरके, उभे, आडवे, सुलटे असे काही काळ हलवावे म्हणजे सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात औषध लागेल.
५. बीज प्रक्रिया केलेले बियाणे विषारी असल्याने ते खाल्ले जाणार नाही याची काळजी घ्यावी.
वेगेवेगळ्या रोगांच्या नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या बीज प्रक्रिया आहेत.
अशा महत्वाच्या काही बीज प्रक्रीयांची माहिती खालील प्रमाणे:
अ) जैविक किंवा जीवाणू संवर्धन प्रक्रिया :
१. एक लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे.
२. वरील द्रावण थंड झाल्यावर त्यातील पुरेशा द्रावणात २०० ते २५० ग्रॅम जीवाणू संवर्धन मिसळावे.
३. १० ते १२ किलो बियाणे स्वच्छ फरशीवर प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर तयार केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडावे.
४. शिंपडलेले मिश्रण हलक्या हाताने बियाण्यास चोळावे.
५. बियाण्यास प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करुन नंतर नत्र उपलब्ध करुन देणारे रायझोबीयम किंवा स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत यांचे मिश्रण करुन लावावे.
६. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे व २४ तासाच्या आत पेरावे.

ब) भौतिक बीज प्रक्रिया :
१. मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया : मिठाच्या द्रावणाच्या प्रक्रीयेमध्ये प्रथम ३० ग्रॅम मीठ प्रती १ लीटर पाणी (३०० ग्रॅम मीठ प्रती १० लीटर पाणी) याप्रमाणे ३% मिठाचे द्रावण बनवून एकत्र करावे. अशा मिठाच्या द्रावणात बियाणे ५ ते १० मिनिटे बुडवावे आणि नंतर ३ ते ४ वेळा ढवळावे. हलके, रोगयुक्त व दुषित बियाणे पाण्याच्या पृष्ठभागावर जमा होईल ते काढून नष्ट करावे. पाण्याच्या खालच्या बाजूला जमा होणारे रोगमुक्त, वजनदार बियाणे पेरणीसाठी उपयोगात आणावे. या बीज प्रक्रियेचा उपयोग बाजरी, ज्वारीवरील अरगट आणि भातावरील करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी होतो.
२. उष्णजल प्रक्रिया : ही प्रक्रिया कंद, कांड्या किंवा बेणे याकरिता उपयुक्त आहे. बियाणे किंवा बेणे ४ ते ५ तास भिजत ठेवून नंतर ४९ ते ५४ डिग्री सें. तापमान असलेल्या पाण्यात टाकतात. ऊसावरील गवताळ वाढ व इतर विषाणूजन्य रोगांसाठी वापरतात.

क) रासायनिक बुरशीनाशकांची प्रक्रिया:
१. बुरशीनाशकाचे द्रावणात बियाणे ठराविक काळापर्यंत भिजवतात.
२. बुरशीनाशकाचे घट्ट द्रावण तयार करुन बियाण्यास चोळतात आणि नंतर लगेच सुकवतात.
३. बुरशीनाशकाची भुकटी मडक्यात किंवा ड्रममध्ये टाकून हलवितात. यात बुरशीनाशकाचा थर बियाण्याच्या पृष्ठभागावर व्यवस्थितरित्या लावला जातो.

बीज प्रक्रियेत वापरात येणारी बुरशीनाशके सर्वसाधारणपणे एक किलो बियाण्यास २ ते ४ ग्रॅम चोळतात.
अ) गंधक : ३०० मेश गंधकाची पावडर ४ ग्रॅम प्रती किलो ज्वारीच्या बियाण्यास लावल्यास दाणे काणी व मोकळी काणी या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.
आ) थायरम : २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात घेवडा, वाटाणा, गहू, मका व सोयाबीन या पिकास प्रक्रिया करावी. थायरम २ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात करडई, सूर्यफुल या पिकास प्रक्रिया करावी. तसेच भुईमुगाकरीता ५ ग्रॅम थायरम प्रती किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. या बीज प्रक्रियेमुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
इ) कॅप्टन : या बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात मका, भात, ज्वारी, वाटाणा, घेवडा या पिकांना तसेच २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात भुईमुग पिकास बीज प्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगांचा अटकाव होतो.
ई) कार्बेन्डॅझिम : या बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात करडई, सूर्यफुल व भात या पिकांना तसेच २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात भुईमुग पिकास बीज प्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगांचा अटकाव होतो.
उ) मॅटॅलॅक्झील एम झेड-७२ : या बुरशीनाशकाची ६ ग्रॅम प्रतिकिलो बाजरी बियाण्यास प्रक्रिया केल्यास गोसावी रोगाचे नियंत्रण होते.

संपर्क – श्री. गोपाळ गोळवणकर, मो. ९४०५९००२७६

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची