यंदा उसाचे क्षेत्र एक लाख हेक्टरने वाढले असून अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे नियोजन साखर आयुक्तालयाने केले आहे.
सांगली,कोल्हापूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये उसाचे क्षेत्र वाढले आहे. यंदाच्या गाळप हंगामासाठी राज्यात सुमारे १४ लाख ६८ हजार हेक्टरवरील उसाचे गाळप करावे लागणार आहे. मागच्या वर्षी उस्मानाबाद, सोलापूर, नगर, कोल्हापूर व सांगली अशा जिल्ह्यांमध्ये दीड लाखांहून अधिक हेक्टरवरील ऊस अतिरिक्त झाला होता.
२०० कारखाने सुरु असतानाही काही कारखान्यांना मे महिन्यापर्यंत गाळप सुरु ठेवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर तीन-चार दिवसांपूर्वी साखर आयुक्तालयाची बैठक पार पडली. त्यावेळी राज्यातील उसाचे एकूण क्षेत्र, सुरु होणारे कारखाने, यासंदर्भात माहिती संकलित करून आगामी गाळप हंगामाचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, ज्या कारखान्यांनी मागील गाळप हंगामातील शेतकऱ्यांची एफआरपी १०० टक्के दिली आहे, त्यांनाच गाळपाची परवानगी दिली जाणार असल्याचेही साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.५० हजार कोटींचा रेकॉर्ड ब्रेक हंगामराज्याच्या साखर कारखानदारीत मागील गाळप हंगामात नवा रेकॉर्ड झाला. राज्यातील २०० कारखान्यांनी १३७ लाख मे.टन साखर उत्पादित केली. त्यातील ६१ लाख मे.टन साखर निर्यात झाली आहे. या हंगामात शेतकऱ्यांना कारखानदारांनी ५० हजार कोटींची एफआरपी दिली. परदेशात साखरेला चांगला दर असल्याने बहुतेक कारखान्यांनी साखर निर्यात केली.साखर आयुक्तालयास मंत्रिसमितीची प्रतीक्षाआगामी गाळप हंगाम सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिसमिती असते.पण, राज्यातील सत्तांतरानंतर अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे साखर आयुक्तालयाला निर्णय घेताना अडचणी येत आहेत. मागील हंगामात अनेक शेतकऱ्यांचा ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने अख्खा फड पेटवून द्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर लवकर निर्णय अपेक्षित आहे.
माहिती स्त्रोत- सकाळ