शेती हा एक असा व्यवसाय आहे जिथे आपण अनेक प्रकारचे प्रयोग करू शकतो. धान्यापासून ते फुले उगवण्यापासून शेतकरी चांगली कमाई करू शकतात. आज आपण गुजरातमधील अशा जोडप्याची कथा पाहणार आहोत ज्यांनी गुलाबांची शेती करून आपले नशीब बदलवले आहे.
गुजरातमधील नवसारी या ठिकाणी राहणारे जाकीर मुल्ला व त्यांची पत्नी शमशाद. या कुटुंबाला सुरवातीला अनेक संकटाचा सामना करावा लागला. कुटुंबातील वादामुळे या जोडप्याला आपल्या मुलांसोबत घराबाहेर पडावे लागले तेव्हा त्यांच्याकडे केवळ अर्धा एकर जमीन होती. याच अर्धा एकर जमिनीवर छोटेसे घर बनवून उर्वरित जागेत त्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली.
पुढील काही वर्षे जाकीर व शमशाद यांच्यासाठी कष्टाची होती. शेतीमधून पीक चांगले येत नव्हते तसेच कुटुंबातील ६ सदस्यांचा उदरनिर्वाह करणे कठीण जात होते.जाकीर सांगतात की सुरवातीला भाज्या पिकवून बाजारात विक्री केल्या जात असत परंतु कधीकधी भाजीपाला एवढा कमी निघत असे की ज्यामुळे आम्हाला दुसऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करावा लागत असे.

शेतामध्ये असणाऱ्या दोन गुलाबाच्या झाडांपासून शमशाद मुलांसाठी गुलकंद बनवत असत.तेव्हाच त्यांच्या डोक्यात गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद बनवण्याचा विचार आला.
यानंतर या जोडप्याने गुलाब उत्पादनावर भर देण्यास सुरवात केली.गुलाबापासून गुलकंद, गुलाबजल व चेहऱ्यावरती लावण्यासाठी फेसपॅक तयार करण्यास सुरवात केली. या उद्योगामुळे त्यांच्या उत्पन्नात प्रति माह २५ हजार रुपयापेक्षा जास्त कमाई होऊ लागली.
यानंतर या जोडप्याने गुलकंद बनवण्याचे ठरवले. जाकीर यांनी कृषी विभागातील संशोधकांकडे मदत मागितली व त्यांना स्वतः तयार केलेल्या गुलकंदचे सॅम्पल दाखवले. तेथील अधिकाऱ्यांचे सकारात्मक उत्तर मिळाले व त्यांनी जाकीर यांना प्राकृतिक पद्धतीने गुलकंद बनवण्याचे प्रशिक्षण घेण्याचे सुचवले.

जाकीर यांनी सर्व पद्धती शिकून घेतल्या व त्यासाठी एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले.
सुरवातीला जाकीर यांनी १००० देशी गुलाबांची झाडे खरेदी केली व त्यांची देखभाल करण्यास सुरवात केली.
‘जैविक शमा गुलकंद ब्रँड’ या नावाने जाकीर यांनी गुलकंदचे नाव रजिस्टर केले. आज झाकीर यांचा गुलकंद ४०० रुपये प्रति किलो या दराने विक्री होतो.
शमशाद सांगतात की धोका पत्करून मेहनत व इच्छाशक्तीच्या जोरावर प्रयत्न केले म्हणूनच यश मिळाले. आज ग्राहक स्वतः जाकीर यांना फोन करून गुलकंद व इतर उत्पादनासाठी ऑर्डर करतात.