जमिनीची कमी निचरा क्षमता, भूपृष्ठापासून कमी खोलीवर अभेद्य थर, पाण्याचा अनियंत्रित वापर, खारवट पाण्याचा शेतीसाठी वापर, कॅनॉल, तलावातून पाण्याचा पाझर, फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांचा कमी वापर, विस्कटलेली नैसर्गिक निचरा पद्धती यांसारख्या कारणांमुळे भारी काळ्या जमिनीमध्ये क्षार आणि पाण्याचे प्रमाण वाढत आहे. या जमिनींची सुपीकता कायम ठेवण्यासाठी सामूहिक पद्धतीने पाणी निचरा प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे.
सध्याच्या काळात क्षारपड व पाणथळ जमिनींच्या सुधारणेसाठी निचरा पद्धतीचा वापर महत्त्वाचा आहे. जोपर्यंत जमिनीत निचऱ्याचे प्रमाण वाढणार नाही तोपर्यंत कोणतीही भूसुधारके वापरून क्षारपड जमिनी लागवडीखाली आणणे शक्य होणार नाही. यासाठी निचरा पद्धतीची आखणी ही तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित करावी लागते. ही आखणी करताना क्षारपड क्षेत्राची सर्वेक्षण, कंटूर नकाशा, निचऱ्याचे पाणी निर्गमित करण्याची व्यवस्था, मातीतील क्षारांची संलग्न असणारे भौतिक व रासायनिक गुणधर्म, सच्छिद्रता, भूमिगत जलाची पातळी, पाण्याची क्षारता, जलीय संचालकता, पिकांना पाणी देण्याच्या पद्धती आणि पीक पद्धती आदी बाबींचा विचार करावा.


निचरा पद्धतीमुळे फायदे :
1) विविध पद्धती पिकांच्या वाढीसाठी योग्य असे जमिनीत वातावरण तयार करते. जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत करते. जमिनीत असणाऱ्या पोषक जिवाणूंची वाढ होते.
2) पिकाच्या कार्यक्षम मुळांची खोली वाढली जाऊन त्यामुळे पीक जोमदार वाढते.
3) जमिनीचा पोत सुधारून पाणी मुरण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ होते.
4) प्रमाणशीर मशागत करण्यास सोईस्कर जाते.
5) जमिनीचे तापमान पिकास योग्य असे राखले जाते.
6) जमिनीच्या भूपृष्ठावर क्षार साठवण्याची क्रिया मंदावते, जमीन लागवडीस योग्य होते.
7) वाफसा लवकर आल्यामुळे लागवड लवकर करता येते, बीजांकुरण वाढण्यास मदत होते.
प्रकाश खोत 7588588754
प्रबंधक होय आम्ही शेतकरी गन्ना मास्टर