Saturday, May 21, 2022

फवारणी यंत्राची देखभाल

आपण शेतामध्ये फवारणी यंत्रांचा अनेक वेळा वापर करत असतो. मात्र, त्याची नियमित देखभाल, कार्यक्षमतेची चाचणी, गळती या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. हे रसायनांचा अपव्यय टाळणे, फवारणीची कार्यक्षमता वाढवणे या सोबतच फवारणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.

विविध कीड आणि रोगापासून पिकाच्या संरक्षणासाठी कीटकनाशक, बुरशीनाशकांची फवारणी केली जाते. ‌त्यासाठी ‌विविध प्रकारची ‌फवारणी‌ ‌व‌ ‌धुरळणी‌ ‌यंत्रे‌ ‌वापरली‌ ‌जातात.

फवारणी यंत्र ः
फवारणी‌ ‌करण्यासाठी‌ द्रावणावर ‌हवेच्या‌ ‌दाब निर्माण करून, अत्यंत चिंचोळ्या मार्गातून द्रावण पुढे ढकलले जाते. ‌द्रावणाचे अत्यंत लहान थेंबामध्ये रूपांतर केले जाते. अशा थेंबाचे तुषार वेगाने बाहेर फेकले जातात. यामुळे पानावर द्रावणाचा पातळ असा थर निर्माण होतो. यासाठी ‌हवा दाबयंत्र,‌ ‌पाठीवरील‌ ‌फवारणी‌ ‌यंत्र‌ यांचा ‌वापर‌ ‌मनुष्यबळाच्या‌ ‌साह्याने केला‌ ‌जातो.‌ ‌अधिक क्षेत्रावर फवारणी करण्यासाठी इंजिनवर‌ ‌चालणारी‌ ‌फवारणी‌ ‌यंत्रे ‌फायदेशीर‌ ‌ठरतात.‌ ‌‌फळबागांमध्ये वापरण्यायोग्य ‌लहान‌ ‌ट्रॅक्टरवर‌ ‌चालणारी‌ ‌फवारणी‌ ‌यंत्रे आता बाजारात उपलब्ध झालेली आहेत.

धुरळणी यंत्र ः
पावडर किंवा भुकटी स्वरूपातील रसायनांची पानावर धुरळणी केली जाते. त्यासाठी मानवचलित‌ ‌अथवा इंजिनचलित‌ ‌धुरळणी‌ ‌यंत्रांचा‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌जातो.‌ परदेशामध्ये एक सलग मोठे क्षेत्र असल्याने शेती व वनक्षेत्रावर फवारणीसाठी लहान विमाने किंवा हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. ‌टोळधाडीसारख्या‌ सर्व वनस्पतींसाठी धोकादायक ठरणाऱ्या ‌आपत्तीमध्ये अशा विमानचलित मोठ्या फवारणी यंत्राचा वापर केला जातो. सर्वसामान्यपणे शेतामध्ये धुरळणीसाठी प्लंजर डस्टर, रोटरी डस्टर, पॉवर डस्टर यांसारख्या धुरळणीयंत्राचा वापर केला जातो.

आकारमानानुसार फवारणीचे प्रकार ः
फवारणी आकारमान (स्प्रे व्हॉल्यूम) च्या आधारे फवारणीचे साधारणपणे तीन प्रकार पडतात.
१. हाय व्हॉल्युम फवारणी : ३००-५०० लिटर प्रति हेक्टर
२. लो व्हॉल्युम फवारणी : ५०-१५० लिटर प्रति हेक्टर
३. अल्ट्रा लो व्हॉल्युम फवारणी : ५ लिटर किंवा त्यापेक्षा कमी प्रति हेक्टर
हाय व्हॉल्युम पेक्षा लो व्हॉल्युम फवारणी जास्त फायदेशीर आहे. द्रावणाचे अत्यंत सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर करून पानांवर सूक्ष्म असा एकसारखा थर निर्माण केला जाते. रसायनाचे कण सूक्ष्म स्वरूपामध्ये शोषण करण्यासाठी वनस्पतींनाही सोपे जाते. लो व्हॉल्युम फवारणीसाठी द्रावण कमी लागते. मात्र, प्रति एकरासाठी असलेली कीडनाशकांची मात्रा जाईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. हाय व्हॉल्युम फवारणी करतेवेळी थेंबांचा आकार अधिक असतो. परिणामी द्रावणही अधिक लागते. यात फवारणीसोबतच टाक्या भरणे इ.गोष्टींसाठी अधिक वेळ लागतो. म्हणजेच हाय व्हॉल्युम फवारणीसाठी वेळ, मजूर आणि खर्चही अधिक होतो.

ऊर्जेनुसार फवारणी यंत्रांचे वर्गीकरण :
मानवशक्तीवर चालणारी.
पशुशक्तीवर चालणारी (उदा. बैल व अन्य.)
इंधनशक्तीवर चालणारी. (उदा. ट्रॅक्टर, पावर टिलर व अन्य.)
विद्यूत ऊर्जेवर चालणारी.

द्रावणाचे प्रमाण कशावर ठरते?
आपल्याकडे एकरी किंवा हेक्टरी द्रावणाचे प्रमाण सांगितले. मात्र, द्रावणाचे प्रमाण पुढील अनेक घटकांनुसार कमी जास्त करणे आवश्यक असते. फवारणीसाठी द्रावणाचे नेमके प्रमाण ठरवताना फवारणीचा प्रकार, पिकाच्या वाढीची अवस्था, विशेषतः त्याचा पर्णसंभार, एकूण लक्ष्य क्षेत्र, फवारणीतून पडणाऱ्या थेंबांचा आकार, आणि स्प्रे थेंबांची संख्या इ. अनेक घटक महत्त्वाचे असतात. उदा. फवारणीचे थेंब मोठे असतील तर फवारणी द्रावणाची मात्रा ही लहान
आकाराच्या थेंबासाठी लागणाऱ्या फवारणी मात्रेपेक्षा नक्कीच जास्त असेल.

फवारणी करतेवेळी घ्यावयाची काळजी ः
कीडरोगांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी रसायने ही विषारी असून फवारणी करतेवेळी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. शरिरात या रसायनांचे अंश त्वचा, डोळे, श्वसन अशा माध्यमातून प्रमाणापेक्षा अधिक गेल्यास आरोग्याला व काही वेळा जिवालाही धोका होऊ शकतो.
विषबाधेची सामान्य लक्षणामध्ये डोळे जळजळणे, चेहऱ्याची तसेच पूर्ण शरीराची आग होणे, जास्त उन्हामध्ये फवारणी केल्यास चक्कर येणे, उलट्या होणे, डोके दुखू लागणे अशा लक्षणांचा समावेश होतो. फवारणीसाठी विषारी रसायने हाताळताना अधिक काळजी घेतली पाहिजे. द्रावण तयार करणे, प्रत्यक्ष फवारणी करणे आणि फवारणीनंतर शिल्लक द्रावण, रिकामे डबे, बाटल्या यांची विल्हेवाट लावणे अशा सर्व पातळीवर काळजी घेणे आवश्यक असते.

फवारणीआधी हे प्रश्न स्वतःला विचारा
१. पिकामध्ये कीडनाशकांच्या फवारणीची खरोखरच गरज आहे का?

 • गरज असेल तरच फवारणीचा निर्णय घ्यावा.
  २. आपण कीड किंवा रोगाचे योग्य निदान केले आहे का?
 • त्या कीड किंवा रोगासाठी त्या पिकामध्ये शिफारस असलेले रसायन निवडावे. सुरुवातीला कमी विषारी कीटकनाशक वापरावे.
  ३. किडीचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक आहे का?
 • आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कमी असताना फवारणी टाळावी. अगदीच आवश्यक असल्यास सेंद्रिय किंवा वनस्पतिजन्य घटकांची फवारणी करावी.
  ४. फवारणी यंत्र योग्यरीत्या चालते का?
 • साध्या पाण्याने प्रथम चाचणी करून घ्यावी. नोझलसह सर्व पाइप, टाकी इ. मध्ये गळती नसल्याची खात्री करून घ्यावी.
  ५. फवारणी यंत्र स्वच्छ आहे का?
  फवारणीनंतर आणि फवारणीआधी दरवेळी फवारणी यंत्र स्वच्छ धुवून घ्यावे.

फवारणी करताना ही काळजी घ्या.
१. कीडनाशकांचे द्रावण योग्य प्रकारे तयार करून घ्या. कीटकनाशके मिसळताना लहान मुले किंवा अन्य अनावश्यक व्यक्तींना दूर ठेवा.
२. स्वतःचे डोळे, तोंड,आणि त्वचा यांचा बचाव करण्यासाठी योग्य ते गॉगल, कपडे, मास्क, बूट यांचा वापर करा.
३. वेगाचे वारे, उच्च तापमान किंवा पावसात फवारणी करणे टाळा.
४. रसायनांचा अपव्यय टाळण्यासाठी फवारणीची योग्य दिशा निवडावी. नोझल आणि बूम योग्य उंचीवर ठेवावेत.
५. कीटकनाशके मिसळताना किंवा फवारताना काहीही खाऊ, पिऊ नका. तसेच धूम्रपान करू नका.

फवारणीनंतर घ्यावयाची खबरदारी
१. फवारणीनंतर उरलेले कीडनाशकाचे किंवा तणनाशकाचे द्रावणाची व्यवस्थित विल्हेवाट लावावी.
२. सिंचन कालवे किंवा तलावांमध्ये फवारणी यंत्रांची स्वच्छता करू नये. अशा स्वच्छतेचे पाणी पाण्याच्या कोणत्याही स्रोतामध्ये मिसळणार नाही, याची काळजी घ्यावी.
३. रिकामा बाटल्या, खोकी जमिनीमध्ये योग्य खोलीवर गाडून टाकावीत. अन्य कोणत्याही कारणांसाठी रिकाम्या बाटल्या, खोक्यांचा वापर करू नये.
४. कीटकनाशकांच्या वापराची योग्य नोंद ठेवा.
५. फवारणी केलेल्या शेतामध्ये लगेच कोणालाही फिरू देऊ नका. तेथून होणारी वर्दळ टाळा. जनावरे जाणार नाहीत, हे पाहा.
९. कोणत्याही फवारणीनंतर फवारणी यंत्र स्वच्छ धुवून ठेवावे.

फवारणी यंत्रांची निगा, देखभाल:
फवारणी यंत्राची क्षमता आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी त्याची वेळोवेळी योग्य देखभाल करणे अत्यंत गरजेचे आहे.
१. केरोसीन तेल किंवा भरपूर प्रमाणात पाण्याचा वापर करून ब्रश किंवा सुती कापडाने फवारणी यंत्राचा बाह्य पृष्ठभाग स्वच्छ करावा.
२. घर्षण आणि हालचाल होणाऱ्या भागावर वंगण तेल लावावे.
३. रासायनिक द्रावण टाकीमध्ये टाकताना नेहमी गाळून घ्यावे.
४. गॅस्केटसह झाकण गळती होणार नाही, हे पाहावे. असल्यास त्वरित दुरुस्त करावे.
५. फवारणी यंत्र व्यवस्थित ठेवावे. त्यावर काही जड वस्तू वगैरे ठेऊ नयेत.
६. डिस्चार्ज पाइप, नोझल्स शक्यतो स्वतंत्र आणि स्वच्छ ठेवावेत.
७. फिरणारे भाग आणि वॉशर इ. यंत्राच्या कंपनीने दिलेल्या देखभाल पत्रिकेनुसार ठराविक तेलातून स्वच्छ करून घ्यावेत.
८. ठराविक काळाने एकदा उपकरण योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात फवारणी करते की नाही, याची चाचणी घ्यावी.

डॉ. अमोल मिनिनाथ गोरे, ९४०४७६७९१७
( कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद.)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची