Saturday, May 21, 2022

उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य

रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा अत्यल्प व अनियमित वापर, सूक्ष्म अन्नद्रव्युक्त खतांचा अत्यल्प वापर, जमिनीला विश्रांती न देणे, पिकांची योग्य फेरपालट न करणे, नेहमी एका जमिनीतून एकाच प्रकारच्या पिकाचे उत्पादन घेणे, जमिनीचा सामू जास्त असणे, मुक्त चुन्याचे प्रमाण जास्त असणे इ. अनेक कारणांमुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीमध्ये उपलब्धता कमी जाणवते. त्यांच्या कमतरतेमुळे पीकवाढीवर अनिष्ट परिणाम दिसून येतो. पर्यायाने ऊस व साखर उत्पादनात घट येते. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे सूक्ष्म अन्नद्रव्यांबाबतच्या झालेल्या संशोधनावरून असे आढळून आले आहे, की राज्यातील उसाखालील जमिनींमध्ये लोह, मॅंगनीज, जस्त आणि बोरॉन या चार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवते.

माती परीक्षण अहवालानुसारच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपाययोजना कराव्यात. तृणधान्य पिके तांबे व जस्त जास्त प्रमाणात, तर कडधान्य पिके बोरॉन व मॉलीब्डेनम तुलनात्मकदृष्ट्या जास्त प्रमाणात जमिनीतून घेतात. म्हणून कडधान्य व तृणधान्य पिकांची फेरपालट करावी. गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा शिफारस केल्याप्रमाणेच वापर करावा. ज्या जमिनीत लोह, जस्त, मंगल आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे, त्या जमिनीत रासायनिक खतांव्यतिरिक्त लोहासाठी 25 किलो हिराकस, जस्तासाठी 20 किलो झिंक सल्फेट, मंगलसाठी दहा किलो मॅंगनीज सल्फेट आणि बोरॉनसाठी पाच किलो बोरॅक्‍स प्रति हेक्‍टरी वापरावे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करताना ते जसेच्या तसे जमिनीत घालू नयेत. सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते ही शेणखतात 1ः10 या प्रमाणात मिसळून दिल्यास जास्त फायद्याचे ठरते. यासाठी एक किलो सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत चांगले कुजलेल्या दहा किलो शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून त्यावर पाणी शिंपडावे व पाच ते सहा दिवसांनी चांगले मुरल्यावर ते रासायनिक वरखतांच्या मात्रेसोबत जमिनीत चळी घेऊन द्यावे, त्यामुळे जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

जस्त (झिंक)

कार्य :

1) पिकांची वाढ करणाऱ्या संप्रेरकांच्या (ऑक्‍झिन्स) निर्मितीसाठी.

2) वनस्पतीमध्ये इंडोल ऍसिटिक ऍसिड (आय.ए.ए.) तयार होण्यासाठी ट्रिप्टोफेनच्या निर्मितीची आवश्‍यकता असते व त्यासाठी जस्ताची आवश्‍यकता असते.

3) वनस्पतीमध्ये प्रथिने व न्युक्‍लीक आम्लांच्या निर्मितीत सहभाग.

4) वनस्पतीच्या पाणी शोषण कार्यात जस्ताची मदत होते.

5) वेगवेगळी विकरे (एन्झाईम्स) निर्मितीसाठी जस्त आवश्‍यक असते.

6) अति उष्णता, धुके व पूर परिस्थिती असल्यास पिकामध्ये प्रतिकारक्षमता वाढविते.

कमतरतेची लक्षणे
1) उसाची पाने लहान व अरुंद दिसतात.

2) पानांत हरितद्रव्यांचा अभाव दिसू लागतो, पानांच्या शिरा हिरव्याच असतात.

3) ऊस पिकात उगवणीनंतर चौथ्या किंवा पाचव्या आठवड्यात मुख्य शिरेजवळ पांढरे पट्टे दिसतात. पानांचे पाते अरुंद होऊन टोके लहान होतात. उसावर मेणाच्या थराचे आवरण अधिक प्रमाणात दिसते, तसेच कांड्या आखूड पडतात.

4) अँथोसायनीन पिगमेंटची निर्मिती पानांमध्ये दिसते.

उपाययोजनाजस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत ऊस लागवड करताना प्रति हेक्‍टरी 20 किलो झिंक सल्फेट शेणखतात मुरवून दिल्यास ऊस उत्पादनात भरघोस वाढ होते. खोडवा पिकासदेखील 20 किलो झिंक सल्फेट प्रति हेक्‍टरी वापरल्यास उत्पादन वाढते. खारवट चोपण जमिनीत किंवा जमीन खारवट असल्यास प्रति हेक्‍टरी 40 किलो झिंग सल्फेट वापरावे. नदीकाठच्या गाळाच्या जमिनीमध्ये प्रति हेक्‍टरी 50 किलो झिंक सल्फेट वापरावे.लोह (फेरस)

कार्य : 1) पानांचा हिरवा रंग हा हरितद्रव्यामुळे (क्‍लोरोफील) येत असतो आणि म्हणून हरितद्रव्यांच्या निर्मितीसाठी लोहाची गरज असते.

2) प्रथिने (फेरॉडॉक्‍झिन) व विकर यांच्या निर्मितीत लोहाचा महत्त्वाचा सहभाग असतो.

3) प्रकाशसंश्‍लेषण व श्‍वसनक्रियेत लोहाचा सहभाग असतो.

4) नत्र, स्फुरद व पालाश यांच्या शोषणात लोहाचा अप्रत्यक्ष सहभाग असतो.

कमतरतेची लक्षणे
1) हरितद्रव्यांच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो व शिरा फक्त हिरव्या दिसतात.

2) लोहाची तीव्रता खूपच जास्त असेल, तर पानांच्या या हिरव्या शिरादेखील पिवळ्या पडतात आणि पाने पूर्णपणे पांढरी पडतात. उदा. उसावरील केवडा.

3) पिकांच्या मुळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो व पर्यायाने पिकांची वाढ खुंटते.

लोहयुक्त खतांचा वापर
लोहाची कमतरता असलेल्या जमिनीत लागणीच्या वेळी व खोडवा उसाला प्रत्येकी 25 किलो फेरस सल्फेट प्रति हेक्‍टरी शेणखतात मुरवून दिल्यास ऊस उत्पादनात भरीव वाढ झाल्याचे दिसून आले आहे. खारवट – चोपण किंवा पूरबुडित क्षेत्राच्या ठिकाणी हेक्‍टरी 50 किलो फेरस सल्फेट वापरल्यास ऊस व साखर उतारा वाढल्याचे दिसून आले आहे.

  • 02169 – 265333, 265335
    मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची