Saturday, October 1, 2022

कांदा – समस्या व एक सोल्यूशन

सायन्स फॉर सोसायटी (S4S) असे एंटरप्राईजचे नाव. जसे नाव तसे काम.

S4S ने शेतमाल निर्जलीकरणाचे (डिहायड्रेशन) सोलर ड्रायर विकसित केले आहे आणि त्याचे पेटंटही घेतलेय.

वैभव तिडके, निधी पंत, स्वप्निल कोकाटे, शीतल सोमानी, तुषार गवारे, गणेश भेरे, अश्विन गावडे या इंजिनिअर्सची ही कंपनी. तुषार कोपरगावचे, अश्विन शहापूरचे, तर उर्वरित सर्व मराठवाड्यातले.

सोलर ड्रायरचे पेटंट न विकता, त्याचे भारतीय शेतीत अॅप्लिकेशन करण्याचा उद्देश सायन्स फॉर सोसायटी या नावाला साजेसा आहे.

‘सायन्स फॉर सोसायटी’ अशा एक विचाराने, एक सूत्राने बांधलेल्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या टीमने आठ वर्षांपूर्वी सोलर कंडक्शन ड्रायर तयार केला. कांद्यासह शेतमालाचे घरगुती पातळीवर आणि सौर उर्जेच्या साह्याने डिहायड्रेशन – निर्जलीकरणाचे सोपे, सुटसूटीत ड्रायर – युनिट तयार केले. दहा किलो ताज्या कांद्यापासून एक किलो डिहायड्रेटेड कांदा तयार होतो. हाच एक किलो कांदा रि-हायड्रेड केला की त्यापासून 9-10 किलोपर्यंत कांदा परत मिळतो.

S4S ने आठ वर्षापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यांत शेतावर सोलर ड्रायरच्या ट्रायल्स यशस्वी केल्या… पण शेतकरी डिहायड्रेटेड (वाळवून सुकलेला) माल कुठे विकणार, असा प्रश्न होता. म्हणून त्यांनी स्वत:च डिहायड्रेड कांदा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. बड्या फुड कंपन्या आणि होरेका (हॉटेल्स, रेस्टॉरंट, केटरर्स) यांना पुरवठा सुरू केला… होरेका सेगमेंटमध्ये तर S4S ने भारतात सर्वप्रथम काम सुरू केले.

आजघडीला 2020 मध्ये S4S ने चांगला जम बसवला आहे. मुंबईत मुख्य कार्यालय आहे, तर औरंगाबादेत कांदा वाळवणीचे कामकाज चालते.
औरंगाबाद जिल्ह्यात महिला बचत गटांना कांदा वाळवणी करणाऱ्या सोलर मशिनचा सेट दिला जातो. त्यांच्याकडून वाळवलेला कांदा ठराविक रेट्सने विकत घेतला जातो. पुढे मॅरिको सारख्या फूड कंपन्या व होरेका सेक्टरला विक्री केला जातो.

फोर्ब्ज मासिकाने S4S च्या कामाची दखल घेतली आहे. (लिंक कमेंटीत.)
कंपनीचे एक संस्थापक तुषार गवारे यांच्याशी झालेला संवाद लवकरच अॅग्रोवन डिजिटलच्या फेसबूक पेजवर येईल.

तुषार यांच्याकडील माहितीनुसार
भारतात सुमारे 30 टक्के कांदा होरेका सेगमेंटमध्ये जातो. होरेकाला ग्रेव्हीसाठी लागणारा कांदा डिहायड्रेड स्वरूपात उपयुक्त ठरतो. स्टोअरेजसाठी जागा कमी लागते, योग्य गुणवत्तेचा माल साठवता येतो, शिवाय बाजारभाव अस्थिरतेपासून संरक्षण मिळते.

भारताची कांद्यासाठीची देशांतर्गत गरज सुमारे 200 लाख टनाची आहे. दरवर्षी सुमारे 3 ते 4 टक्क्यांनी मागणी वाढतेय. 200 लाख टनातील 30 टक्के म्हणजे साठ लाख टन होरेका – सेक्टरमध्ये खपतो. आजघडीला होरेकामधील डिहायड्रेड कांद्याचा खप एकूण नियमित मागणीच्या एक टक्काही नसावा. हळूहळू हिस्सा वाढत जाईल. अर्थात, हे अतिशय एंटरप्राईजिंग, लॉंगटर्म काम आहे. हे मॉडेल रेप्लिकेबल आहे, पण त्यासाठी S4S च्या टीम सारखे कौशल्य, संयम, कामाची श्रद्धा आणि कष्ट आदी गुण आत्मसात करावे लागतील.

S4S च्या टीममधील शीतल सोमानी व स्वप्निल कोकाटे यांची एक वर्षापूर्वी भेट झाली होती. तेव्हा, या टीमचे सदस्य गेली सात वर्ष किती झोकून देऊन काम करताहेत, त्याचा अंदाज आला. ( संपर्कासाठी कमेंट मध्ये वेबसाईट ची लिंक पोस्ट केली आहे आणि वेबसाईटवर संपर्क क्रमांक दिले आहेत) https://s4stechnologies.com/

माहिती असाव्यात अशा नोंदी :

  1. प्राईस स्टॅबेलायजेशन फंड्स अंतर्गत नाफेडने 900 रुपये प्रतिक्विंटलला एक लाख टन कांदा खरेदी केला. त्यातील 40 हजार टन कांदा सडला. म्हणून, केंद्र सरकारने यंदा नाफेडला सूचना केलीय, की एवढी घट होवू नये म्हणून उपाययोजना करा.
  2. यंदा देशात केवळ रब्बी हंगामात 213 लाख टन कांदा उत्पादन झाले होते. त्यातील सुमारे 40 टक्के माल हार्वेस्टिंगनंतर विविध कारणांमुळे खराब झाला.
    यंदा 15 एप्रिल ते 15 ऑगस्टमध्ये बाजार समित्यांत आठशे रुपये प्रतिक्विंटल सरासरीने, मंदीच्या रेट्समध्ये कांदा विकला गेला.
  3. देशात एकूण उत्पादित कांद्याच्या तुलनेत 3 टक्क्याहून कमी कांद्याचे डिहायड्रेशन होते. महूआ – भावनगर गुजरात येथे कांदा डिहायड्रेशन उद्योग एकवटला आहे. येथील 100 हून अधिक डिहायड्रेशन युनिट्सद्वारे 60 हजार टन उत्पादन होते. त्यातील 80 टक्क्याहून अधिक मालाची युरोपात निर्यात होते.

संभाव्य उपाययोजना :
केंद्र सरकारने कांदा स्वस्त असतो, तेव्हा त्याच्या डिहायड्रेशनला प्रोत्साहन दिले, तर टंचाईच्या काळात होरेका सेगमेंटसह रिटेलमध्ये त्याची विक्री करता येईल. होरेका सेक्टरमध्ये डिहायड्रेड कांद्याचा उपयोग यशस्वीरित्या होतोय, हे s4s ने सिद्ध केलेय. केंद्र सरकारने निर्यातबंदी न करता डिहायड्रेड फॉर्ममध्ये कांद्याचे साठे उभारणे योग्य राहिल. डिहायड्रेड कांदा दोन वर्ष टिकतो. कांदा स्वस्त असतो, तेव्हा त्याची खरेदी करून डिहायड्रेशनकडे वळता करता येईल, टंचाई असते तेव्हा तो बाजारात आणून टंचाईवर उपाय योजता येतील. अर्थात, कांदा पेचप्रसंगावरील अनेक उपायांमधला हा एक उपाय आहे. केवळ याच उपायाने समस्या सुटतील असा दावा नाही.

  • दीपक चव्हाण, ता. 9 डिसेंबर 2020.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची