Monday, May 16, 2022

पिकांच्या जीवन क्रमामध्ये अन्नद्रव्याचे महत्त्व; काय आहेत कमतरतेची लक्षणे

माती आणि विविध खतांमधून अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर झाल्यास पिकाच्या जीवन चक्रातील सर्व प्रक्रिया सुरळीत होऊन पिके निरोगी राहतात. पीकवाढीच्या गरजेनुसार अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा. पिकांच्या वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. प्रत्येक अन्नद्रव्याची पिकांमध्ये विशिष्ट प्रकारचे कार्य करण्याची क्षमता आहे. या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दृश्य परिणाम दिसून येतात. मुख्यत्वे अन्नद्रव्यांचे वर्गीकरण हे भरपूर प्रमाणात लागणारी मुख्य अन्नद्रव्ये आणि कमी प्रमाणात लागणारी सुक्ष्म अन्नद्रव्य असे केले जाते.पिकांच्या जीवन क्रम पूर्ण होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनाची भूमिका ही फार महत्त्वाची ठरते. त्यासाठी आपण पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचे स्थान, त्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसून येणारी लक्षणे आणि त्यावरील उपाय आपण  बघू.

नत्र

पिकातील प्रथिने आणि हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करणारा नत्र हा महत्त्वाचा घटक आहे. नत्रामुळे पिकांची पाने हिरवीगार राहतात. पाने आणि खोडाची वाढ झपाट्याने होते.

नत्राची कमतरता असल्यास काय असतात लक्षणे –

पिकाची परिपक्व पाने प्रथम पिवळी होतात. मुळांची व पिकाची वाढ खुंटते. अति कमतरता असल्यास खालच्या भागातून वरच्या भागापर्यंत पाने  पिवळी होत  जातात.

उपाय-  आवश्यकतेनुसार नत्रयुक्त( युरिया )रासायनिक खतांचा वापर करावा.

स्फुरद –

द्विदल वनस्पतीमध्ये स्फुरदामुळे सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. पिकांच्या पेशींचे विघटन आणि वाढीसाठी स्फुरदची गरज असते.

स्फुरदची कमतरता असल्यास  लक्षणे-

 पिकांची पाने गर्द हिरवी व जांभळी लांबट होतात. मुळांची वाढ  मंदावते.

काय कराल उपाय – आवश्यकतेनुसार रासायनिक खते (सिंगल सुपर फास्फेट) द्यावीत.

पालाश

 पिकांची वाढ जोमदारपणे होते. कणखरपणा येतो त्यामुळे पिके अधिक वाढली तरी जमिनीवर लोळत नाहीत. कोरडवाहू जमिनीत पालाशच्या वापरामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंदावते पेशीमध्ये  पाणी अधिक साठून राहते.

पालाशची कमतरता असल्यास लक्षणे- 

पानांच्या कडा तांबडसर होऊन त्यावर तांबडे किंवा पिवळे ठिपके दिसतात. शेंडे गळून पडतात.

उपाय- पालाशयुक्त रासायनिक खते (म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावीत.

गंधक

सर्वाधिक गरज तेलबिया उत्पादनासाठी असते. कर्बोदके, प्रथिने, हरिद्रव्य आणि ग्लुकोसाईटच्या निर्मितीसाठी सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे.

लक्षणे (कमतरता असल्यास) – नवीन येणारे पाने व पालवी पिवळी पडू लागतात.

उपाय- कमतरता असलेल्या जमिनीत पेरणीच्या वेळेस ३० ते ४०  कि. गंधक प्रति हेक्टरी जिप्सम किंवा बेन्टोनाईट गंधकाद्वारे द्यावीत.

जस्त

संप्रेरकाची निर्मिती पिकांमध्ये असलेल्या जस्तच्या प्रमाणावर अवलंबून असते. वाढ बिंदूची वाढ झपाट्याने होण्यास मदत करते.

कमतरता असल्यास काय दिसतात लक्षणे – पानांचे आकारमान कमी होते. पानांच्या शिरांमधील भागात तपकिरी ठिपके पडतात व शेवटी पाणी पिवळी दिसतात.

उपाय – जस्त सल्फेटच्या ०.४ टक्के द्रावणाची फवारणी घ्यावी.

लोह

हरितद्रव्य तयार करण्यास मदत करते.  नत्र स्थिरीकरणामध्ये नायट्रोजीननेज या लोह युक्त विकराचे कार्य महत्त्वाचे आहे.

लक्षणे– नवीन येणाऱ्या पानांच्या शिरांमधील भाग पिवळा दिसतो. झाडाची वाढ खुंटते.

 उपाय– फेरस अमोनियम सल्फेटच्या ०.४ टक्के द्रावणाची फवारणी करावी.

मॅगनीज

पिकांच्या जैविक आणि जीव रासायनिक प्रक्रियांना मॅगनीज द्रव्य उत्तेजित करण्याचे कार्य करते.

लक्षणे – पिकांच्या पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा नंतर पांढरट व करडा होतो. पानांची वाढ कमी होते. पाने फिक्कट पिवळसर होते.

 उपाय -आवश्यकतेनुसार मॅगनीज सल्फेट जमिनीमधून द्यावे.

तांबे

 दवबिंदू आणि थंडीपासून बचाव करण्याची शक्ती पिकांमधील तांब्याच्या प्रमाणावर अवलंबून असते.

लक्षणे– पिकाच्या शेंड्याची वाढ खुंटते, खोडाची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडू लागतात.

 उपाय- मोरचुदाच्या .०४ टक्के द्रावणाच्या फवारा करावा.

मॉलिब्डेनम

नत्र स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्म जीवांची क्रियाशीलता वाढवते.

लक्षणे -पाने फिक्कट हिरवी होतात .सोनेरी पिवळी ते नारंगी ठिपके पानावर दिसतात हे ठिपके   शिरावर नसतात, पानांच्या खालच्या भागातून रेझिनयुक्त डिंक येतो.

 उपाय -अमोनियम मॉलिब्डेटची ०.०५ टक्के द्रावणाची फवारणी करावी.

बोरॉन

पिष्टमय पदार्थाच्या वहनास चालना मिळते. पाण्याचा पिकांवर होणारा ताण सोसण्यास  मदत करते.

लक्षणे – वनस्पतीच्या टोकावरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिकट होऊ लागतो. नवीन पालवी देठाकडून मरू लागते. नविन विकसित पाने मरतात.

उपाय -आवश्यकतेनुसार २ ते ३ कि. बोरॅक्‍स प्रति हेक्‍टरी जमिनीतून दर तीन वर्षानंतर द्यावे. पेरणीनंतर ३० ते ५५ दिवसांनी ०.२ टक्के बोरॅक्सची फवारणी करावी.

लेखक

 अजय एस. सोळंकी

एम. एस. सी.

मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र

डॉ.सौ.मनीषा एस. सोळंकी

 कृषी महाविद्यालय उदगीर जि.लातूर

अजय डी. शेळके

एम. एस. सी.

मृदा विज्ञान आणि कृषी रसायन शास्त्र

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची