Saturday, October 1, 2022

दुग्ध व्यवसायात यशस्वी व्हायचंय का ? मग अंमल करा ५१ सुत्री कार्यक्रमाचा

सध्या कोरोना विषाणूजन्य रोगाने तसेच परतीच्या मान्सूनने सगळीकडेच थैमान घातले असून त्यातून बळीराज्याला सावरणे खूप अवघड झाले आहे. तब्बल आठ महिने उलटून गेले तरी परिस्थती पूर्वपदावर येईनाशी झाली आहे. या आजारामुळे उत्पादित केलेला माल विक्रीसाठी अडचण येत असल्याने शेतमाल तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांना पुरेसा भाव मिळत नसल्याने आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या रोगामुळे अनेक कंपन्या बंद पडल्याने तरुण वर्गाच्या नोकऱ्या गेल्या. हाताला काम नसल्याने नागरिकांना पैशाची चणचण भासू लागली आहे. त्यातूनच शाश्वत उत्पन्नासाठी शेतीला जोडधंदा म्हणून पूर्वीपार चालत आलेला पशुपालन व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी काही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे महत्वाचे असते.

नवीन व्यवसाय म्हटले कि, भांडवल उभारणी ही आलीच परंतु काही चुकीच्या बाबींचा अवलंब केल्याने व्यवसाय तोट्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी आणि आताच्या पशुपालन व्यवस्थापनामध्ये खूप आमूलाग्र बदल झाले आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापरामुळे शारिरीक कष्ट खूप कमी होऊन दूध उत्पादनात वाढ झाली आहे. नवीन व्यावसायिकांनी पशुपालनातील बारकावे लक्षात घेऊन त्यात उतरले तर फायदेशीर दुग्धव्यवसाय करता येईल.

दुग्ध व्यवसायातील महत्वाची सुत्रे 

 • मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा तसेच शेडची दिशा दक्षिण-उत्तर असावी.
 • घरापासून गोठा शक्यतो १ किलोमीटर च्या आत असावा.जेणेकरून देखरेख करणे सोयीचे जाते.गावालगत गोठा असावा दूध डेअरी जवळ असावी तसेचगोठ्यापर्यंत येण्यासाठी ट्रॅक्टर किंवा ट्रक येईल, असा मोठा रस्ता असावा.  
 • गोठ्यात २४ तास विजेची सोय असावी. अन्यथा जनरेटरची व्यवस्था करावी. तसेच लाईट फिटिंग करूनच घ्यावी.
 • शेडची उंची जितकी जास्त तेवढी हवा खेळती राहते. पत्र्यावरती चुन्याचा मुलामा द्यावा किंवा पांढरा रंग द्यावा जेणेकरून उन्हाची त्रीव्रता कमी होईल.
 • गोठ्याच्या कडेने मजबूत लहान तारेचे कंपाउंड घालावे.भिंत शक्यतो टाळावी तारेच्या बाजूला लिंब, आंबा, सिताफळ, चिंच,नारळ इत्यादी झाडे लावावीत.जेणेकरून स्वच्छ हवा गोठ्यात येईल आणि जनावरे निरोगी राहतील.       
 • कमी दूधदेणारी जनावरे पाळण्यापेक्षा जास्त दूध देणारी जनावरे गोठ्यात ठेवावीत.
 • जनावरांच्या वयानुसार कप्पे करावेत उदा,दुधाळ गाई,लहान वासरे, मोठ्या कालवडी इ.
 • गव्हाणी करताना नालीतील उंचवटा कमी करावा जेणेकरून जनावराला वाकून चारा खाता येईल. उंचवटा केल्याने अपचन होते तसेच दूध जास्त मिळत नाही.
 • जनावरांचे शेड शक्यतो सिमेंट पत्र्याचे असावेत जेणेकरून उन्हाळ्यात जनावरांवर ताण निर्माणन झाल्याने त्याचा दूध उत्पादनावर परिणाम होणार नाही.  
 • सकस चाऱ्याच्या वैरणी कराव्यात उदा, मका,मेथीघास,बरसीम,ओट,कडवळ, सुपर नेपियर, इ.
 • गोठ्यामध्ये २४ तासकिंवा स्वच्छ, निर्मळ, थंड, तसेच कमी थंड व बिना वासाचे पाणी जनावरांना पिण्यास आवडते. तसेच पाण्याच्या टाकीला दर १५ दिवसांनी चुन्याचा मुलामा लावावा. टाकीत जंतूंची वाढ तसेच शेवाळ होणार नाही आणि पाणी स्वच्छ राहील. 
 • .गोठ्यात सूर्यप्रकाश येईल याप्रकारे गोठा बांधावा जेणेकरून त्वचा रोग होत नाही, गोठा वाळला राहतो,जनावरांना व्हिटॅमिन डि-३ मिळते, नख्या कोरड्या व कडक राहतात.
 • पंधरा दिवसाला रबरी मॅट निर्जंतुक कराव्यात, त्यामुळे विषाणूजन्य रोगाचे संक्रमण टळते.
 • म्हशीचे वर्षातून तीनवेळा केस कापावेत जेणेकरून अंगावर मळ न साचल्याने जनावर स्वछ व निरोगी दिसते.  
 • अपघात प्रसंगी म्हशीचे वासरू मरण पावल्याने म्हशी दूध देत नाहीत आटतात. तेव्हा मेलेल्या वासराची कातडी वापरून कृत्रिम वासरू तयार करावे किंवा मेलेल्या वासराचे कान कट करून पुढे टाका. जेणेकरून ती दूध देईल आणी येणारा तोटा सहन करावा लागणार नाही.
 • कुट्टीचे साधारण तुकडे १-१.५ इंच लांबीचे असावेत. जेणेकरून चारा लवकर चारा खाता येईल चारा चावण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही,त्यामुळे रवंथ करण्यास जास्त वेळ मिळतो. तसेच चारा कुट्टीच्या स्वरूपात वाया जाणार नाही,याची दक्षता घ्यावी.
 • जनावरांना वजनानुसार तसेच वयानुसार टोटल मिक्स राशन द्यावे जेणेकरून पचनक्रिया चांगली होते. परिणामी दूध व फॅट वाढते तसेच पोटफुगीच्या तक्रारी कमी होतात.
 • वर्षभर पुरेल एवढा ओल्या व सुक्या चाऱ्याचे नियोजन करावे. अन्यथा मुरघास करून ठेवावा. त्यामुळे दूध उत्पन्नात निश्चित राहते.  
 • जनावरांच्या आहारामध्ये दररोज लहान वासरांसाठी-२०-२५ ग्रॅम, मोठ्या कालवडीसाठी-५० ग्रॅम दुभत्या जनावरांसाठी ५०-१०० ग्रॅम खनिज मिश्रणाचा वापर करावा.
 • खनिज मिश्रणाच्या नियमित वापराने दूध उत्पादनात वाढ होऊन जनावरे नियमित लागू होतील, आजारी पडणार नाहीत.
 • जनावरांच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार पशुखाद्य कंपनीकडून खाद्य फॉर्म्युलेशन नुसार स्वतः बनवून घ्यावे. त्यामुळे चांगल्या पशुखाद्याची हमी मिळेल आणि जास्त फायदे होतील.
 • जनावरांना गर्भधारण काळात पोषक आहार आणि पाणी याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे.
 • वासराने चीक प्यायल्यावर ताबडतोब राहिलेला चीक काढावा.तसेच ऊर्जावर्धक गुळ, मका भरडा तसेच कडधान्य असा सकस चारा द्यावा त्यामुळे जार पडण्यास मदत होईल. जार पडण्यासाठी,चप्पल,लाकूड इ वस्तू बांधू नये.साधारण बारा तास जार पडण्याची वाट पाहावी.नंतरच पशुवैधकास बोलवावे.
 • गोठ्यात लसीकरणाचा तक्ता लावावा तसेच दर तीन महिन्यांनी आपल्या गोठ्यात लसीकरण मोहीम राबवावी त्याच्या नोंदी ठेवाव्यात. लाळ्या-सुरकूत रोगाची लस वर्षातून दोनवेळा म्हणजे ऑक्टोबर व मे महिन्यात यावी. घटसर्प, व फऱ्या रोगाची लस पावसाळ्यापूर्वी दयावी. दर ३ महिन्यांनी जंतनाशकऔषध द्यावे.  
 • मुक्त गोठ्यात शेण लवकर कुजण्यासाठी वेस्ट डिकंपोझरचा वापर करावा.किंवा गांडूळ खत निर्मिती करावी.
 • गोठ्यात गोचिडांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोंबड्या पाळाव्यात. 
 • दूध काढण्यासाठी चांगल्या प्रतीच्या मिल्किंग मशीनचा वापर करावा. जेणेकरून कासेतील सर्व दूध निघेल आणि कासदाह होणार नाही जास्त जनावरे असल्यास मिल्किंग पार्लर करावा.
 • धार काढून झाल्यावर टीट डिपींग करावे, त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येईल. 
 • गोठ्यात चांगल्या वंशावळीचा अधिक उत्पादनक्षम गाई निर्माण कराव्यात त्यासाठी दैनंदिन नोंदी ठेवाव्यात.
 • नवीन गाईंची खरेदी करताना तिचा बॉडी स्कोर तसेच उत्पादन क्षमतेचे रेकॉर्ड आधी चेक करावे, मगच खरेदी कराव्यात.
 • नवीन गाईंची खरेदी करण्यापूर्वी ज्या ठिकाणावरून आपण गाई घेणार आहोत. त्या ठिकाणचे खाद्याचे व्यवस्थापन समजून घेऊन अंमलबजावणी करावी.
 • ज्या ठिकाणाहून गाई विकत घेतल्या त्या ठिकाणचा आहाराचा फॉर्मुला न वापरल्याने तितके दूध उत्पादन आपल्या गोठ्यात मिळत नाही आणि आपण दुसरीच कारणे शोधून काढतो याच कारणामुळे पशुपालन व्यवसाय तोट्यात जातो.
 • पशुपालन व्यावसायात अपुरे ज्ञानामुळे खूप व्यवसाय तोट्यात जातात बंद पडतात बँकेचे हप्ते जात नाहीत त्यामुळे या व्यवसायास बँक लवकर कर्ज देत नाही. 
 • गोठ्यातील वातावरण नेहमी प्रसन्न राहण्यासाठी आणि गाईंवरील ताण कमी करण्यासाठी मधुर संगीताचे उपकरण लावावे.
 • आपल्या गोठ्यात सिमेन जतन करण्यासाठी क्रायोकॅन ठेवावा. सोबतच सर्जरी किट देखील ठेवावेत.
 • पशुपालन व्यवसायात एक निश्चित करावे दूधनिर्मिती किंवा कालवडींपासून चांगल्या गाई निर्माण करणे.
 • दुग्धव्यवसाय घरातील एका व्यक्तीच्या सल्ल्यानेच करावा म्हणजे लवकर टार्गेट पूर्ण होते.
 • आधुनिक पशुपालनाचा प्रशिक्षण घेणे तसेच नवनवीन प्रदर्शने पाहावयास नक्की जावे.
 • आपल्या व्यवसायातील नफा आपल्या स्वच्छ दूधनिर्मितीवर अवलंबून आहे. जनावरांची सेवा उत्तम रीतीने व्हावी म्हणून पशुपालकांनी दैनदिन कार्यक्रम आखावा आणि त्याचे काटेकोर पालन करावे.
 • गोठ्यात अनोळखी व्यक्तींना प्रवेश देवू नये. तसेच नवीन मित्र मंडळी पाहावयास आले असतील तर त्यांना शुकव्हर घालण्यास द्यावेत. जनावरांना त्यांचा काही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. 
 • गोठ्यात प्रसूती विभाग वेगळा करावा, त्याठिकाणी जवळ आलेली गाई बांधाव्यात.
 • परजीवी कीटकांचा जनावरांना त्रास होऊ नये म्हणून प्रोटेक्टेड जाळी लावावी. 
 • पावसाळ्यात माश्यांची उत्पत्ती जास्त होत असते यासाठी फ्लाय ट्रॅप लावावेत.
 • गरज वाटल्यास गोठ्यात सी सी टीव्ही कॅमेरे बसवा.
 • नवनवीन तज्ञ् तसेच वेगवेगळ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून सारखा बदल करू नये आधी पशुआहार तज्ञांचा सल्ला घ्यावा.     
 • गोठ्यातील मजुरांची कष्टाची कामे कमी होण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर करावा तसेच आठवड्यातून एक दिवस आलटून-पालटून सुट्टी द्यावी.
 • गोठ्यात अग्निरोधक कंटेनर ठेवावेत ते वापरण्याची माहिती कामगारांना द्यावी.
 • गोठ्यात काम करणारे मालक, मजूर तसेच जनावरांचा विमा काढून घ्यावा.  
 • नवीन पशुपालकांनी उच्च दर्जाच्या गोठ्याच्या मागे न लागता जनावरे उच्च दर्जाची अधिक उत्पादनक्षम ठेवावीत.
 • गोठ्याला एक चांगले नाव द्यावे व त्याच नावाचे बँकेमध्ये खाते तयार करावे. जेणेकरून सर्व पैशाचा अंदाज लागतो. फायदा तोटा समजतो तसेच व्यवहार चोख राहतात.
 • व्यवसायाचा जमाखर्च, आवर्ती व अनावर्ती यांच्या चोख नोंदी ठेवाव्यात. त्यानुसार आपल्या भावी योजना आखाव्यात.

लेखक  –

प्रानितीन रापिसाळ

डेअरी प्रशिक्षक,स्किल इंडिया प्रोजेक्ट,

विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयबारामती.

मो.नं– ८००७३१३५९७ ई-मेल-nitinpisal2312@gmail.com

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची