Saturday, May 21, 2022

उसातील कार्यक्षम नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन उपयुक्त

ऊस पिकामध्ये शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर करतात. या अति खत वापरामुळे जमिनी क्षारयुक्त होण्याबरोबरच हरितगृह वायूच्या उत्सर्जनात भर पडते.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड विद्यापीठातील संशोधकांनी उसाच्या उत्पादनात घट न येऊ देता हे नायट्रस ऑक्‍साईडचे उत्सर्जन कमी करण्यासंदर्भात संशोधन केले आहे, त्यामुळे नत्रयुक्त खताच्या कार्यक्षम वापराबरोबरच उत्पादनात वाढ मिळवणे शक्‍य होणार आहे.
जागतिक तापमानवाढीमध्ये नत्रयुक्त खताच्या अति वापरामुळे भर पडत आहे.

जमिनीतून होणाऱ्या नायट्रस ऑक्‍साईडचे उत्सर्जन हे कार्बन- डाय- ऑक्‍साईडच्या 300 पट अधिक घातक आहे, त्यामुळे क्वीन्सलॅंड विद्यापीठातील पर्यावरण आणि स्रोत व्यवस्थापन विभाग (DERM) यांनी याविषयी संशोधन केले असून, कॉमनवेल्थ कृषी मत्स्य आणि वन विभाग (DAFF), धान्य संशोधन आणि विकास संस्था (GRDC) यांनी संशोधनासाठी साह्य केले आहे.

डेर्म (DERM)चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. वेजिन वांग यांनी सांगितले, की मागील काही संशोधनांवरून ऊस शेतीमधून प्रति हेक्‍टरी प्रति वर्ष पाच ते 25 किलो नायट्रोजन नायट्रस ऑक्‍साईडच्या स्वरूपात बाहेर टाकला जातो.

मातीचा प्रकार, हवामान आणि वापरण्यात आलेले नत्रयुक्त खत यावर त्याचे प्रमाण अवलंबून असते. हेच प्रमाण ऑस्ट्रेलियातील व्हिक्‍टोरियन आणि पश्‍चिम भागातील गहू शेतीमध्ये प्रति हेक्‍टरी प्रति वर्ष 0.1 ते 0.2 किलो एवढे कमी आहे. म्हणजेच ऊस शेतीमध्ये वापरण्यात येत असलेले खत हे मोठ्या प्रमाणात हवेत उडून जाते. त्याचा उत्पादनासाठी काहीही उपयोग होत नाही. हे अतिरिक्त नत्र जमिनीत स्थिर करण्यासाठी सोयाबीनचा वापर हिरवळीचे खत म्हणून केल्यास अधिक लाभ होत असल्याचे आढळले आहे.

…असे झाले संशोधन
नायट्रस ऑक्‍साईडचे प्रमाण मोजण्यासाठी दोन पद्धतींचा वापर करण्यात आला. चाचणी प्रक्षेत्रावर नऊ चेंबरची उभारणी केली. त्यात चाळीस मिनिटांकरिता हा वायू गोळा केला जात असे. दिवसातून 12 वेळा त्याची नोंद केली जात असे.

तसेच, परिसरातील अन्य काही प्रक्षेत्रांवर माणसांच्या साह्याने नायट्रस ऑक्‍साईड वायूची मोजणी केली जात असे. त्यात प्रामुख्याने मातीचे तापमान, मातीतील आर्द्रतेचे प्रमाण, नत्राचे प्रमाण, पिकाचे उत्पादन, नत्राचा पिकासाठी होणारा वापर यांच्या नोंदी केल्या जात.

उसाच्या शेतात पीक नसताना जानेवारी ते जून 2010 मध्ये या प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. जमिनीतील नत्राचे स्थिरीकरण करण्याच्या उद्देशाने पडीक जमिनीवर सोयाबीनचे पीक घेण्यात आले. तरीही नायट्रस ऑक्‍साईडच्या उत्सर्जनात फार घट झाली नाही. सोयाबीनच्या काढणीनंतर शेतात शिल्लक टाकाऊ भागामुळे उत्सर्जनाचे प्रमाण वाढल्याचे आढळले, ते प्रमाण सुमारे 75 किलो प्रति हेक्‍टरपर्यंत वाढले होते. म्हणजेच सोयाबीनच्या टाकाऊ भागाचे व्यवस्थापन सुधारणे आवश्‍यक असल्याचे लक्षात आले.

नुसत्या उसामध्ये खताच्या वापरानंतर उत्सर्जित होणाऱ्या नायट्रस ऑक्‍साईडचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले.
सोयाबीनचा टाकाऊ भाग जमिनीच्या पृष्ठभागावर पसरल्याने नायट्रस ऑक्‍साईडच्या उत्सर्जनात काही प्रमाणात घट होते. आदर्श परिस्थितीत सोयाबीन जमिनीतील हेक्‍टरी 100 किलोपेक्षा अधिक नत्र स्थिर करू शकते.

संबंधित लेख

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची