Saturday, August 13, 2022

गन्ना मास्टर तंत्रज्ञानातील एक अविभाज्य भाग- “पाचट व्यवस्थापन”

कोणतीही चांगली गोष्ट शेतकऱ्यांच्या पचनी पडायला बराच काळ जातो. पाचट व्यवस्थापनाचे ही तसेच आहे. शेतकऱ्यांना कितीही समजून सांगितलं तरी आजून पाचट ठेवण्याबाबत उदासीनता दिसते. पाचट हा ऊस शेतीचा आत्मा आहे. जर तुम्ही हा आत्माच काढून टाकत असाल तर? खालील पोस्ट वाचण्यापूर्वी फक्त एकदा या गोष्टीवर विचार करा आणि नंतर ही पोस्ट वाचा.

एक कडेपेटीतील काडी ओढून आपण एकऱ्यातील पाचट अर्ध्या तासात जाळून राख करून टाकतो. परंतु त्याच पचाटातून आपण जमिनीला नत्र स्फुरद पालाश मिळवून देऊ शकतो हे आपल्या डोक्यातच येत नाही. अडसाली कोणतीहीउसातून हेक्टरी जवळपास ८ ते १२ टन पाचट निघते. त्या पाचटामध्ये असणारे ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद व ७५ ते १०० किलो पोटॅश पुढील पिकास उपलब्ध होते. आज ऊस क्षेत्राचा विचार केला तर जवळपास ७०% शेतकरी उसाचे पाचट जाळून घालवत आहेत. हे पाचट जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होऊन उष्णतेने जमीन आणि त्यातील उपयुक्त जिवाणू आणि गांडुळावर देखील परिणाम होत आहे. आपण आपल्या हाताने जमिनीचे आरोग्य बिघडवण्यासाठी मदत करत आहोत हे यावरून सिद्ध होते. प्रचंड उष्णतेमुळे जमिनीच्या वरचा पिकवू थर आपण जाळून घालवत आहोत व जमीन बंजर बनवत आहोत.

याच्या उलट जर आपण विचार केला तर पाचट ठेवल्यामुळे आपल्या शेतीला प्रचंड फायदे आहेत. हे फायदे एकदा आपणास समजले तर नक्कीच आपण पाचट न जळता त्याचे व्यवस्थापन कराल हा मला विश्वास आहे.

???? पाचट कुट्टी करून सरीमध्ये त्याचे आच्छादन केल्यास
तण उगवत नाही. त्यामुळे भांगलणी व मशागतीच्या खर्चात जवळपास ५० टक्के बचत होते.

????कृषी संशोधन संस्थांच्या शिफारशीनुसार ऊस पिकास हेक्‍टरी २.५ ते ३.५ कोटी लिटर पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जातो. पाचट ठेवल्याने आपणास हेक्‍टरी १.२५ ते १.५० कोटी लिटर पाण्याची व ते वहन करण्यासाठी आवश्‍यक सुमारे १०० ते १२५ युनिट विजेची बचत होते.

????पाचटाच्या पूर्ण अच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. शेतात ओलाव्याचे प्रमाण दीर्घकाळ (१५ ते २० दिवस) टिकून राहते. त्यामुळे भारनियमामुळे पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढले तरी उसाची वाढ चांगली होते.

????शेतात पाचट ठेवल्यामुळे जमिनीचे तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअसने थंड राखले जाते.

????शेतात गांडुळाची व उपयुक्त जिवाणूची नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते, त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते.

????पाचटातील सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारतात. जलसंधारण शक्ती वाढते.

“पाचट व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय?”
आपल्या शेतातून जे पाचट निघतं ते बारीक करून शेतातच गाढणे आणि त्याच्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती शेतातच करणे हे होय. यामध्ये पाचट कुट्टी मशीन च्या सहाय्याने पाचट बारीक करून घ्यावे. पाचट पूर्णपणे सरीत दाबून घेऊन बगला चिरून त्यावर माती टाकावी. त्याच वेळी पाचटावर एकरी दोन बॅग युरिया आणि दोन बॅग सुपर फॉस्फेट त्यासोबत पाचट कुजवणाऱ्या जीवाणूंचे कल्चर ही टाकावे म्हणजे ८० ते ९० दिवसात हे पाचट कुजून जाईल.

त्यानंतर शक्य असल्यास शेताला पाटाद्वारे पाणी द्या. ज्या शेतकऱ्यांच्याकडे ड्रीप आहे त्यांनी ड्रीप सरीवर अंथरून पाणी द्यावे. ४० ते ५० दिवसांनी पावर टिलर पुढे चालवून पाचट मातीत मिक्स घ्यावे. अश्या पद्धतीने नियोजन केल्यास पाचट ८० ते ९० दिवसात कुजून जाईल व नंतर खोडव्यात भर देखील लावता येईल.

बऱ्याच शेतकऱ्यांना ऊस गेल्यावर लगेच दुसरे पीक घ्यायचे असते त्यामुळे ते पाचट जाळून टाकतात व जमीन तयार करतात. आपणास लगेच कोणतेही पीक घ्यायचे असल्यास पाचट आहे तसे ठेवून कुट्टी करून डबल रोटर मारून घ्या वर खोल नांगरट करा. अश्या पद्धतीने नियोजन केल्यास जमीन लवकर तयार होईल.

एक गोष्ट लक्षात ठेवा पाचट जाळणे म्हणजे १० जन्माचे पाप या एकाच जन्मात करणे हे आहे. जर आपण जमिनीचा आत्माच जाळून घालवत असू तर आपल्या शेती करण्याला काहीही अर्थ राहत नाही. त्यामुळं आज ही पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येकाने निश्चय करा की मी पाचट जळणार नाही. पाचटाचे व्यवस्थापन करून मी जमिनीची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करेन.

डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले
संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
गन्ना मास्टर ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. ली.
आष्टा ता. वाळवा जि. सांगली
८२७५३९१७३१

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची