पिकासाठी खतांची मात्रा किती द्यायची हे जमिनीचा प्रकार, लागवडीचे हंगाम, वापरली जाणारी आणि खत देण्याच्या पद्धती यावर अवलंबून असते. माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी.प्रतिहेक्टरी ११० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ६० किलो पालाश व ५० किलो गंधकयुक्त खते द्यावीत. यापैकी १/३ भाग नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश व गंधक लागवडीच्या वेळी आणि राहिलेले नत्र दोन हप्त्यात विभागून द्यावे.
नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर ३० दिवसांनी आणि दुसरा त्यानंतर १५ ते २० दिवसाने द्यावा. शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा नत्र खत जास्त आणि लागवडीच्या ६० दिवसानंतरसुद्धा दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते, माना जाड होऊ लागतात. कांदा आकारामध्ये लहान रहातो, जोड कांद्याचे प्रमाण जास्त होते. साठवण क्षमता कमी होते.
स्फुरद जमिनीत ३ ते ४ इंच खोलीवर रोपांच्या लागवडीअगोदर द्यावे. म्हणजे नवीन मूळ तयार होईपर्यंत स्फुरद उपलब्ध होते.स्फुरदाच्याबरोबरीने पालाशची पूर्ण मात्रा लागवडी अगोदर द्यावी.कांद्यामध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असते आणि म्हणून कांद्यासाठी गंधकयुक्त खतांची गरज भासते. पिकास सिंगल सुपर फास्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आणि अमोनियम सल्फेट खत दिले तर गंधक वेगळा वापरण्याची गरज नाही. जस्त, लोह व मॅंगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरजेनुसार फवारणीदेखील फायदेशीर ठरते.खत पेरून गादी वाफे तयार करावेत. राहिलेले नत्र तीन-चार हप्त्यांत द्यावे. ठिबक सिंचन असेल तर खताच्या टाकीतून युरिया द्यावा. तुषार सिंचन असेल तर वाफ्यावर युरिया फोकून द्यावा. त्यानंतर संच चालवावा.
ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देता येतात. खतांच्या मात्रा कमी प्रमाणात अधिक भागात विभागून दिल्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते. उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ होते. पाण्याची ३० ते ४० टक्के बचत होते. एकसारख्या उत्पादनाची प्रतवारी मिळते. विक्रीलायक कांद्याचे प्रमाण जास्त मिळते. रोपांचे नागे पडण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीत सतत वापसा रहात असल्याने जमीन भुसभुशीत राहून काढणी सोपी होते.फॉस्फरस , पोटॅश आणि गंधक लागवडीआधी जमिनीत वाफे तयार करताना द्यावे. मात्र, नत्र देताना ते पाच ते आठ वेळा विभागून लागवडीच्या ६० दिवसांपर्यंत ठिबकमधून द्यावे.
